विवाह संस्थेला सुरुंग सुरु झाला आहे. लग्नाशिवाय तरुण-तरुणी एकत्र राहत आहेत. घरच्यांशी वैर पत्करून एकत्र आलेले प्रेमी जोडपे पुढे प्रेमाचा उन्माद संपल्यानंतर एकमेकाचा जीव घेऊ पाहते. अशा घटना सर्रास घडत आहेत. मुंबईतील तरुणीच्या दिल्लीत झालेल्या एका खुनाने तर संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धा नावाच्या ह्या तरुणीची तिच्या लिव्ह इन पार्टनरनेच निर्घृण हत्या केली. तरुणीचा खून करुन तो थांबला नाही, त्याने तिचे ३५ तुकडे केले आणि जंगलामध्ये फेकून दिले. ६ महिन्यापूर्वीचा हा खून आता उजेडात आला आणि पोलीसही चक्रावले. कोणी प्रियकर एवढा क्रूर असू शकतो?
ह्या प्रियकराचे नाव आफताब अमीन पूनावाला आहे. त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते केवळ दिल्लीतच नव्हे तर अनेक ठिकाणी फेकले. श्रद्धा ही महाराष्ट्रातील पालघरची रहिवासी होती. क्राइम सीरिज ‘डेक्स्टर’ पाहून त्याने हे कृत्य केले.
श्रद्धा मुंबईतील एका मल्टीनॅशनल कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करायची. तिथे त्याची भेट आफताबशी झाली. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर काही दिवसांनी प्रेमात झाले. मात्र घरच्यांना त्यांचे नाते मान्य नव्हते. त्यानंतर दोघेही दिल्लीत राहायला गेले आणि घरच्यांना न सांगता मेहरौली परिसरातील एका फ्लॅटमध्ये एकत्र राहू लागले. श्रद्धाला आता लग्न करायचे होते. परंतु आफताब त्यासाठी तयार नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी आफताब आणि श्रद्धामध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर आफताबने श्रद्धाचा गळा आवळून खून केला. एखाद्या भयानक खुन्याप्रमाणे त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि ते ठेवण्यासाठी ३०० लिटरचा फ्रीज विकत घेतला. त्यानंतर पुढचे १८ दिवस आफताब पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडायचा आणि त्याने दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकले. तिच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकले तर ते कुणीतरी खाऊन टाकेल, असे त्याला वाटले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबरला श्रद्धाचे वडील विकास मदन आपल्या मुलीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी दिल्लीला पोहोचले. ते अनेक महिन्यांपासून श्रद्धाला फोन करत होते, पण समोरुन कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. विकास मदन हे श्रद्धाच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा दरवाजा बंद होता. त्यांनी मेहरौली पोलिसात जाऊन अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयाच्या आधारे आफताबला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच आफताब पोपटासारखा कबुल करता झाला.
138 Total Likes and Views