१२ डिसेंबर. हा दिवस एका व्यक्तीच्या वाढदिवसाचा दिवस राहिलेला नाही. तो महाराष्ट्राच्या सामुदायिक आनंदाचा दिवस झालेला आहे. श्री. शरद पवार या दिवशी ८२ वर्षे पूर्ण करून ८३ व्या वर्षांत पाऊल ठेवत आहेत. ८ मजले चढून झाले आहेत. नवव्या मजल्याच्या दोन पायंड्या चढून अाता तिसऱ्या पायंडीवरती ते उभे आहेत. त्यांनी आणखी १७ पायंड्या चढावे… शतक पूर्ण करावे… बिनबाद रहावे… ही आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राची प्रार्थना आहे. पुढच्या काही वर्षांत तर शरद पवारसाहेबांची सगळ्यात मोठी गरज महाराष्ट्रासाठी आहे. त्यांच्या नेतृत्त्वाची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्राची उस्कटलेली सगळी शिवण पुन्हा पूर्ववत करणारा एकमेव नेता म्हणून आज पवारसाहेबांकडे महाराष्ट्र पाहतो आहे… राजकारणाचा चिखल, राजकारणातील धटिंगणपणा हे सगळे महाराष्ट्राला असह्य होणारे घाणेरडे वातावरण दुरूस्त करायचे असेल तर, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे राजकारणी म्हणून श्री. शरद पवार यांच्याखेरिज दुसरे नाव महाराष्ट्राजवळ आज नाही. या बिघडलेल्या महाराष्ट्राला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी शरद पवारसाहेब त्याच आवेषात मैदानात उतरणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे नासवलेले राजकारण उबग आणणारे आहे. देशाला दिशा देणारा हाच का तो महाराष्ट्र? तो आज कोणाच्या हातात गेला आहे? तोडफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्राचे कसे धिंधवडे झाले आहेत? पवार साहेबांच्याखेरिज हे सगळे दुरूस्त करणाऱ्या नेत्याचे दुसरे नाव कोणते आहे? आणि म्हणून पवारसाहेबांचा वाढदिवस हा उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही. िबघडलेल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा लोकशाहीच्या सभ्य संकेतांनी उभा करणारा नेता हवा आहे. त्यामुळे १२ डिसेंबर हा दिवस चिंतनाचाही दिवस असायला हवा. महाराष्ट्रात गेल्या ८-१० वर्षांत काय बिघडले? त्यापूर्वी आपण कुठे जायचे ठरवले होते? विकासाची ध्येये काय होती? नेमका रस्ता कोणता होता? ज्या थोर न्ोत्यांनी या महाराष्ट्राची बांधणी केली… महाराष्ट्राने जी पुरोगामी धोरणे स्वीकारली ती धोरणे कायदा होवून देशासाठी आदर्श िनर्माण करणारा महाराष्ट्र ठरला. आज ते सगळे हरवल्यासारखे वाटत आहे. तोच महाराष्ट्र होता… ज्याने देशाला ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा दिला. तोच महाराष्ट्र होता… त्याने ‘द्विभार्या प्रतिबंधक कायदा’ करून सुसंस्कृत महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण केली. तोच महाराष्ट्र होता…. ज्याने खाजगी वाहतुकीचे राष्ट्रीयकरण करुन ‘गाव तिथे एस. टी.’ पोहोचवली. शिक्षणाची मक्तेदारी मोडून काढून ‘गाव तिथे शाळा’ उभा राहिल्या…. किमान आणि समान मजुरी याचे िनयम ठरले. कामगार आणि शेतकऱ्यांना झुकते माप दिले पाहिजे, या भूिमका घेतल्या गेल्या. शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून ‘ज्वारी खरेदी’, ‘कापूस एकािधकार खरेदी’ हे पुरोगामी कायदे आणले गेले. राेजगार हमी योजना आणली… देशाने ती योजना ‘न. रे. गा.’ कायदा म्हणून स्वीकारली… महिला आयोगाची िनर्मिती झाली. ४० मोठी धरणे उभी राहिली. हजारो मेगाव्हॅट वीजनिर्मिती त्याच काळातील आहे. ग्रामीण भागात उद्योग जाण्यासाठी एम. आय. डी. सी. स्थापन झाली. पंचायत राज, जिल्हा परिषद व्यवस्था आली. ग्रामीण भागातील सर्व जाती-धर्माच्या तरुणांना राजकीयदृष्ट्या प्रशिक्षित करून या व्यवस्थेने प्रशासनात हिस्सेदारी दिली. शिक्षण ही शहराची मक्तेदारी राहिली नाही. ग्रामीण भागात सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व्यवस्था झाली. शेतीच्या पाणी नियोजनाचा… सहकारी कारखानदारीचा… त्यातून ग्रामीण रोजगारीचा मार्ग याच महाराष्ट्राने प्रशस्त केला. मग ते यशवंतराव असतील… वसंतदादा असतील… वसंतराव नाईक असतील… शंकरराव चव्हाण असतील… शरद पवार असतील… या सर्वच नेत्यांनी महाराष्ट्राची घडी बसवण्याकरिता कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी केली. आज तो महाराष्ट्र उद्धवस्त झाल्यासारखा आहे. राजकीय सौदेबाजी… सत्तेसाठी पैशांच्या जोरावर होणारी फोडाफोडी… हे सगळे अितशय विकृत चित्र या महाराष्ट्रात खुलेआम रस्त्यावर िधंगाणा घालत आहे. ही फोडाफोड कशी होते… त्याची साधने काय… लोकांना सर्वकाही मािहती आहे. जात, पैसा, सत्ता अशा तिन्ही अपप्रवृत्तींनी करकचून आवळून टाकलेली लोकशाही कमालीची संकाेचलेली आहे. या सगळ्या स्थितीमध्ये महाराष्ट्र वाटचाल करतो अाहे. ग्रामीण भाग उद्ध्वस्त होत आहे… बेराेजगार आणि बेकार यांचे प्रश्न तीव्र झाले आहेत… महागाई कमालीची नुसती वाढली नाही तर जगणे अश्ाक्य करणारी ठरली आहे. या सगळ्या स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या सामान्य माणसांचा विचार सोडून बाकी सगळे िधंगाणे महाराष्ट्रात सुरू आहेत. आजचे सत्ताधारी नेते महाराष्ट्राच्या हिताच्या विचारांपासून खूप दूर आहेत. ग्रामीण भागाच्या विचारांपासून मैलोंगणती लांब आहेत. राजकीय साठमारीमध्ये आज महाराष्ट्राची अवस्था केविलवाणी झालेली आहे. अशा या कडेलोटाच्या टोकावर महाराष्ट्र अालेला असताना पवारसाहेबांच्या या वाढदिवशी त्यांचे अिभनंदन करताना हा महाराष्ट्र दुरूस्त कसा होणार… हाच मुख्य प्रश्न आज चर्चिला गेला पाहिजे. आणि हे कोण करणार? अाजचे राज्यकर्ते सभ्यता, सुस्ांस्कृत राजकारण यापासूनही फार लांब आहेत. विकासाची कोणती दृष्टी आजच्या राज्यकर्त्यांजवळ आहे? पत्रकारितेचा किती संकोच झालेला आहे. याच महाराष्ट्राने विकासाची जी झेप घेतली होती, ती झेप आज कुठे आहे? तसा विचार करण्याचा आवाका असलेली राज्यकर्त्यांची मानसिकता तरी आहे का?
याच महाराष्ट्राने कार्यकर्त्यांच्या पिढ्याच्या िपढ्या घडवल्या. त्याच महाराष्ट्रात आज राजकारणातील मुख्य निकष पैसा हाच राहिलेला आहे. सत्ताधारी पक्षाचे सर्वोच्च नेतेच महाराष्ट्राच्या दैवतांची विटंबना करू लागले आहेत… त्याबद्दलची कसलीही लाज-शरम त्यांना वाटत नाही. अशा वेळी पवारसाहेब, केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठीच नव्हे तर, महाराष्ट्राच्या आत्मसन्मानासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. तुमचे वय तुम्हाला िकती साथ देईल मािहती नाही… पण, तुमची इच्छाशक्ती इतकी जबरदस्त आहे की, तुम्ही नुसता आवाज देण्याची गरज आहे. महाराष्ट्र शांततामय मार्गाने या आत्मसन्मानासाठी रस्त्यावर उतरेल… उत्तराखंडमधून कोणीही यावे…. घटनात्मक पदावर बसावे आणि महाराष्ट्राच्या दैवतांची िवटंबना करावी, हे महाराष्ट्र किती काळ सहन करणार? या पूर्वीचे महाराष्ट्राचे सर्व राज्यपाल किती सुसंस्कृत होते. आता हे जे राज्यपाल आणून बसवले आहेत, त्यांना हटवण्याची मागणी होत आहे… पण, ज्या उद्देशाने त्यांना केंद्रीय गृहमंत्र्ाालयाने इथे आणले आहे, त्याच भूमिकेने ते काम करत आहेत. आजपर्यंत असे कधी घडले का? की राज्याच्या मंत्रिमंडळाने एकमताने प्रस्ताव करून विधान परिषद आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली… राज्यपालांनी ती दाबून ठेवली… का दाबून ठेवली? त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना होत्या…. ‘काय वाट्टेल ते झाले तरी ही यादी मंजूर करायची नाही…’ उच्च न्यायालयाने झापल्यावरसुद्धा राज्यपालांनी ही यादी दाबूनच ठेवली. लोकशाही संकेतांना फाट्यावर मारण्याचे ठरवूनच रेटून सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि महाराष्ट्र शांतपणे ते पहात आहे. राज्यपालांनी केंद्रीय हुकूमाचे ताबेदार हाेवून त्याप्रमाणे निर्णय होवू दिला नाही. आता तर या राज्यपालांना २०२४ च्या निवडणुकांपर्यंत बदलतील, असे वाटतच नाही.
ज्या छत्रपती शिवरायांना राष्ट्रीय नेते म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांची बदनामी करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील आजचे मुख्यमंत्री असतील…. उपमुख्यमंत्री असतील… केंद्रात बसलेले महाराष्ट्राचे प्रतिनिधी असतील… कोणीतरी एका शब्दाने आवाज उठवला? हे सगळे कट केल्यासारखे ठरवून चाललेले आहे. विकास कामांची चर्चा हा विषयच वेगळा आहे. पण, जिथे-जिथे शक्य आहे तिथे ितथे महाराष्ट्राला ठेचून काढायचे, यासाठी ही सगळी षडयंत्रे अाहेत. ६० वर्षांपूर्वी ज्यांना मुंबई हवी होती, ती मुंबई त्यांना पळवता आली नाही. मुंबई केंद्रशासीत करता आली नाही. स. का. पाटील यांचा तो डाव होता. ते मराठी नेते होते. पण, त्यांचा वापर दुसरे कोणीतरी करीत होते. ६० वर्षांनंतर नेमके असेच घडत आहे.
६० वर्षांपूर्वीचा हा चुकलेला हिशेब दुरूस्त करण्याची ही सगळी तयारी आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मुंबईवर आपल्याला कब्जा करता येत नाही… मग, मुंबईला अार्थिक आघाडीवर दुबळी करा… महाराष्ट्राला दुबळे करा… उद्योग पळवा… मुंबईतील मोठे उद्योग हलवा… हिरे व्यापार मुंबईबाहेर न्या… ज्या उद्योग- अलंकारांनी मुंबईचे महत्त्व डोळ्यांत भरते आहे, ते सगळे उद्योग मुंबईतून एकदा बाहेर नेले की, कंगाल मुंबई घेवून महाराष्ट्राने बसावे, असा हा सगळा काहीतरी भयंकर डावपेच दिसतो आहे. तिन्ही बाजूंनी महाराष्ट्राला घेरण्याचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांना धमकावण्याची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची हिम्मत होते…. आणि हे आमचे इथले वाचाळवीर असलेले मंत्री कर्नाटकाचे दौरे रद्द करतात. महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेले काय वकूबाचे लोक आहेत? दुसऱ्या बाजूने घटनात्मक प्रमुख असलेल्या पदावरील नेत्यानेच महाराष्ट्राच्या दैवतांना बदनाम करण्याची भूमिका सरू करावी… यापूर्वी महात्मा फुले आणि सावित्रिबाई फुले यांची बदनामी झाली होती. आता छत्रपतींनाच बदनाम केले जात आहे. हे सगळे महाराष्ट्र मुकाटपणे सहन करतो आहे आणि म्हणून आजच्या घडीला महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांपेक्षा महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाचे प्रश्न अधिक प्रतिष्ठेचे झालेले आहेत. संयुक्त महाराष्ट्रासाठी हातात मशाल घेवून उतरलेला महाराष्ट्र आज निपचित कसा पडला?
म्हणून पवारसाहेब, १२ डिसेंबरच्या तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा देताना एवढेच सांगणे आहे की, महाराष्ट्राचे सांस्कृतिक लचके तोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तुमच्यासारख्या नेत्यांनी गांधी-नेहरू यांच्या मार्गाने रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली पाहिजे. काय वाट्टेल ते सहन करू… महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का लावणाऱ्यांना हा महाराष्ट्र कधीही सहन करू शकणार नाही. हा आवाज तुम्ही द्या… तुम्ही बोललात तरच महाराष्ट्र हालणार आहे… आज आचार्य अत्रे हवे होते… त्यांचा “मराठा” हवा होता. आज बाळासाहेब ठाकरे हवे होते…. आज उद्धवराव पाटील, एन. डी. पाटील हवे होते. विदर्भात जांबुवंतराव हवे होते…. संयुक्त महाराष्ट्र राज्य द्यायचे ठरवल्यावर त्या राज्याचे नाव ‘महाराष्ट्र राज्य’असे न देता ‘मुंबई राज्य हे नाव द्यायचे,’ असे जाहीर झाले… अत्रेसाहेबांनी ‘मराठा’मध्ये कडाडून अग्रलेख लिहिला…. ‘याद राखा…. आमचे नाव महाराष्ट्रच’ मग सरकारने सांगितले की, आम्ही मुंबई कंसात (महाराष्ट्र) घालणार आहोत. अत्रेसाहेब पुन्हा कडाडले… ‘आईच्या पोटात मुलगी की, मुलीच्या पोटात आई…’
पवारसाहेब, आज असे कडाडणारे कोणी राहिले नाही. हातातील कायदे वापरून सत्ताधाऱ्यांनी भय निर्माण केलेले आहे. जो महाराष्ट्र ब्रिटीशांना घाबरला नाही… ज्या गांधीजींनी ‘चले जाव’ घोषणा करण्यासाठी गुजरातमधील ‘अहमदाबादची’ निवड न करता मुंबई शहराची निवड केली. ज्या मुंबई शहराने “चले जाव” चा नारा दिला. त्याच मुंबई- महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या आत्मसन्मानासाठी ‘महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करणाऱ्यांनो चले जाव….’ ही घोषणा द्यायची वेळ आलेली आहे. आज आपण गप्प बसलो तर, छत्रपतींची बदनामी अजून केली जाईल. उद्या मुंबई केंद्रशाशीत ठेवण्याचा डावसुद्धा खेळला जाईल. चारही बाजूंनी महाराष्ट्राच्या शत्रूंनी जोर केलेला आहे. ‘तुमच्या मराठी नेत्यांना राज्यावर बसवूनच महाराष्ट्राची बदनामी आम्ही किती करू शकतो,’ या पद्धतीने खिजवले जात आहे! आणि आमचे राज्यकर्ते मूग गिळून गप्प बसले आहेत. महाराष्ट्राच्या आत्मसन्मानावर आघात होत असताना सत्तेवर बसणारे का कडाडत नाहीत? हा प्रश्नही विचारण्याची वेळ आलेली आहे. केंद्र सरकारच्या वळचणीला उभे राहून महाराष्ट्राचे राज्य चालवले जात आहे. तो महाराष्ट्र कुठे होता…. आजचा महाराष्ट्र कुठे आहे… पवारसाहेब, या सर्व प्रश्नाला हात घालणारा एकमेव नेता म्हणून महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतो आहे. तुमच्या ८३ व्या वर्षातील पदार्पणाच्या दिवशी आम्हा सगळ्यांचे आयुष्य तुम्हाला मिळो, अशी प्रार्थना. पण, तुम्ही आवाज देवून या सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरा…. कदाचित संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आणखी एक एल्गार तुमच्या नेतृत्त्वाने आवाज देण्यासाठीच थांबलेला आहे. महाराष्ट्राची तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे . गांधीजींच्या मार्गानेच ही मस्ती उतरवता येईल. महाराष्ट्राच्या आत्मसन्मानासाठी हे केलेच पाहिजे आणि त्याचे नेतृत्त्वही तुम्हीच केले पाहिजे.
एकट्या उदयनसिंह राजे यांनी संताप व्यक्त करून हे पुरेसे ठरणार नाही. हा त्यांच्या घराण्याचा अपमान आहेच… पण, तो महाराष्ट्राचाही अपमान आहे. उदयनराजे यांच्याबरोबरच महाराष्ट्रालाही तेवढा संताप आला पाहिजे. आणि म्हणून पवारसाहेब, तुम्ही आवाज द्या. तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा वाढदिवस महाराष्ट्र साजरा करील….
तुम्हाला वाढदिवसानिमित्त लाख -लाख शुभेच्छा! – मधुकर भावे
172 Total Likes and Views