सावरकरांविषयी आणखी एक सत्य

Editorial
Spread the love

सावरकर यांच्या विषयी सुशिक्षित हिंदुत्ववादी कुटुंबात विनाकारण स्तोम माजवले जाते असा माझा स्वतः चा अनुभव आहे.

एकदा देवत्व दिले की प्रश्न विचारणे, चिकित्सा करणे अशक्य होते.

वास्तविक सावरकरांचे एकूण सर्व साहित्य (ललित आणि वैचारिक) विचारात घेतले तर भाषिक (संस्कृत प्रचुर मराठी  – सामान्य मराठी भाषिक ही भाषा कधीही बोलत नव्हते.) फुलोरा अधिक, गुणवत्ता अगदीच मर्यादित असे त्याचे वर्णन करता येते. सावरकरांचा लिखित साहित्य ऐवजही  तसा मर्यादित.

पण तरीही त्यांचा उदोउदो फार. (आता तर काय ‘गणपती दूध पितो’ च्या चालीवर मुख्यमंत्री ते संदीप देशपांडे सर्वच ‘सावरकर भक्त’.)

वास्तविक सावरकरांचे समकालीन साने गुरुजींचे साहित्य, वैचारिक मांडणी, बहुभाषिक क्षमता, अनुवादित साहित्य, जातीयता विरोधी कार्य  सारे उत्तुंग!

पण त्यांना या सुशिक्षित हिंदुत्ववादी थराने  कायम हिणवले. नाकारले. फारातफार ‘लहान मुलांचे साहित्यिक’ ठरवले.

हा योगायोग नाही. हा ठरवून केलेला सांस्कृतिक कट आहे, यात शंका नाही!

-प्रमोद मुजुमदार

प्रिय मुजुमदार,

मी तुमच्याशी सहमत आहे. माझाही असाच अनुभव आहे.

पण सावरकरांच्या उदात्तीकरणात उदारमतवाद्यांचीही चूक झाली आहे. इंदिरा गांधींपासून शरद पवार असोत की समाजवादी नेते, सावरकरांना कायम प्रमाणपत्र दिली गेली आहेत. अगदी पु. ल. देशपांडे यांनीही सावरकरांची आरती गायली आहे. महाराष्ट्रात जयंतराव टिळक सावरकर ट्रस्टचे अध्यक्ष होते. पवारांनीच या ट्रस्टला जमीन दिली.

सावरकरांच्या स्वातंत्र्याच्या उर्मीबद्दल शंका नाही, पण ते एक वाट चुकलेले स्वातंत्र्य सैनिक होते. अंदमानात पाठवल्यावर त्यांनी सुरवातीला हाल भोगले हे खरं, पण बाहेर येण्यासाठी त्यांनी माफीपत्र लिहिली हेसुद्धा तितकंच खरं. इतर समकालीन कैद्यांनी तिथे मरण पत्करलं.हे ब्रिटिशांपुढे सावरकरांचं सपशेल लोटांगण होतं.

अंदमानातून १९२१ ला सुटका झाल्यावर त्यांची रवानगी १९३५ पर्यंत रत्नागिरीत गृहकैदेत करण्यात आली.सरकारविरोधी राजकारण करणार नाही असं लिहून दिल्याने त्यांचे हात बांधले गेले. सरकारी पेन्शनही त्यांना मिळत होतं. अगदी, १९४७ पर्यंत त्यांनी ब्रिटिशांचीच मदत केली, ही वस्तुस्थिती आहे. गांधीहत्येच्या खटल्यात ते आरोपी होते. केवळ पुरेशा पुराव्याअभावी ते सुटले. गांधींची वाढती लोकप्रियता त्यांना सहन होत नव्हती हे सत्य आहे. शहरी, उच्चवर्णीय महाराष्ट्राने अंधभक्तीपोटी याकडे कायम दुर्लक्ष केलं आहे. सावरकरांचं माणूस म्हणून वागणंही आक्षेपार्ह होतं. आपल्या कुटुंबाची त्यांनी अवहेलनाच केली.

सावरकरांच्या सामाजिक कार्याबद्दल नेहमी बोललं जातं. काही बाबतीत त्यांचे विचार विज्ञाननिष्ठ होते, पण त्याची चौकट हिंदुत्वाचीच होती. सावरकर लोकप्रिय झाले ते लता मंगेशकर यांनी त्यांची गाणी म्हटली म्हणून. त्यांच्या अतिरंजीत साहित्याची चिरफाड खुद्द प्रबोधनकारानी केली आहे. सहा सोनेरी पाने हा त्यांचा ग्रंथ तर धर्मांधता आणि विकृतीचा सज्जड पुरावा आहे. 

नवी ऐतिहासिक कागदपत्रं उपलब्ध झाल्यावरही वरील प्रतिष्ऱ्ठित पुरोगामी मंडळींनी आपल्या भूमिकांत सुधारणा केल्या नाहीत. माझ्या मते, ही मंडळी ब्राह्मणी संस्काराची बळी ठरली. या संस्कारातून बाहेर पडण्यासाठी जे विशेष प्रयत्न करावे लागतात ते या जुन्या पिढीने केले नाहीत.

ब्राह्मणी वृत्तीच्या इतिहासकारांनी हे सर्व जाणीवपूर्वक केलं आहे. शिवाजी महारांजापासून सावरकरांबद्दल सतत खोटा इतिहास सांगितला गेला. फुले-शाहू-आंबेडकर आणि इतर ब्राह्मणेतर सुधारकांवरही असा अन्याय झाला. तो खोडून काढून नवा इतिहास लिहावा लागेल. काही प्रमाणात हे काम होतं आहे. पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही. त्यासाठी मोठी संस्था पाठीशी लागेल. नाहीतर, असे राजकीय वाद होत रहातील.

खरं तर, तुमच्यासारख्यांनी यात सामुहिक पुढाकार घ्यायला हवा. तरुणांना जोडून घेऊ या.

मी आहेच सोबत.

ता.कः साने गुरुजी सावरकरांपेक्षा श्रेष्ठ साहित्यिक आहेत, हे मला मान्यच आहे. पण त्यावर नंतर कधीतरी.

तुमचा,
निखिल वागळे

 93 Total Likes and Views

0 Comments

No Comment.