एखादी श्रद्धा तुमच्या शेजारीही असेल….

Editorial
Spread the love

 मोरेश्वर बडगे

मी एरवी राजकारणावर लिहितो. उद्धव ठाकरे कसे शरद पवार यांच्या जाळ्यात अडकले आणि देवेंद्र फडणवीस कसा लंबी रेसचा घोडा आहे हे माझ्या विश्लेषणातून सांगतो. पण चार दिवसापूर्वी आलेल्या एक बातमीने मी सुन्न आहे. मीच काय सारा देश हादरला आहे.  मुलामुलींचे  आईवडील हादरले आहेत. आपल्या समाजात असेही घडू शकते? आपले राजकारण तर नासलेच आहे. पण  आपले समाजकारण, आपली कुटुंबव्यवस्था उद्धवस्त व्हायला निघाली आहे. लिव्ह इनला समाजात मान्यता मिळू लागली आहे. हे रोखले नाही तर तो दिवस दूर नाही, जेव्हा  हिंदूमधली विवाह संस्था मोडीत निघालेली असेल. तरुण-तरुणी लग्नाच्या भानगडीत पडणार नाहीत, ‘लिव्ह इन’मध्ये राहतील. कधीकाळी आमचे पूर्वज लग्नाच्या गाठी बांधत होते अशी आठवण   आमचे पणतू-खापरपणतू  काढतील.  हे सारे बोलावे लागते, कारण घडतेच तसे आहे.

                       विषय एका २६ वर्षे वयाच्या श्रद्धा मालकर ह्या तरुणीचा आहे. श्रद्धा ही  मुंबईजवळ वसईची. कॉल सेंटरमध्ये  काम करायची. एका  ‘डेटिंग एप’वर  आफताब  अमीन पुनावाला नावाच्या तरुणाशी  तिची ओळख झाली.  ह्या ओळखीचे फुलपाखरू झाले.  वडिलांना हे स्थळ पसंत नव्हतं.  अशा प्रसंगी तिने काय करावे?  ते वय वेगळे असते. साऱ्यांचे प्रेम ‘सेम’ नसते. चुकीच्या व्यक्तीवर तिने विश्वास टाकला. आफताबसोबत  ‘लिव्ह इन’मध्ये म्हणजे लग्न न करता राहू लागली. पुढे हे दोघे दिल्लीला गेले.  मात्र नियतीला काही वेगळे अपेक्षित होते. अवघ्या दोन वर्षात गेम झाला. आफताब याचा तिच्यातला  रस संपला असावा. श्रद्धाने लग्नाचा विषय  काढताच तो तिला मारहाण करू लागला.  एका रात्री अशाच भांडणात गळा दबून त्याने तिचा खून केला. तिच्या  देहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी मोठा फ्रीज आणला. रोज रात्री  एक एक तुकडा तो जवळच्या जंगलात जाऊन फेकून येत असे. तब्बल २२ दिवस  हा कार्यक्रम चालला. कोणालाही संशय आला नाही. पण  पुढे ६ महिन्याने त्याचे भांडे फुटले.  पोलिसांनी आपला खाक्या  दाखवताच आफताब पोपटासारखा बोलू लागला.  अतिशय थंड डोक्याने आफताबने जे केले ते ऐकून सारेच हादरले. खरेच कोणी प्रियकर इतका क्रूर वागू शकतो?  आफताबला फाशी देण्याची मागणी सुरु झाली आहे.   ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ घटनेत फाशी सुनावली जाते. हा खूनही तसाच आहे. पण कोणी साक्षीदार नाही.  कापाकापीत वापरलेली आरी आणि श्रद्धाचा  मोबाईल  फेकून दिला असे आफताब म्हणतो. मृतदेहाचे आतापर्यंत १८ तुकडे सापडले आहेत. ते श्रद्धाचेच आहेत हे  सिद्ध व्हावे लागेल.  आपली न्यायव्यवस्था किती झटपट निकाल देते ते पहायचे. दिल्लीतल्या निर्भयावरही  असाच अत्याचार  झाला होता. तेव्हाही सारा देश खवळून रस्त्यावर आला होता.  ३१ वर्षापूर्वी रिंकू पाटील हिला एकतर्फी प्रेमातून जाळण्यात आले  तेव्हाही जनक्षोभ भडकला होता.  त्यामुळे श्रद्धासारखी  घटना  पहिल्यांदा घडलेली नाही.  पुढेही घडणार नाही ह्याची शाश्वती  नाही.  कदाचित एखादी श्रद्धा तुमच्या घराशेजारीही असू शकते.  कारण आपल्या आसपास श्रद्धा आणि आफताब  फुलत असतात तेव्हा  आपण बघ्याची भूमिका घेत असतो. आपल्याला काय त्याचे  असा विचार  समाज करतो.  आता श्रद्धाच्या मामल्या कडे ‘लव्ह जिहाद’ म्हणून पाहणे सुरु झाले आहे.  पण बापाचे न ऐकता श्रद्धा  स्वच्छंदपणे  आफताबसोबत भटकत होती तेव्हा  समाजाचे  वागणे कसे होते?   शेजारच्या घरात कशाला   डोके घालायचे ही मनोवृत्ती घातक आहे. बहुतेक प्रकरणात हिंदूंच्याच मुली का  अडकतात? का मारल्या  जातात?  कोणी मुस्लीम तरुणी अशी का अडकत नाही?  संभाजी भिडे गुरुजींनी मध्यंतरी एका महिलेला ‘कुंकू लावून ये’ असे म्हटले तेव्हा मिडीयाने किती  गहजब केला हे सर्वांना ठाऊक आहे. हिंदूंनी टिकलीची  भाषा केली तर  तथाकथित सेक्युलर टोळी अंगावर येते. पण   हिजाबवरून वादंग उभे राहते तेव्हा हीच टोळी हिजाबचे कौतुक करते. ह्यांचा हिजाब  चांगला तर आमची टिकली कोणाच्या डोळ्यात का खुपावी? पुरोगामित्व आणि  धर्मनिरपेक्षता केवळ हिंदूंसाठी  आहे का? श्रद्धा  हिच्याबाबतीत जे घडले तो केवळ गुन्हा नाही, ती विकृती आहे.   ह्या  विकृत प्रवृत्तीने श्रद्धाचा बळी घेतला  आहे.  श्रद्धा  त्याला नकोशी झाली  याचा अंदाज  तिला किंवा तिच्या जवळच्यांना आला असता  तर  श्रद्धा वाचली असती. पण मुलंमुली हल्ली समाजाशी ‘कनेक्ट’ राहतात कुठे? १० खुनांमध्ये एक खून प्रेम, सेक्स व विश्वासघातातून होतो असे आकडेवारी सांगते. प्रेम आणि त्यातून झालेल्या गुन्हेगारीतून रोज ८ जण मारले जातात आणि २१ जण आत्महत्या करतात.

               लक्षात घ्या. हा  केवळ हिंदूंच्या  कुटुंबव्यवस्थेवर हल्ला नाही,   विवाह  व्यवस्थेवरही हल्ला आहे.  आणि ते फार आधी सुरु झाले आहे. आज टिकली गेली. उद्या कपाळही जाईल. प्रत्येक कुटुंबाने जागे झाले पाहिजे.  आपली मुलं काय विचार करतात?  कोणाच्या संपर्कात आहेत?  ती  कोणाशी बोलतात? किती  आईवडील घरी मुलामुलींशी  मोकळेपणाने बोलतात?  विश्वासाचं नातं तुटत चाललं. जन्मदाता बाप असूनही श्रद्धाने टोकाचा विचार केला. दुर्दैवाने सध्याचे जग हे आभासी जग झाले आहे. प्रत्येक  जण  मोबाईलमध्ये बिझी आहे. कुटुंबासाठी, जवळच्यासाठी कोणाला वेळ आहे? मुलामुलींशी घट्ट  मैत्री करा.  लहानपणापासूनच हे मैत्र  सुरु झाले पाहिजे.  म्हणजे  संकटात तो किंवा ती आपली अडचण घरच्या मोठ्यांना सांगेल.   श्रद्धाला आईवडिलापेक्षा बाहेरचा आफताब  जवळचा का वाटला? कारण घरचे तिला कधी आपले वाटलेच नाहीत.  टीव्ही मालिका, सिनेमामध्ये पाहतो तेच खरे जग अशी वातावरण निर्मिती सुरु आहे. टीव्हीमध्ये काय दाखवतात?  घरातली भांडणे, हेवेदावे,  हिंसाचार.. आपण हे सारे मुकाट पाहतो.  टीव्हीमध्ये जे दिसते तशी मुलं वागतात. ‘डेक्स्टर’ नावाचा अमेरिकन क्राईम शो आहे. तो पाहून आपण  श्रद्धाचा काटा काढला अशी कबुली आफताबने पोलिसांना दिली. तेव्हा सावध व्हा.  माणूस आभासी जगात रमतो तेव्हा  त्याची विचार करायची क्षमता  संपते.  त्या तावात तो नको त्या गोष्टी करून बसतो.  त्यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी चिडचिडी करतोय, हिंसक  वागतोय तर  मनोविकारतज्ञाकडे त्याला घेऊन जा.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.  )

 147 Total Likes and Views

1 Comments
zelma November 20, 2022
| | |
Waiting patiently for you to come home and fuck me! https://bit.ly/3UIKI2R