झुलता पूल झाला मृत्यूगोल……

News
Spread the love

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून झालेल्या अपघातात दीडशे जणांचा मृत्यू झाला आणि एकशे सत्त्याहत्तर जणांना वाचविण्यात यश मिळाले. गेले सहा महिने दुरुस्ती-देखभालीसाठी बंद असलेल्या या झुलत्या पुलाचे नूतनीकरण झाल्यानंतर घाईघाईने तो खुला करण्यात आला. सुंदर रंगरंगोटी आणि सजावट असा शानदार मेकअप कंत्राटदार कंपनीने या झुलत्या पुलाला केला होता. नदीच्या काठावर निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या झुलत्या पुलाचा आनंद घेण्यासाठी अधिकाधिक संख्येने पर्यंटक यावेत व आपल्याला भरपूर उत्पन्न मिळावे हा कंत्राटदार कंपनीचा सरळ साधा हेतू असावा. मग केलेले दुरुस्तीचे व नूतनीकरणाचे काम किती दर्जेदार झाले आहे हे बघायला कोणाला वेळच नव्हता. झुलता पुलाचे नूतनीकरण करताना त्याचे मजबुतीकरण चांगले झाले आहे की नाही याची कोणी तपासणी केली नव्हती. केवळ पैसे मिळविण्यासाठी कंत्राटे दिली जातात आणि घेतली जातात, हे केवळ मुंबई महापालिकेच्या कारभारातच घडते असे नाही. सर्व सरकारी, निमसरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात हेच सर्रास चालू असते.
मोरबीमधील नदीवरील झुलता पूल कोसळला तेव्हा त्या पुलावर चारशे लोक गर्दी करून होते. तरुण मुले नाच व धिंगाणा घालत होती. गंजलेल्या केबलमुळे पूल कोसळला की गर्दीचा भार पुलाला सहन झाला नाही म्हणून कोसळला हे चार महिन्यांनी चौकशी अहवालातून बाहेर येईल. पुलाचे नूतनीकरणाचे काम केलेल्या ओरेवा कंपनीच्या मॅनेजरसह पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. सर्वात कहर म्हणजे, कंपनीच्या मॅनेजरनेच, देवाची इच्छा होती, म्हणून ही दुर्घटना घडली असे भाष्य केले आहे.
झुलत्या पुलाचे नूतनीकरणाचे काम ज्या ओरेवा कंपनीला दिले, तिचा अशा कामाचा किती अनुभव आहे, याचे उत्तर मिळत नाही. ही कंपनी दुसरेच काही उत्पादन करीत असते. कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या कामांची कंत्राटे जशी भलत्याच कंपन्यांना व त्या कामाशी संबंध नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आली होती, तोच प्रकार मोरबी झुलत्या पुलाबाबत घडला आहे. भलत्याच कंपनीला झुलत्या पुलाचे काम देताना कोणी आक्षेप घेतला नाही, याचेच मोठे आश्चर्य वाटते. मग अशा कंपनीकडून घाईघाईने डागडुजी व रंगसफेदी करून नूतनीकरण केलेला झुलता पूल पर्यटकांचा मृत्यू गोल ठरला. या मृत्यू गोलात कोणाच्या परवानगीने पर्यटकांच्या झुंडीच्या झुंडी पाठवल्या जात होत्या?
मोरबीच्या झुलत्या पुलाचे सर्व व्यवस्थापन करारानुसार ओरेवा कंपनीकडे दिले होते. झुलत्या पुलावर जाण्यासाठी तिकीट विक्री, जमा-खर्च, देखभाल दुरुस्ती, प्रशासकीय व्यवस्था, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, सफाई सर्व कामे या कंपनीला देण्यात आली होती. नूतनीकरण करताना जुन्या केबल्स बदलल्या नाहीतच पण अॅल्युमिनियमच्या शिट्सचा वापर करण्यात आला, त्यामुळे पुलाचा भार वाढला का, हे चौकशीतून निष्पन्न होईल. या कंपनीने केलेले काम दर्जेदार होते काय, याची कुठेही नोंद मिळत नाही. दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि इस्पितळात जाऊन तेथे उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस केली. याच वर्षी मार्च महिन्यात हा पूल बंद करण्यात आला होता व नूतनीकरणाचे काम खासगी कंपनीला देण्यात आले. गुजराती नववर्ष दिनाला म्हणजे २६ ऑक्टोबरला हा पूल पर्यटकांना खुला करण्यात आला. मोरबीतील मच्छू नदीवरील ऐतिहासिक व प्राचीन असलेला हा झुलता पूल पर्यटकांचे मोठे आकर्षण होता. ३० ऑक्टोबरला पर्यटकांची गर्दी पुलावर आनंद लुटत असतानाच हा पूल कोसळला, अनेक लोक थेट नदीत बुडून मरण पावले, तर अनेक जण नदीतील दगड धोंड्यांवर आदळून जखमी झाले. जीव वाचविण्यासाठी अनेकांनी आकांत केला. सुटकेसाठी लष्कर, निमलष्करी सैन्याला पाचारण करावे लागले, त्यांनी १७७ जणांना सुखरूप नदीतून वर आणले.
दीडशे वर्षांपूर्वी मोरबीचे राजा सर वाघजी ठाकूर यांनी अाधुनिक युरोपीय तंत्रज्ञानाचा वापर करून हा झुलता पूल उभारला. त्याचे उद्घाटन दि. २० फेब्रुवारी १८७९ रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. प्राचीन कलात्मक व तंत्रज्ञानाचा चमत्कार अशी मोरबीच्या झुलत्या पुलाची ओळख होती. देशात कुठे ना कुठे पूल आणि उड्डाणपूल कोसळण्याच्या घटना घडतच असतात, त्या यादीत आता मोरबीच्या पुलाची भर पडली आहे. पूल पडले, दरडी कोसळल्या, मोठे अपघात झाले, लोक मृत्युमुखी पडले, अनेक जखमी झाले की, प्रशासनावर झोड उठवली जाते. राज्यकर्ते, व्हीव्हीआयपी घटनास्थळी येऊन भेट देतात, जखमींचे व मृतांच्या वारसांचे सांत्वन करतात, नियमानुसार सरकारी मदत जाहीर केली जाते, उच्चस्तरीय चौकशीची घोषणा होते, विरोधी पक्षांकडून सत्ताधारी असलेल्या पक्षावर आरोपाच्या फैरी झाडल्या जातात, जे आजवर घडले तेच मोरबीच्या दुर्घटनंतर बघायला मिळत आहे. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मोरबीचा झुलता पूल कोसळतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले. देशातील जनतेने नदीत बुडणारे व जीवाचा आकांत करणारे लोक या क्लिपमधून बघितले. गुजरातमध्ये एक दिवस दुखवटा पाळला गेला. पण पूल नदीत कोसळून गेलेले दीडशे जीव परत थोडेच येणार आहेत?
सन २०१६ मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळातच स्वामी विवेकानंद रोडवरील उड्डाणपूल कोसळून २७ लोक मृत्युमुखी पडले होते. भ्रष्टाचाराची बजबजपुरी म्हणून ममता बॅनर्जी सरकारवर टीकेची झोड उठली होती. निवडणुकीत ममता सरकारचा भ्रष्ट कारभार हा एक मुद्दा बनला होता. आता गुजरातच्या निवडणुकीच्या अगोदर मोरबीची दुर्घटना घडली आहे. पश्चिम बंगालमधील दुर्घटनेचा तृणमूल काँग्रेसच्या मतावर परिणाम झाला नाही तसेच गुजरातमधेही होऊ शकते.
पण राजकारणी, नोकरशहा, ठेकेदार यांच्या भ्रष्ट साखळीत सामान्य माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही, हे त्यातून दिसून येते. दि. ३१ जून १९९७ रोजी नवी दिल्लीतील ग्रीन पार्कमधील उपहार चित्रपटगृहाला भीषण आग लागली होती, त्यात ५९ लोक आगीत होरपळून मरण पावले. विषारी दारू प्राशन केल्याने देशात विविध राज्यांत मोठ्या संख्येने लोक मरण ओढवून घेत असतातच. सन २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये तीस मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यूपी- बिहारमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बाजा वाजलेला आहेच, त्याचा फटका सर्वसामान्यांना नेहमी बसत असतोच. अतिवृष्टी, महापूर, वादळ, सुत्नामी, कुपोषण, आत्महत्या यातून मृत्यूंची मालिका चालू असतेच. प्रत्येक वेळी अगोदरच्या घटनेच्या चौकशीचे काय झाले, त्यातून कोणाला शिक्षा झाली, त्यातून काय बोध घेतला असे प्रश्न विचारले जातात. तसेच प्रश्न काही दिवस मोरबीच्या दुर्घटनेवर विचारले जातील व नंतर सारे काही थंड होईल.
ओरेवा कंपनी व मोरबी नगरपालिका यांच्यात तीनशे रुपयांच्या स्टँप पेपरवर करार झालाय. या झुलत्या पुलावर जाण्यासाठी पर्यटकांसाठी तिकिटाचे दर कंपनीला वाढवता येतील, पुलाचा वापर कंपनी व्यापारी कामासाठी करू शकेल, पालिकेची यंत्रणा त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे करारात नमूद केले आहे. मात्र जर दुर्घटना झाली तर कोण जबाबदार याचा उल्लेख या करारात नाही. मार्च २०२३ पर्यंत प्रौढांना १५ व मुलांना १० रुपये तिकीट असावे असे ठरले होते, नंतर त्यात दोन रुपयांनी वाढ करावी असेही ठरले होते. पण २६ ऑक्टोबरला पूल खुला केल्यावर कंपनीने आतापासूनच तिकीट दरात दोन रुपये वाढ केली. या तिकीट विक्रीवर व पुलावर प्रवेश देण्यावर कोणाचेच नियंत्रण नव्हते. साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अहमदाबाद यांनी उभारलेल्या अटल पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले, तेव्हा हजारो लोक उपस्थित होते. तिथे सर्व सुरक्षित आहे. मग मोरबीचा पूल ४०० लोकांच्या ओझ्याने कोसळतो कसा?  sukritforyou@gmail.com

 236 Total Likes and Views

0 Comments

No Comment.