गुजरात…भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय

Editorial
Spread the love

              देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.  भाजपपुढे कॉन्ग्रेस आणि आम आदमी पक्षाचा सफाया झाला.  भाजप जिंकेल हे अपेक्षितच होतं.  पण एवढ्या विक्रमी  जागांनी जिंकेल असे  वाटत  नव्हते.   इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८५ च्या निवडणुकीत  कॉन्ग्रेसने  गुजरातमध्ये  १५० जागा जिंकल्या होत्या.   तो विक्रम  भाजप मोडताना दिसत आहे.   गेली २७ वर्षे भाजप ह्या राज्यात सलग  सत्तेत आहे.    ‘सरकारविरोधी मत’ असा विषय असताना  भाजपने  सातव्यांदा   विजय कमावला आहे.  कॉंग्रेसला  २०ही जागा मिळणार नाहीत.

               सारे राजकीय विश्लेषक ह्या  निकालाचे श्रेय  पंतप्रधान नरेंद्र मोदींना देत आहेत.   मोदींची मेहनत तर आहेच. पण कॉन्ग्रेसला विजयाची इच्छा होती का? हा मुलभूत प्रश्न आहे.  निवडणूक कशी लढवायची नाही याचा नमुना म्हणजे  कॉन्ग्रेसने  लढवलेली ही निवडणूक आहे.  कॉन्ग्रेसने गुजरातला बेवारस सोडले होते.  मोदींनी गुजरातमध्ये ३१ सभा केल्या.  अमित शहा यांनी २३ सभा केल्या. त्या शिवाय देशभरातले भाजपने नेते  इथे भिडले  होते.  मात्र कॉन्ग्रेसकडे चेहराच नव्हता.    राहुल गांधी भारत जोडोमध्ये भिडले होते.  राहुलबाबाने फक्त  एक दिवस  गुजरातमध्ये दोन सभा केल्या. त्या पलीकडे ते  फिरकलेही नाहीत.  नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी  पक्षाला  ताकद  देणे तर दूर राहिले. उलट अडचण केली.  खर्गे यांनी मोदींना रावण म्हटले. त्यामुळे ‘गुजराती अस्मिता’ जागी झाली.   पाटीदार समाज हा गुजरातमधला एक    दबंग समाज आहे. गेल्या निवडणुकीत  पाटीदार समाज कॉन्ग्रेससोबत होता. यावेळी ह्या समाजाचे  नेते  हार्दिक पटेल,  अल्पेश ठाकोर   भाजपमध्ये होते.    पाटीदार सोबत आल्याने  भाजपचा ग्राफ वाढला.  मुस्लिमांची मतेही  भाजपला मिळाल्याचे अनेक जागी दिसते. हा चमत्कार आहे.  ह्या निवडणुकीत भाजपला ५३ टक्के मते मिळाली.   कॉन्ग्रेसला २६ टक्के तर आम आदमी पक्षाला १२ टक्केवर थांबावे लागले.

                गुजरातच्या निवडणुका नेहमी दुरंगी होत आल्या.  भाजप आणि कॉन्ग्रेस यांच्यात   मुकाबला असायचा. ह्या वेळी  आम आदमी पक्षाच्या एन्ट्रीमुळे  रंग बदलला.    आम आदमी पक्षाने कॉंग्रेसची मते खाल्ली.  त्यामुळे कॉन्ग्रेसला तोंड दाखवायला जागा उरली नाही.  ‘दिल्ली महापालिका तुम्ही घ्या आणि गुजरात आमच्यासाठी सोडा’ असे काही ठरले होते का? आप आणि भाजप यांच्यात गुप्त  समझोता झाल्याची  कुजबुज आधीही होतीच. आता   लोक उघड बोलू लागले आहेत. आपला भाजपची बी टीम म्हटले जाते. त्यामुळे  तसे असेल व नसेलही. पण चर्चेला जागा आहे.  दुसऱ्या  टप्प्यात अरविंद केजरीवाल  गुजरातमध्ये  फारसे ताकदीने  फिरले नाहीत.  मोदींनी तर यावेळी दिल्लीत एकही सभा केली नाही.  सारा मामला राजनाथ सिंह यांच्यावर सोडला होता. यालाच राजकारण म्हटले जाते.

                   २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून  गुजरात निवडणुकीकडे पाहिले जात होते.  २०२४ मध्ये जिंकायचे तर यावेळी गुजरात जिंकणे जरुरी होते.  मोदींनी  विजयाचा नारळ फोडला आहे. २०२४ मध्ये  मोदी  विरुध्द केजरीवाल असाच  सामना होईल. शेवटी हे राजकारण आहे.  दोन वर्षात  काय काय बदलते त्याकडे  लक्ष राहणार आहे.

 183 Total Likes and Views

0 Comments

No Comment.