“आपल्याला पुन्हा सत्ता आणायचीय. महिला असो की पुरुष, मुख्यमंत्री आपलाच असेल” असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात केले त्यामुळे ठाकरे यांच्या मनातील महिला मुख्यमंत्री कोण? ह्या चर्चेला तोंड फुटले आहे. एवढ्यात निवडणुका नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार अस्थिर आहे. पण लगेच पडेल अशातला विषय नाही. मग उद्धव यांनी हे पिल्लू उगाच सोडून दिले का? महिला मुख्यमंत्री असे उद्धव का म्हणाले? त्यांच्या डोक्यात कुठले नाव आहे का? की त्यांनी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांना तसे वचन दिले आहे? त्यामुळे की काय त्यांनी आतापासून महिला मुख्यमंत्री देण्याची भाषा सुरु केली आहे? ते आजारी होते तेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून रश्मी यांच्या नावाची चर्चा होती. उद्धव एकदा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून यायचे आहे काय? त्यांचे मन भरले नाही? तसे असलेही तरी नव्या परिस्थितीत शरद पवार पुन्हा त्यांच्याकडे नेतृत्व देतील काय? २०२४ चे राजकारण कसे असेल? उद्धव यांच्या मनात काय? उद्धव यांच्या विधानाने राजकारण तापले आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत २० मुख्यमंत्री झाले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. वसंतदादा पाटील ३ वेळा होते. शंकरराव चव्हाण,विलासराव देशमुख, अशोक चव्हाण प्रत्येकी दोन वेळ मुख्यमंत्री राहिले. पण महाराष्ट्राने अजून महिला मुख्यमंत्री पाहिला नाही. त्यामुळे भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवायचे झाले तर ती भाग्यवान कोण असेल? ती गुळाचा गणपती नसावी. सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता ठेवणारी असावी अशीच राज्याची अपेक्षा असेल. अशी कोण दमदार महिला आहे? सध्यातरी चार नावं पुढे येतात. अर्थात पहिले नाव रश्मी ठाकरे यांचे असेल. अर्थात महाआघाडी चालू राहिली आणि शरद पवारांना मान्य झाले तरच रश्मी यांचे नाव ओके होईल. पण पवारांच्या मनात काय असेल ते सांगता येत नाही. पवार आपल्या मुलीचे म्हणजे सुप्रिया सुळे यांचे नाव चालवू शकतात. सुप्रिया ह्या चार वेळच्या खासदार आहेत. म्हणजे अनुभवी आहेत. पण राष्ट्रवादीला आघाडीत सर्वाधिक जागा मिळाल्या तरच सुप्रिया यांचे जमेल. अर्थात पवारांना त्यासाठी आपला पुतण्या अजितदादा याचा पत्ता कापावा लागेल. महाआघाडीमध्ये कॉन्ग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या तर अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांची लॉटरी लागेल. अर्थात कॉन्ग्रेसमध्येही वर्षा गायकवाड आणि प्रणिती शिंदे प्रबळ दावेदार बनू शकतात.
शेवटी हे राजकारण आहे. २०२४ मध्ये पत्ते कसे खुलतात त्यावर खेळ आहे. भाजपला बहुमत मिळाले आणि महिला मुख्यमंत्री देण्याचे वारे जोरात चालले तर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचे घोडे गंगेत न्हाईल. ‘मी लोकांच्या मनातली सीएम आहे’ असे पंकज ह्या आधी म्हणाल्या आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांना हे नाव कबूल होईल का? २०२४ चे राजकारण मोठे रोमांचक असेल.
273 Total Likes and Views