मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या कसदार अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी दुपारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
गेल्या २० दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी वृषाली आणि कन्या असा परिवार आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत त्यांनी अखेरचे काम केले. तर नुकताच प्रदर्शित झालेला ‘गोदावरी’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला.
विक्रम गोखले यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तसंच त्यांच्या पोटात पाणी साचलं आणि नंतर यकृतही निकामी झाले. गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र दिवसागणिक एक-एक अवयव निकामी होत गेल्याने गोखले यांचं शरीर उपचारांना प्रतिसाद देईनासे झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. अखेर झुंज संपली. दोनतीन दिवसांपासून त्यांच्या तब्येतीविषयी अफवा पसरत होत्या. निधनाच्या बातम्याही पसरल्या. काही तर श्रद्धांजली वाहून मोकळे झाले होते. यावेळी मात्र त्यांच्या मृत्यूची बातमी अफवा ठरली नाही. एक मोठे पर्व संपले.
193 Total Likes and Views