शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर रोजी बाबुजींचा २५ वा स्मृतिदिन. बाबूजी म्हणजे ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक श्री. जवाहरलाल दर्डा. त्यांच्यासोबत मी तब्बल २४ वर्षे होतो. विदर्भात काही वर्षे ते ‘भय्याजी’नावाने सर्वांना परिचित होते. पण, त्यांच्या घरातील ‘बाबूजी’ हे नाव नंतर सार्वजनिक झाले. मंत्रालयातील सर्वांचे ते बाबूजीच झाले. सर्व पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांची हाकसुद्धा ‘बाबूजी’ या नावानेच येवू लागली. बघता-बघता महाराष्ट्रात सगळीकडे ‘बाबूजी’ म्हणून ते परिचित झाले. त्यांच्या जाण्याला २५ वर्षे होत आहेत… खरं वाटत नाही. काळ कोणाकरिता थांबत नाही हे खरेच आहे. पण, काळावरही आपली पावले कशी उमटवता येतात… केवळ पत्रकार म्हणून नव्हे… संपादक म्हणून नव्हे… मंत्री म्हणून नव्हे…. काँग्रेस पक्ष न बदललेले महाराष्ट्राचे जवळपास ‘एकमेव’ नेते म्हणून नव्हे…. माणूस म्हणूनही बाबूजी खूप मोठे होते. महाराष्ट्राला त्यांचे मोठेपण कळले नाही म्हणा किंवा ठरवून त्यांच्याविरोधात भूमिका घ्यायची, असे काहीजणांचे ठरले असल्यामुळे म्हणा… पण, बाबूजींना या कशाचाही विशाद नव्हता. राजकारणी नेते आपल्या विरोधातील एक-दोन शब्द सहन करू शकत नाहीत. छोटी बातमी विरोधात आली तर त्याचा खुलासा येईपर्यंत ती बैचेन असतात. बाबूजींवर वर्षांनुवर्षे आघात झाले. नागपुरातील एका मराठी आणि एका हिंदी वृत्तपत्राने वर्षानुवर्षे बाबूजींना ठरवून झोपडले. खरे-खोटे सगळे काही. जवळपास सगळेच खोटे. पण बाबूजींची स्थितप्रज्ञाता विलक्षण होती. त्यांचे खरे सामर्थ्य त्या सहनशीलतेमध्ये आणि विरोध करणाऱ्याबद्दल एकही अपशब्द न उच्चारण्याच्या सुसंस्कृत जीवनशैलीमध्ये होते. असे एकच उदाहरण नव्हे… असंख्य उदाहरणे मला माहिती आहेत. बाबूजींनी कधी प्रतिवाद केला नाही. व्यक्तिगत हल्ले, सार्वजिनक चारित्र्यावर हल्ले… महाराष्ट्रातल्या काही विशिष्ट वर्गाला ही बदनामी हवी होती. त्यातून त्याची योजना झाली. पण बाबूजी शांत… किती उदाहरणे सांगू… बाबूजी स्वातंत्र्यसैनिक. १८ महिने जबलपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगलेले. पण, एक विशिष्ठ वर्ग बाबूजींच्या बदनामीसाठी टपलेला. त्यासाठी नागपुरात १९८६ साली एका स्वातंत्र्य सैनिकाला उपोषणाला बसवून बाबूजींवर हल्ला केला की, ‘ते स्वातंत्र्यसैनिक नाहीत….’ विधानमंडळाचे कामकाज दोन दिवस बंद पडले होते. विरोध करणाऱ्यांमध्ये आघाडीवर विरोधी पक्षनेते दत्ता पाटील आणि ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख हे होते. बाबूजींकडे बोटे दाखवून आरोप झाले. बाबूजी तरीही शांत… विधानसभेचे अध्यक्ष शंकरराव जगताप यांनी बाबूजींना बोलावले… स्पष्ट सांगितले की, ‘तुम्ही खुलासा का करत नाही?, मला सभागृह चालवणे शक्य नाही.’ बाबूजींचे शांत उत्तर होते की, ‘विरोधी बाकावरचे जे मित्र स्वातंत्र्य संग्रामात नव्हते त्यांना ‘मी स्वातंत्र्य संग्रामात होतो हे सांगण्याची मला गरज वाटत नाही….’ विधानसभा अध्यक्ष अवाक झाले. त्यांच्याकडे पहात राहिले… योगायोगाने बाबूजींच्या बरोबर जबलपुरच्या तुरुंगात १८ महिन्यांचा कारावास भोगलेले खामगावच्या राष्ट्रीय शाळेचे प्राचार्य पंधे गुरुजी सगळ्या पुराव्यांनिशी लोकमतमध्ये आले. त्यांचे निवेदन छापले गेले. ते वाचल्यानंतर दत्ता पाटील आणि गणपतराव देशमुख या दोघांनाही ‘आपले काहीतरी चुकले आहे’, हे जाणवले. त्यांनी मला फोन केला… ‘बाबूजींना भेटायचे आहे’ म्हणाले. मी त्यांना बाबूजींच्या नागपूरच्या घरी घेवून गेलो. बाबूजींनी त्यांचे हसत हसत स्वागत केले. हात धरून नाश्त्याला बसवले. त्यांचा अपराधी चेहरा म्हणत होता की… ‘विधानसभेत आम्ही जे काही आरोप केले…’ ते पुढे काही बोलणार तोच… बाबूजी म्हणाले, ‘दत्ताजी, ते सोडून द्या हो…. तुम्ही विरोधी पक्षात आहात… सरकारची कोंडी करणे तुमचे कामच आहे… चला फस्टक्लास नाश्ता करा…’
दुसरा विषय : बाबूजींच्या पत्रकारितेची सर्वात कमाल कशी की, बाबूजींनी सुरू केलेले द्विसाप्ताहिक लोकमत पहिल्यांदा यवतमाळ येथे सुरू केले. ६२ वर्षांपूर्वीचे यवतमाळ काय असेल? नंतर दहा वर्षांनी त्याचे साप्ताहिक आणि ९ वर्षांतून नागपूर येथून दैनिक आज ते अग्रगण्य दैनिक. हा प्रवास सोपा नाही. कष्टाचा, चिकाटीचा आणि जबर इच्छाशक्तीचा प्रवास आहे. महाराष्ट्रातील आजची सगळी मोठी वृत्तपत्रे शहरातून काही प्रमाणात खेड्यात गेली. त्यात मुंबईचा लोकसत्ता असेल… नवाकाळ असेल… महाराष्ट्र टाईम्स असेल…. सकाळ असेल… नवशक्ती असेल… ही सगळी मोठी वृत्तपत्रे शहरात प्रसिद्ध झाली आणि मग काहीप्रमाणात खेड्यात गेली. या देशात लोकमत हे एकमेव वृत्तपत्र असे आहे की, ज्याची सुरुवात द्विसाप्ताहिकाने झाली आिण खेड्यातून झाली. लोकमान्य टिळक यांचा ‘केसरी’ही सुरुवातीला द्विसाप्तािहक होता… पण तो पुण्यातून आणि त्याचे एवढे प्रचंड दिग्गज संपादक- देशाचे नेते लोकमान्य टिळक… देश स्वातंत्र्याच्या भावनेने पेटलेला… काळ वेगळा… नेते वेगळे.. त्या काळाची आणि त्या नेत्यांची कोणाशीही तुलना होणार नाही. त्यांच्यापुढे सगळेचजण लहान आहेत. (पण, योगायोग असा की, ‘लोकमत’ हे नाव लोकमान्य टिळक यांनी बापूजी आणे यांच्या साप्ताहिकासाठी सुचविले होते. आणि तेच साप्ताहिक बापूजींकडून बाबूजींनी चालवायला घेतले तेव्हा बापूजी आणे म्हणाले होते, ‘नवीन मंदिर उभारण्यापेक्षा जुन्या मंिदराचा जिर्णोध्दार करणे अिधक चांगले….’ बाबूजींनी त्यांना विचारले, ‘बापूजी, तुम्हाला रॅायल्टी किती द्यायची?’ बापूजी म्हणाले, ‘रॅायल्टी नको… राष्ट्रीय विचाराने वृत्तपत्र चालविन, हा शब्द मला दे…’ बाबूजींनी तो शब्द दिला आणि तो शब्द खाली पडू दिला नाही. )
खेड्यातून शहरात गेलेले आणि सगळ्यांनी स्वीकारलेले एकमेव दैनिक म्हणजे बाबूजींचे लोकमत…. हे यश सोपे नाही. आणि जे यश मिळाले ते बाबूजींच्या वैचारिक मजबूत भूमिकेवर मिळालेले आहे. गांधीजींकडून परवानगी घेवून व्यक्तीगत सत्याग्रहात बाबूजी उतरले, त्या दिवसापासून ते काँग्रेसचेच होते आणि शेवटपर्यंत काँग्रेस पक्षाशीच इनामदार राहिले. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही. आणि हयातभर खादीचे कपडे वापरणे यात त्यांनी बदल केला नाही. आपले वृत्तपत्र राष्ट्रीय विचारांशी आणि राष्ट्रीय विचाराच्या पक्षाशी त्यांनी कायमचे जोडले. एवढेच नव्हे तर राजकारणात सोयीनुसार जी पळापळ करतात तशी पळापळ बाबूजींनी कधीही केली नाही. काँग्रेसचा विचार स्वत: कायमचा अंमलात आणताना लोकमतला त्याच विचारांवर त्यांनी उभे केले अाणि लोकांनी ते स्वीकारले. पण, ते करत असताना त्यांच्या वृत्तपत्रावर त्यांना ‘काँग्रेच्या विचारांचे मुखपत्र’ असे छापण्याची कधीही गरज वाटली नाही. ते काँग्रेस पक्षाच्या सत्तेत राहिले. मंत्री राहिले… पण, काँग्रेस आणि सरकार जिथं चुकत असेल, तिथं लोकमतने आक्रमक भूमिका घ्यायला त्यांनी कधीही विरोध केला नाही. ते नागरी पुरवठा खात्याचे मंत्री असताना लोकमतचे मुख्य वार्ताहर मोरेश्वर बडगे यांनी त्या खात्यातील एक मोठी बातमी उघडकीला आणली. पण, बाबूजींना आधी विचारून घेवूया… म्हणून त्यांनी फोन केला… बाबूजींनी त्यांना फोनवर सांिगतले की,… ‘तुम्ही काय छापणार आहात, मला माहिती नाही… पण, तुमच्यावर विश्वास आहे. बातमी खरी असल्याशिवाय तुम्ही छापणार नाही. मी सरकारात आहे हे खरे आहे… माझ्या खात्याविरुद्ध बातमी आहे… हे ही खरे आहे… पण लोकमत सरकारमध्ये नाही. बातमी आवश्य छापा….’ बाबूजींना समजून घ्यायला अशा एक नव्हे तर असंख्य प्रसंगांचा मला साक्षीदार होता आले. त्यातूनच त्यांच्या जन्मशताब्दीच्या याच वर्षात ‘बाबूजी’ हा गौरवग्रंथ तयार झाला. २ जुलै १९२३ हा त्यांचा जन्मदिन. २ जुलै २०२३ रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होईल. आता जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. आणि्ा त्यांचा २५ वा स्मृतिदिन २५ नोव्हेंबरलाच आहे.
बाबूजींबद्दल जेवढं लिहायचं होतं तेवढं त्या ४०० पानी ग्रंथात आहे. कोरोनाचा भीषण काळ, रेल्वे बंद… रस्ते वाहतूक बंद… माझ्या पत्नीचे त्याच काळातील निधन… अशा अनेक अडचणींना आणि कौटुंबिक दु:खांना तोंड देवून तो गौरवग्रंथ तयार झाला. ती प्रेरणाही बाबूजींचीच. माझी १४ वर्षांची मुलगी असाध्य कॅन्सरने १९७८ साली देवाघरी गेली. आयुष्यातील तो मोठा पराभव. मी तिला वाचवू शकलो नव्हतो. २ महिने घरात बसून होतो. मन सुन्न होते. बाबूजी आणि ऊषाताई घरी भेटायला आले. तासभर बसले. माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, ‘भावेसाहेब, सिकंदराच्या घरीही कौटुंबिक दु:ख आलीच असतील…. जग जिंकायचा तो थांबला का? अापला पुरुषार्थ काम करत राहण्यात आहे. उठा आणि कामाला लागा…’ बाबूजींच्या त्या शब्दांनी केवढी हिम्मत मिळाली होती.
बाबूजींबद्दलची माझी आत्मियता तर्काच्या पलिकडची आहे. मी त्यांना आणखी एका कारणाने मानतो की, आयुषभर ते विचारावर आणि अापल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी कधीही आपला पक्ष बदलला नाही आणि भूमिकाही बदलली नाही. प्रसंग कठीण होता. इंदिरा गांधी काँग्रेसपासून वेगळ्या होवून त्यांनी ‘इंदिरा काँग्रेस’ पक्ष स्थापन केला. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक हे दिग्गज नेते इंदिरांजींपासून अलग झाले. बाबूजी ठामपणे एका विचारावर राहिले. नाईकसाहेब त्यांचे जिवाभावाचे मित्रच नव्हे तर बंधूच होते. पण, वैचारिक भूमिकेत हे नाते बाबूजींच्या आड आले नाही. सगळ्यांशी चांगले मैत्रीचे संबंध ठेवून बाबूजी इंिदरा गांधी यांच्यासोबत गेले. आजच्या प्रमाणेच त्यावेळी इंिदराजींच्या पाठिमागे दहशत, चौकशा, तुरुंगवास, अपप्रचार हे सर्व चालू होते. बाबूजींनी आमदार पदाचा राजीनामा देवून इंदिरा गांधींना अटक झाल्यावर त्यांनीही सत्याग्रह केला आणि तुरुंगात गेले. यासाठी एक निश्चित भूमिका लागते. परिणामांची पर्वा न करता आपल्या भूमिकेवर ताठ उभे रहावे लागते. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या अशा तीन पिढ्यांशी बाबूजींचा स्नेह. हा स्नेह नुसताच जपला नाहीत तर आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले. आज राहुल गांधी पदयात्रा करत आहेत… त्यांना प्रचंड पाठींबा मिळतो आहे. इंदिराजींना सगळ्यांनी घेरले असताना इंदिराजी विनोबांना भेटण्याकरिता पवनार येथे जाण्याकरिता नागपूरला बाबूजींच्या घरी आल्या. न्याहरीनंतर बाबूजींच्या घरून खुल्या जीपमध्ये उभ्या राहून त्या पवनारला गेल्या. बाबूजी त्यांच्यासोबत जीपमध्ये उभे राहिले. रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक इंदिराजींना पाठिंबा द्यायला उभे होते. त्या एका दिवसातील लोकांच्या पाठींब्याने इंदिराजींची खात्री पटली की, आपण सत्तेत असताना पराभूत झालो तरी, आता लोकांचा तो राग राहिलेला नाही. लोक आपल्यासोबत आहेत. बाबूजींनी हे सगळे चित्र देशभर पोहोचवले त्यावेळी आजच्यासारखे समाजमाध्यम नसताना. १९८० च्या लोकसभा निवडणुकीतील परिवर्तनाचे अनेक वाटेकरी असतील तरी इंदिराजी बरोबर राहिलेले बाबूजी त्यात आघाडीवर होते. आणि ही भूमिका घेताना एकेकाळच्या काँग्रेस विरोधातील जांबुवंतराव धोटे यांना बाबुजींनी काँग्रेस सोबत आणले. नागपूरमधून लोकसभेचे तिकीट दिले. इंदिराजींच्या पवनार भेटीच्या वेळी जीप चालवण्यासाठी धोटेसाहेब स्वत: बसले. लोकांना आश्चर्य वाटत होते. जांबुवंतरावांना काँग्रेससोबत आणायचे हे वि्ास्तव हातात धरण्यासारखे होते. पण बाबूजींनी विस्वव हतात धरला. हात भाजू दिला नाही… आणि निखाराही विझला नाही. जांबुवंतरावांना काँग्रेसमध्ये आणणे हे काम बाबूजींशिवाय कोणालाही करणे शक्य नव्हते. त्यावेळी विदर्भातील सगळ्या जागा काँग्रेसने विजयी केल्या. अशक्यप्राय वाटणारे राजकीय परिवर्तन १९८० साली झाले. ज्या जनतेने १९७७ साली इंदिरा गांधी यांना आणि त्यांच्या पक्षाला सत्तेतून पराभूत केले होते, त्याच मतदारांनी इंदिराजींना पुन्हा सत्तेवर बसवले. त्यात बाबूजींचे मोठे श्रेय होते. पण बाबूजी त्यामुळे हुरळून गेले नाहीत. १९८२ आणि १९८६ अशा दोन वेळेला (बाबासाहेब भोसले आणि शंकरराव चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ) बाबूजींना मंत्रीमंडळातून वगळण्यात आले. पण बाबूजी इंदिराजींना भेटायला जावून ‘मला मंत्री करा’ हे सांगायला कधीही गेले नाहीत. मंत्रीपद असो किंवा नसो, बाबूजींना कधीही कसलाही फरक पडला नाही. मंत्रीपद गेले म्हणून काँग्रेस सोडतो…. मंत्रीपद नाही म्हणून काँग्रेसपासून दूर जातो, अशी पळापळीची भूमिका त्यांनी आयुष्यात कधी घेतली नाही. राष्ट्रीय विचार, राष्ट्रीय पक्ष, राष्ट्रीय भावना यापासून बाबूजी तसूभरही दूर झाले नाहीत. १५ अॅागस्ट १९९७ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशीचा बाबूजींचा अग्रलेख वाचाल तर… त्यांचे राष्ट्रीय मन पार तळापर्यंत दिसेल. बाबूजी समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या प्रत्येक पैलूतून काही ना काही शि्ाकता येईल. आजच्या घाणेरड्या आणि पळापळीच्या राजकारणात बाबूजी हवे होते, असे अनेकदा वाटते. पण पुन्हा मनात विचार येतो की, असल्या घाणेरड्या राजकारणात बाबूजींची किती घुसमट झाली असती…
आज बाबूजी नाहीत… पण त्यांचे राष्ट्रीय विचार आणि देशातील राष्ट्रीय पक्ष हाच या देशाच्या प्रत्येक प्रश्नावरचे मूलभूत उत्तर आहे. सर्व जाती- धर्म गुण्यागोविंदांने नांदल्याशिवाय हा देश समर्थपणे उभा राहू शकणार नाही. जाती-धर्मांची भांडणे लावून सत्ता मिळेल, कारण लोक तर्कापेक्षा भावनेला जवळ करतात. पण, अशी सत्ता देशाला एकत्रित ठेवू शकणार नाही, बाबूजींचा हा विचार हाच या देशाच्या सर्व धर्म समभावाचा आणि घटनेच्या पावित्र्याचा विचार आहे. त्याच विचारांवर लोकमतने उभे रहावे, ही बाबूजींच्या २५ व्या स्मृतिदिनी अपेक्षा आहे. आज देशातील सगळ्यात श्रीमंत गौतम अदाणी यांच्या श्रीमंतीची बातमी पहिल्या पानावर सर्व वृत्तपत्रांत येते… देशातील सर्वात मोठा श्रीमंत शोधणे सोपे आहे… लोकमतने श्रीमंत कोण हे सांगण्यापेक्षा सर्वात गरीब कोण? हे शोधून काढावे आिण त्याच्या मागे उभे रहावे, हा बाबूजींचा विचार आहे.
बाबूजींना मनस्वी आदरांजली….
– मधुकर भावे
160 Total Likes and Views