अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके ६६ हजारपेक्षा अधिक मतांनी दणदणीत विजयी झाल्या आहेत. शिवसेनेतील फुटीनन्तर ही पहिलीच निवडणूक होती. सेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ गेल्यानन्तरचीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे ह्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. भाजपने अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने ह्या निवडणुकीत तशी चुरस उरली नव्हती. मतदारांना तर अजिबात रस नव्हता. फक्त ३१ टक्के मतदान झाले.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे झालेल्या ह्या निवडणुकीत त्यांची पत्नी ऋतुजा उभ्या होत्या. त्यांना सहानुभूती मिळणार हे सारेच धरून चालले होते. पण ‘नोटा’ला पुढे करून लटके यांना रोखण्याचा प्रयत्न सुरु झाला तेव्हा शिवसैनिक कामाला लागले. शिवसेनेतील फुटीमुळे उद्धव ठाकरे यांची व्होट बँकही फुटेल असा भाजपचा अंदाज आहे. तो खोटा ठरला. ‘नोटा’ने १२ हजार ७७६ मते घेतली. कुठल्याही उमेदवाराला तुम्हाला मत द्यायचे नसेल तर ‘नोटा’वर बटन दाबण्याची तुम्हाला सोय असते. इथे ‘नोटा’ने भरपूर मते घेतली. पण लटके यांना तो फार अडवू शकला नाही. लटके यांना मिळालेली मते ठाकरे गटाचीच आहेत हे उघड आहे. तसे मानले तर ४० आमदार फुटल्यानंतरही मुंबईमध्ये ठाकरे गटाची पकड कायम आहे असेच दिसते. ‘मशाल’ ह्या निवडणूक चिन्हावर ठाकरे गटाने खाते उघडले.
अंधेरीच्या २०१९च्या म्हणजे गेल्या निवडणुकीत मुरजी पटेल अपक्ष उभे असताना त्यांनी चांगली मते घेतली होती. मग यावेळी भाजपचे तिकीट न मिळाल्यामुळे मुरजी पटेल यांनी बघ्याची भूमिका घेतली होती का? अंधेरीत भाजपचीही काही मते आहेत. ती मतदानाला का आली नाहीत? ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं २०२४ च्या निवडणुकीत मिळतील. काहीही असो, उद्धव ठाकरे यांनीं पहिली लढाई जिंकली आहे.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, “पैसे देऊन ‘नोटा’ला मतदान करा असं सांगण्यात आलं. आम्ही तशा तक्रारी केल्या. तरी कारवाई झाली नाही. ते पुढे म्हणाले, “ऋतुजा लटकेंच्या विजयाचा आनंद आहे. मात्र, भाजपाने आणि ‘मिंधे’ गटाने अखेरपर्यंत ऋतुजा लटकेंना त्रास दिला. त्यामुळे या निवडणुकीत ‘नोटा’ला मिळालेली मतं म्हणजे भाजपा आणि ‘मिंधे’ गटाच्या विकृतीचं दर्शन आहे. ही किती विकृत मनोवृत्तीची लोकं आहेत हे आपल्याला पाहता येईल.”
स्वतः ऋतुजा लटके म्हणाल्या, भाजपला सहानुभूती नव्हती. ती असती तर त्यांनी सुरुवातीलाच उमेदवार दिला नसता. त्यांना सर्व्हेमध्ये सगळं कळलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांचा उमेदवार मागे घेतला. मात्र ‘नोटा’वर मतं देण्यासाठी प्रचार करण्यात आला. त्याच्या व्हीडिओ क्लिपदेखील समोर आलेल्या आहेत.
165 Total Likes and Views