सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी चे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी सकाळी तो जिममध्ये वर्कआउट करत असताना त्याचं निधन झालं. सिद्धांतला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण तो वाचू शकला नाही. त्याच्या अकाली मृत्यूने टीव्हीविश्व हादरले आहे. सिद्धांत फक्त ४६ वर्षांचा होता. फिटनेसबद्दल दक्ष होता. हे वय मरायचे नाही. पण गेला. पण तो असा गेलेला पहिला नाही. कॉमेडीयन राजू श्रीवास्तव आणि दीपेश भान यांच्यानंतर जिममध्ये वर्कआउट करताना अभिनेत्याचा झालेला हा सातवा मृत्यू आहे.
बॉडी कमावण्यासाठी उठसुठ जिमला जाणाऱ्यांसाठी हा इशारा आहे. हल्ली व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. याआधी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचेही निधन जिममध्ये व्यायाम करत असताना झाले होते. मात्र, या घटनांमध्ये का वाढ होत आहे हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो आहे. मग व्यायाम करायचाच नाही का? डॉक्टर म्हणतात, जिमला जा, पण आम्हाला विचारून.
व्यायामाच्या वेळी केलेल्या कठीण हालचालींमुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आहे. तज्ञांच्या मते, निदान झालेल्या किंवा न झालेल्या हृदयातील ब्लॉकेजमुळे अशी समस्या होऊ शकते. जास्त व्यायाम केल्याने हृदयाच्या धमन्यांमधील एरिथेमॅटस प्लेक फुटू लागते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळेच व्यक्तीने आपले वय लक्षात घेऊन व्यायाम करावा. डॉक्टरांचा सल्ला घ्या, तब्येत तपासून घ्या, आपले हार्ट कसे आहे ते तपासून घ्या. मगच जिमला जा. व्यायाम तुमच्या शरीराला शक्य असेल तितकाच व्यायाम करा. प्रत्येकाची शारीरिक क्षमता भिन्न असते. त्यामुळे तुमच्या शरीरासाठी योग्य असेल असाच व्यायाम करण्याला प्राधान्य द्या. ‘द काश्मिर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले, “ शरीर कमावण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय व्यायाम करणं हे धोकादायक आहे. ‘हायपर जीमिंग’ ही संकल्पना सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड बोकाळली आहे. एक समाज म्हणून या गोष्टीवर फेरविचार करायला हवा.’’
सिधान्तकडून टीव्ही जगाला खूप अपेक्षा होत्या. ‘कुसुम’, ‘वारीस’ आणि ‘सूर्यपुत्र कर्ण’ या मालिकांमुळे तो घरा घरात पोचला होता. आज सारे उध्वस्त आहे. त्याच्या पश्चात पत्नी एलिशिया राऊत आणि दोन मुले आहेत.
354 Total Likes and Views