मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरई खंडपीठानं मोठा निकाल देताना संपूर्ण तामिळनाडूमधल्या मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश तामिळनाडू सरकारला दिले. मंदिरात शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हे निर्देश दिल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. २४ तास मोबाईल कानाला लावून असणाऱ्या भक्तांना हा मोठा तडाखा आहे.
मोबाईलवर बोलणाऱ्यांचा त्रास अनेकांना होतो. पण कुणी तक्रार करीत नाही. पण हे सुब्रह्मण्यमस्वामी मंदिर मात्र थेट कोर्टात धावले होते. मंदिर प्रशासनाने आपल्या मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, आदेश देताना न्यायालयाने संपूर्ण राज्यातील मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिरात पावित्र्य आणि शुद्धता राखली जावी, यासाठी मोबाईल फोनवर बंदी असावी, असं या आदेशांत म्हटलं आहे.
‘मंदिराच्या व मूर्ती आणि पूजाविधींचे फोटो काढले जातात. त्यामुळे इतर भक्तांना त्याचा त्रास होतो’, असा युक्तिवाद मंदिरातर्फे करण्यात आला होता. यावर निकाल देताना न्यायालयाने फक्त सुब्रह्मण्यमस्वामी मंदिरातच नाही, तर राज्यातल्या सर्वच मंदिरांमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले. तसेच, भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिराच्या बाहेरच मोबाईल फोन ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात यावी, असेही आदेश दिले.
कोर्टाचा आदेश चांगला आहे. पण तो व्यवहारात येऊ शकतो का? हा प्रश्न आहे. कुठल्याही मंदिरात दर्शनाला येणाऱ्यांची संख्या काही हजारात असते. तेवढे लॉकर्स ठेवणे आणि ते सांभाळणे सोपे नाही. पण आदेश स्वागतार्ह आहे. तमिळनाडूत हा प्रयोग यशस्वी झाला तर देशात इतरत्र तो लागू करता येईल. कारण मोबाईल त्रासाने मंदिरंच नव्हे तर खूप साऱ्या व्यवस्था त्रासल्या आहेत. तुम्हाला काय वाटते? महाराष्ट्रातही मंदिरांमध्ये मोबाईल बंदी आणायची का? तुमचे मत कळवा.
73 Total Likes and Views