गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवरील पुल दुर्घटनेची शाई वाळते न वाळते तोच बल्लारशहा येथे रेल्वे फुट ओव्हर ब्रीजची दुर्घटना घडली आहे.एका महिन्याच्या आत घडलेल्या या दोन पुल दुर्घटनांनी पुन्हा एकदा निष्पापांचे बळी घेतले आहे. जणुकाही मानवी जीवनाचे काही मुल्य नसल्यासारखे सामान्यजन अशा प्रशासकीय मुर्दाड पणाचे बळी ठरत आहेत. भलेही बल्लारशहा येथील बळी संख्या सुदैवाने मोठी नसली तरी ‘हर जान किमती’ हे विसरून कसे चालणार? अशा दुर्दैवी घटनानंतर आर्थिक मोबदल्याच्या घोषणा जरूर होतात मात्र गेलेल्या जीवांचे काय हा प्रश्न अनुत्तरित राहतोच. काही दिवस माध्यमांत याची चर्चा होते आणि पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या प्रमाणे जगरहाटी सुरू राहते. परंतु यातून धडा शिकून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन फारसे उत्सुक दिसत नाही.
*झाले काय तर बल्लारशहा स्थानक हे मध्य रेल्वे अंतर्गत दक्षिणेकडील शेवटचे जंक्शन आहे. एनजीएसआर अर्थातच निझाम्स गॅरंटीड स्टेट रेल्वे, हैदराबाद तर्फे स्थापित हे स्थानक भारतीय रेल्वेच्या मालकीचे असून सध्या त्याचे प्रचलन मध्य रेल्वे करत आहे. अत्यंत मोक्याच्या जागी असलेले हे रेल्वे स्थानक पाच फलाट आणि आठ मार्गांनी (ट्रॅक्स) युक्त आहे. २०१४ ला या स्थानकाला सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. एवढ्या महत्वाच्या स्थानकाला मात्र २७ नोव्हेंबर २०२२ रविवारला गालबोट लागलं. जवळपास पन्नास वर्षे जुन्या पुलाला भगदाड पडून एक महिला मृत्युमुखी पडली तर जवळपास पंधरा ते वीस व्यक्ती जखमी झालेत. सुदैवाने अपघाताच्या वेळी त्या मार्गाने कोणतीही रेल्वे जात नव्हती अन्यथा बळींची संख्या निश्चितच वाढली असती.*
*नेहमीप्रमाणे अपघात होताच सावरासवर सुरु झाली. लगेचच चार अधिकारी निलंबीत झाले तर बळी, पीडीतांवर मोबदल्यांचा वर्षाव झाला. मात्र या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना कोण शिक्षा देणार हा प्रश्नच आहे, केवळ निलंबनाने रेल्वेचे हे पाप कसेकाय धुवून निघणार?. प्रवाश्यांच्या सुरक्षीततेची सर्वस्वी जबाबदारी रेल्वेवर असताना एक महिलेचा जीव का गेला? रेल्वेतर्फे या अपघातासाठी फुट ओव्हर ब्रीजचा प्री कास्ट स्लॅबचा एक तुकडा पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र पीडीतांच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले त्याचे काय? आप्तांचे मरण आणि जन्मभरासाठी जखमा, अपंगत्व घेऊन जगणाऱ्यांचा आक्रोश कोण ऐकणार? आर्थिक मोबदल्याच्या मलमपट्टीने पीडीतांना खरोखरच न्याय मिळेल काय? पन्नास वर्षे जुन्या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते काय, देखभाल दुरुस्तीचे नेमके काय झाले होते ते समोर येणे गरजेचे आहे.*
*केवळ बल्लरशहा दुर्घटना कशाला थोडं मागे जरी डोकावून पाहिले तरी आपल्याला कमीतकमी तीन चार पुल दुर्घटना लक्षात येतात. २ऑगस्ट २०१६ ला कोंकणात सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने जवळपास चाळीस जणांना जलसमाधी मिळाली. तर ३० सप्टेंबर २०१७ मुंबईत एलफिन्स्टन पुलावर चेंगराचेंगरीत २२ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. अगदी अलीकडचे उदाहरण सांगायचे झाले तर मोरबी पुल दुर्घटनेबाबत बोलता येईल. जवळपास दिडशे वर्षे जुना हा सस्पेंशन पुल कलात्मकता आणि तंत्रज्ञानाचा चमत्कार मानला जात होता. मात्र नुतनीकरणाच्या पाचव्याच दिवशी हा पुल कोसळला आणि जवळपास दिडशे व्यक्ती प्राणाला मुकल्या.*
*अगदी याच धर्तीवर नागपूरचा अजनी रेल्वे पुल एखाद्या दुर्घटनेची वाट बघत आहे असे वाटते. हिंदीत एक म्हण आहे “हद से जादा बुढे व्यक्ती और बुढे मकान को छेडना नहीं चाहिए”. मात्र सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त जुन्या अजनी रेल्वे पुलाला रोज तुडवले जात आहे. खबरदारी म्हणून येथून जड वाहनांना लोखंडी खुट्या गाडून प्रवेश बंदी केलेली आहे. खरंतर आशा खुटीऊपाड उपाययोजनांनी मुळ समस्या कशी काय सुटणार हे कोडेच आहे. या जुनाट पुलावर एकाचवेळी दुचाकी चारचाकी मिळून जवळपास शंभर वाहने असतात. सकाळ संध्याकाळी म्हणजेच रश अवरच्या वेळी तर वाहतुकीची कोंडी ठरलेलीच असते. एकदोन मिनिटांच्या प्रवासाला कमीतकमी दहापंधरा मिनिटे वेळ लागतो. यांत बहुमुल्य वेळ आणि इंधनाची नासाडी होते ते वेगळंच.*
*बरं या अजब पुलाची गजब कहाणी वेगळीच आहे. संबंधित प्रशासनाला पुलाच्या जर्जर अवस्थेची चांगलीच कल्पना आहे परंतु घोडं कुठे पेंड खातंय हेच कळायला मार्ग नाही. त्यातही या पुलाच्या दोन्ही बाजू वैशिष्ट्य पुर्ण आहेत. अजनी कॉलनी कडे हा पुल संपताच सिमेंट रोडचा दुभाजक तुमच्या समोर दत्त म्हणून हजर राहतो. तर रेल्वे स्थानकाकडच्या बाजूला तिवाड,तीठा (तीन मार्ग एकत्र येतात ती जागा) आहे. तुम्हाला कमीतकमी तीन डोळे असल्याशिवाय तुम्ही येथून सही सलामत जाऊ शकत नाही. कारण एक मार्ग अजनी चौकाकडून येतो, मधला मार्ग जेल चौकाकडून येतो तर तिसरा मार्ग अजनी रेल्वे स्थानकाकडून येतो. त्यातही लोखंडी खुट्यांमुळे कोण कुठून घुसेल याचा नेम नाही. अगदीच तुम्ही संत महात्मे असल्याशिवाय शिव्यांची बाराखडी न म्हणता इथून जाणे केवळ अशक्य आहे.*
*निश्चितच १००% अपघात होणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकणार नाही. मात्र अशा अपघातातून धडा घेऊन भविष्यातील संकटे टाळता येईल किंवा त्याची तीव्रता तरी कमी करता येईल. तशी मानसिकता प्रशासनाला असणे आवश्यक आहे. चलता है म्हणून याकडे कानाडोळा करणे चुकीचे आहे. चौकशीचे थातुरमातुर सोपस्कार असोत की सुरक्षेबाबत उदासीनता असो, यांत सामान्यांचा हकनाक बळी जातो. तारीख पे तारीख च्या दुष्टचक्रात पिडीतांचे अश्रू आटून जातात. पीडीतांचे दुःख, वेदना, आक्रोश, संताप, संवेदना मातीमोल ठरल्या जातात. परत एकदा मृत्यूचे हे झुलते सापळे नवीन सावज टिपायला टपून असतात.*
*वास्तविकत: जुन्या जीर्ण पुलांबाबत त्यांची उपयोगीता, क्षमता, त्यांच्यावर वातावरणाचा प्रभाव, काळानुसार वाढलेली लोकसंख्या,रहदारी याचा ताळमेळ लागतो काय याचा विचार करायलाच हवा. स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार किती उपाययोजना केल्या जातात? शिवाय अशा कामांना किती महत्त्व दिले जाते, किती तत्परतेने अशा बाबी पूर्ण केल्या जातात, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. अर्थातच निर्जीव पुले, तारा, बांधकाम स्वतः काय सांगणार? तरीपण ‘पुलों का तारों का सबका कहना’ आपल्याला ऐकावाच लागेल. अरूंद पुल, ढासळणाऱ्या भिंती, जंग खाल्लेले लोखंडी खांब, उखडलेले प्लास्टर, गळणाऱ्या भिंती, छिद्रे पडलेले पुल पत्रे यांची वेळीच दखल घेणे आवश्यक आहे अन्यथा अशा दुर्घटना कधीही घडू शकतात.*
*********************************
दि. ०३ डिसेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++
265 Total Likes and Views