काँग्रेसवाले आपली उदासीनता केव्हा सोडणार?

Editorial
Spread the love

सोपान पांढरीपांडे

हा लेख वाचकांच्या हाती पडेल त्यादिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरच्या दिशेने वाटचाल करू लागलेली असेल.  गेले सव्वा दोन महिने 52 वर्षाचा हा तरुण नेता कन्याकुमारीपासून जवळपास १७०० किलोमीटर अंतर पायी चालून काल महाराष्ट्रात जळगाव-जामोद जवळच्या भेंडवळ गावात मुक्कामाला होता.
या यात्रेदरम्यान सर्व सामान्य जनतेचे प्रचंड पाठबळ, समर्थन राहुल गांधींना मिळते आहे आणि त्यांच्याबरोबर चालणारी गर्दी, त्यांच्या सभांसाठी जमणारा विशाल जनसमुदाय हे त्याचे गमक आहे. निवडणूका जवळ नसतांना हे राजकीय उत्थान खरोखरच  अभूतपूर्व आहे. परंतु एकीकडे ही एवढी मोठी अभूतपूर्व घटना घडत असतानाच, ज्या पक्षाला बळ देण्यासाठी राहुल गांधी जीवाचे रान करीत आहेत, त्याच काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मात्र या यात्रेबाबत कमालीचे उदासीन आणि उत्साहहीन दिसत आहेत.

कॉंग्रेसवाल्यांची उदासिनता

राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेमार्फत उभ्या केलेल्या जनसहानुभूतीचा कुठलाही फायदा काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी करून घेतांना कॉंग्रेसचे कार्यकर्ते व नेते दिसत  नाहीयेत, ही दुर्दैवाची बाब आहे. ज्यांच्या भल्यासाठी ही यात्रा निघालेली आहे तेच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते या यात्रेबाबत मात्र पूर्णतः उदासीन आहेत, असे जाणवते आहे.
भारत जोडो यात्रा सुरु झाल्या पासून तामीळनाडू, केरळ, कर्नाटक व तेलंगणातील यात्रा मी टीव्हीवर बघत होतो. त्यामुळे ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल तेव्हा तिचे स्वागत कसे होईल, प्रतिसाद कसा राहील याबद्दल मला प्रचंड उत्सुकता होती.  त्यामुळे माझे नांदेडचे मित्र राधेश्याम बलदवा यांना या यात्रेचे व्हिडीओ पाठविण्याची मी विनंती केली. तिला प्रतिसाद देत बलदवाजींनी मला नांदेड शहरातील देगलूर नाका ते मोंढा मैदानावरची राहुल गांधींची विशाल सभा याचा तीन तास 37 मिनिटांचा एक व्हिडिओ पाठवला आहे. (तो यूटयूबवर सुध्दा उपलब्ध आहे.)
हा व्हिडिओ बारकाईने पाहिल्यानंतर काँग्रेसवाल्यांची उदासीनता मला प्रकर्षाने जाणवली. या यात्रेत फक्त राहुल गांधीच अतिशय प्रामाणिकपणे चालत आहे व सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत.  परंतु काँग्रेसचे ईतर  कार्यकर्ते आणि नेते मात्र चालण्याच्या बाबतीत तेवढे गंभीर नाहीये असे जाणवले. अनेक कॉंग्रेस नेते मध्येच यात्रेतून गायब होतात व थोड्या वेळाने पुन्हा यात्रा जॉईन करतात, असे दिसले.  मधल्या वेळात यात्रेसोबत चालत असलेल्या वाहनामध्ये जाऊन ‘फ्रेश’ वगैरे होऊन येतात की काय अशी शंका येते. तसे असेल तर कॉंग्रेसवाले या यात्रेबाबत किती उदासीन/निरुत्साही आहे, ते दिसते.

कॉंग्रेस पक्षाची वैशिष्ट्ये

खरे तर काँग्रेस हा एकमेव राष्ट्रीय पक्ष असा आहे की जो भारताच्या सहिष्णूतेचे आणि सर्वधर्मसमभावाच्या मूळ भावनेचे पालन करतो व याच व्यापक तत्वांचे/मूल्यांचे धोरण/विचारधारा/आयडिओलॉजी म्हणून स्वीकार करतो.  याच वैशिष्ट्यामुळे काँग्रेस हा पक्ष जात-पात न पाळता धर्म-भेद, वंश-भेद, भाषा-भेद न पाळता सर्वसमावेशक अशी मानवतावादी विचारधारा अंगिकारतो. ही विचारसरणी ही मूळ भारतीय विचारसरणी असल्याने खऱ्या अर्थाने कॉंग्रेस पक्ष संपूर्ण भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून हा पक्ष आजवर टिकून आहे व  भविष्यातही टिकून राहणार आहे. खरे तर या मुद्यावर कॉंग्रेस पक्षाला आव्हान देणारा दुसरा पक्षच भारतात नाही.
या उलट इतर पक्षांची स्थिती जर बघितली तर असे लक्षात येते की समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष हे जरी राष्ट्रीय पक्ष असले तरी त्यांची दोन्हींची लोकप्रियता घटत चाललेली आहे.
इतर प्रादेशिक पक्ष उदाहरणार्थ जनता दल अनेक भागात विभागला गेला आहे, द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके), ऑल इंडिया डीएमके (ए आयएडीएमके),  काँग्रेस (राजशेखर रेड्डी),  तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) तृणमूल काँग्रेस पक्ष हे सर्व पक्ष एका राज्यापुरते मर्यादित आहेत व ते संपूर्ण देशाला नेतृत्व देण्यासाठी सक्षम नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व देऊ शकणारे केवळ दोनच पक्ष उरतात. एक म्हणजे कॉंग्रेस आणि दुसरा म्हणजे भारतीय जनता पक्ष (भाजप).

भाजपचा संकुचितपणा

सध्या गेल्या आठ वर्षापासून केंद्रामध्ये भाजपचे बहुमतातले सरकार आहे आणि या सरकारने गेल्या आठ वर्षात भारतीय राजकारणाची वाताहात करुन टाकली आहे. विशेष करून भारतीय समाजात फूट पाडणे,  जनतेची जाती- धर्मांत विभागणी करणे,  अखंड भारत निर्माण करण्याच्या भ्रामक भावनिक आव्हानामागे अल्पसंख्यांक अशा मुस्लिम आणि ख्रिश्चन जनतेला शत्रू समजणे व  त्यांचे संख्याबळ कमी कसे होईल त्याची योजना करणे व कसेही करुन निवडणूका जिंकणे, एवढाच भाजपचा हेतू आहे.
यासाठी, राज्य घटना न मानणे, लोकशाहीच्य आधारस्तंभ असणाऱ्या स्वायत्त संस्था म्हणजे प्रसार माध्यमे, न्यायव्यवस्था, नोकरशाही व विधीमंडळ यांच्या मूलभूत तत्वांची मोडतोड करणे व त्यातून लोकशाही कमजोर करणे, हे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारे गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने करत आहेत. त्यामुळे देशातील लोकशाहीच्या अस्तित्वावरच भाजपमुळे प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.

लोकशाहीचा मृत्यू

आपल्या How  democracies die? (लोकशाहीचा मृत्यू कसा होतो?) या पुस्तकात स्टीव्हन लेव्हेटस्की व डॅनियल झिबलॉट यांनी लोकशाहीच्या मृत्यूची चार कारणे सांगितलेली आहेत. ती अशी आहेत.१) जेव्हा देशाचा नेता लोकशाहीचे नियम नाकारतो, २) विरोधी पक्षांची वैधता नाकारतो, ३) हिंसेला प्रोत्साहन देतो किंवा हिंसा सहन करतो, आणि ४) विरोधकांच्या व नागरिकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यामध्ये कपात करतो.(फेसबुक मित्र अरुण खोब्रागडे यांच्या वॉलवरुन साभार.)
आपण बारकाईने विचार केला तर केंद्रातील भाजप-प्रणित मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत हे चारही नियम सिध्द करुन टाकले आहेत, हे लक्षात येते.
याशिवाय आपला लोकशाहीविरोधी अजेंडा राबवण्यासाठी भाजप नेते वेगवेगळे फंडे कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नेत्याना बदनाम करण्यासाठी वापरतात. यासाठी भाजपने काँग्रेस नेत्यांची विशेषतः  पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, फिरोज गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे यांचे विरुद्ध बदनामीची मोहीम चालवली आहे. या मोहिमेद्वारे धादांत खोट्या गोष्टी या नेत्यांबद्दल जनतेमध्ये पसरवून जनतेत भ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करत आहे. भारतीय जनता पार्टीचा आयटी सेल या खोट्या कंड्या पिकवण्याचे काम करीत असतो त्यातच राहुल गांधींची प्रतिमा एक बुद्धीहिन ‘पप्पू’ अशी करण्यात आलेली आहे. पण कॉंग्रेस वाले ढिम्म बसले आहेत.

कॉंग्रेसवाल्यांचा नाकर्तेपणा

काँग्रेस नेत्यांनी ना कधी भाजपच्या या खोट्या प्रचाराला  सबळ  उत्तर दिले, ना कधी त्याचा प्रतिवाद केला.आपल्या कपड्याची कडक ईस्त्री सांभाळण्या पलिकडे कॉंग्रेसवाल्यांनी काहिही केलेले नाही. खरे तर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते निर्बुद्ध आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण  भाजपचे हिंदुत्ववादी आव्हान पेलण्यासाठी काँग्रेसची सहिष्णुतेची आणि सर्वधर्मसमभावाची विचारधारा व्यापकपणे समाजात पसरवायला हवी आणि ते काम काँग्रेसवाल्यांनीच करायला हवे. पण दुर्दैवाने कॉंग्रेसचा एकही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक नेता हे काम करताना दिसत नाहीये.  अगदी राष्ट्रीय पातळीवर पी चिदंबरम असो की कपिल सिबल असो का गुलाम नबी आझाद असो.  गेल्या ४० वर्षात या सर्वांनी  फक्त सत्ता उपभोगली पण कोणीही काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला नाही. दुर्दैवाने काँग्रेसला इंदिरा गांधीं नंतर देशभर करिष्मा/लोकप्रियता असलेला नेता मिळाला नाही त्यामुळेही पक्षाचा जनाधार कमी झाला व म्हणूनच भाजप पक्ष सत्तेमध्ये येऊ शकला आहे. यामुळे देशाच्या लोकशाहीला व सहिष्णू प्रतिमेला सुध्दा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या आयटी सेलला टक्कर देण्यासाठी काँग्रेस जवळ  कुठलीच स्ट्रॅटेजी नाही.  नाही म्हणायला काँग्रेस जवळही आयटी सेल आहे परंतु तो आयटी सेल निर्बुद्ध लोकांच्या हातात आहे.  भाजपच्या खोट्या प्रचाराला उत्तर कसे द्यावे हे काँग्रेसच्या आयटी सेलवाल्यांना कळतच नाही.  खरंतर भाजप नेते वागण्याबोलण्यात दररोज असंख्य चुका/घोडचुका करत असतात. भाजपच्या नेत्यांच्या किमान घोडचुकांचा काँग्रेसने स्वतःसाठी उपयोग करून घ्यायला हवा परंतु हे करून घेण्यात काँग्रेसचे आयटी सेल वाले सपशेल अयशस्वी ठरतात.

कॉंग्रेस विचारसरणीचा प्रसार नाही

भारत जोडो यात्रा सुरू असताना राहुल गांधी  यात्रेद्वारे एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना काँग्रेस नेत्यांनी त्या गावात घरोघर जाऊन काँग्रेसच्या विचारधारेचा प्रसार करायला हवा,  पण ते घडताना दिसत नाहीये.  उलट काँग्रेसचे नेते स्वतःच्याच मुलांना राजकारणात
‘प्रमोट’ करताना दिसत आहेत.  नांदेडच्या बाबतीत बोलायचे झाले तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारत जोडो यात्रेचा फायदा घेऊन आजवर प्रकाशात न आलेली त्यांची मुलगी श्रीजया हिलाच राजकारणात आपला वारस म्हणून ‘प्रमोट’ करून टाकले.दुसरे एक माजी मंत्री यात्रेत किरकोळ दुखापत झाल्याचा बाऊ करुन घरी बसले आहेत. यासाठी भारत जोडो नाही, हे कॉंग्रेस वाल्यांनी लक्षात घ्यायला हवे.
भारत जोडो यात्रेला जो व्यापक प्रतिसाद मिळतो आहे तो अभूतपूर्व आहे अनेक मित्र पक्षांनी कॉंग्रेसला समर्थन देऊन या यात्रेमध्ये स्वतःचे प्रतिनिधी पाठवले आहेत तर अनेक सामाजिक  कार्यकर्ते, समाजसेवक, पत्रकार, विचारवंत व लेखक काँग्रेसच्या या यात्रेला स्वयंस्फूर्त समर्थन देत आहेत.  एकेकाळी विरोधक असलेले योगेंद्र यादव आणि सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ वकील  प्रशांत भूषण हे सुद्धा या यात्रेत चालत आहेत, हे विशेष.
पण नतद्रष्ट काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे या यात्रेचा राजकीय लाभ काँग्रेस पक्षाला मिळत नाहीये. एकच उदाहरण देतो. या यात्रेत नागपूरचे डॉ कृष्णकुमार पांडे हे सेवा दल कार्यकर्ते हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे नांदेड येथे निधन झाले.  दुर्दैवाची बाब म्हणजे नागपूर शहर काँग्रेसने किंवा नागपूर जिल्हा काँग्रेसने त्यांना साधी जाहीर श्रद्धांजली सुद्धा आजवर वाहिलेली नाही, अशी माहिती आहे.  ईथे भाजपचा आयटी सेल असता तर त्यांनी डॉ पांडेंना केव्हाच भारत जोडो यात्रेचा “राष्ट्रीय शहीद” वगैरे घोषित करुन टाकले असते. कॉंग्रेसवाले भाजपच्या तुलनेत कसे कमी पडतात, त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे.
मित्रांनो, आजवर राहुल गांधी यांची ही यात्रा जवळजवळ १७०० किलोमीटर चालून आलेली आहे व अजून जवळपास तेवढेच अंतर बाकी आहे.  आता या पुढची काश्मीर पर्यंतची यात्रा ही काँग्रेसला कठीण असलेल्या ‘हिंदी-बेल्ट’ मधून म्हणजे ’गाय पट्ट्या’ तून जात आहे.  किमान या क्षेत्रात तरी काँग्रेसवाले जागे होतील व राहुल गांधी यांच्याबरोबर केवळ चालण्याऐवजी व यात्रेचा ‘ईव्हेंट’ करण्याऐवजी काँग्रेसची विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा आहे. हे घडले तरच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा राजकीय लाभ कॉंग्रेसवाल्यांना  आगामी निवडणूकात होईल. अन्यथा राहुल गांधींच्या या अथक मेहनतीला अर्थच उरणार नाही.  काँग्रेसवाल्यांना ईश्वर सुबुद्धी देवो, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो.
(C)sopanppande@gmail.com
(लेखक जेष्ठ पत्रकार असून रामनाथ गोयनका राष्ट्रीय शोध पत्रकारिता पुरस्कार विजेते आहेत.)फोन नं ९१-९८५०३०४००५

 209 Total Likes and Views

0 Comments

No Comment.