तुम्हाला कुण्या अनोळख्या मुलीचा फोन आला तर बोलू नका. महागात पडू शकते. हा सेक्स्टॉर्शनचा प्रकार असू शकतो. देशात अशा प्रकारे पुरुषांना गुलाबी बोलून फसवण्याचे प्रकार सुरु आहेत. पुण्यात ह्या माध्यमातून तरुणांना धमकावलं जात होतं. त्यामुळे दोघांनी आत्महत्या केली होती. त्या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी एका टोळीचा छडा लावला आहे. ज्या मोबाईल नंबरवरुन या मुलांना खंडणी मागितली जात होती, त्या नंबर्सचं लोकेशन पुणे पोलिसांनी शोधलं. ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी गावातील निघाले. त्यातील अन्वर नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने धक्कादायक गोष्टी उघड केल्या. गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत, असं तो म्हणाला.
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केली जातात. त्यानंतर मुलगी बोलतेय असं सांगून तरुणांना जाळ्यात ओढलं जातं. त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांचे काही फोटो, व्हिडिओ शेअर करायला सांगितले जातात. हे फोटो मॉर्फ करुन, अर्थनग्न करुन त्यांना पाठवले जातात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. अशाच एका प्रकरणात वारंवार पैशांची मागणी करण्यात आल्याने पुण्यातील शंतनु वाडकर आणि अमोल गायकवाड या तरुणांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.
113 Total Likes and Views