महाराष्ट्रापुढचा प्रश्न कोणता? उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे हे राज्यापुढचे खरे प्रश्न होऊ शकत नाहीत. एकमेकांची निंदानालस्ती हा खरा इश्यू नाही. मग महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्ये हा इश्यू आहे का? हिवाळी अधिवेशन १८ दिवसांवर आले आहे. नागपूरच्या थंडीत राजकारण तापले आहे. सारेच राजकारणी एकमेकांचे कपडे फाडत असताना एखादा नेता शेतकऱ्यांसाठी चार दिवसाचा मंडप टाकतो, तिथे मांडी ठोकून बसतो, शेतकऱ्यांच्या समस्यांची घुसळण करतो, असे होऊ शकते? ते झाले आणि नागपुरात झाले. ह्या नेत्याचे नाव आहे नितीन गडकरी. देशाचा सर्वात कार्यक्षम मंत्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वात लोकप्रिय नेता. उद्धव ठाकरे आणि बंडखोर एकमेकांच्या छाताडावर कुदत होते तेव्हा गडकरी बळीराजाच्या समस्या घुसळून काढत होते. तसे पाहिले तर गडकरींना ह्या धडपडीची काही आवश्यकता नाही. परिवहन मंत्री आहेत. त्यांनी रस्त्यांचे बोलावे. पण तेवढ्यावर थांबले तर गडकरी कसे? तब्येतीचा त्रास असतानाही धावत आहेत. खासदार महोत्सव, क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव…गडकरी हे उत्सवी नेतृत्व आहे. रवींद्र बोरटकर, गिरीश गांधी, रमेश मानकर अशी भक्कम टीम बनवली आहे. देशात पाचशेहून अधिक खासदार आहेत. किती खासदार आपल्या भागात खासदार महोत्सव भरवतात? गडकरी हे वेगळे रसायन आहे. नागपूरकरांनी त्यांना उशिराने का होईना पण ओळखले. व्हिजनरी नेता मिळाला तर काय चमत्कार होऊ शकतात त्याचा अनुभव सध्या विदर्भ घेतो आहे. गेल्या ५० वर्षात झाली नाहीत एवढी विकासाची कामे नागपूर-विदर्भात सुरु आहेत. एरवी हिवाळी अधिवेशन संपले की ‘सायलेंट मोड’मध्ये जाणारे नागपूर आता बाराही महिने ‘व्हायब्रंट’ आहे.
विदर्भाला शेतकरी आत्महत्यांची राजधानी म्हटले जाते. शेतकरी कर्जात अडकतात आणि मग आयुष्य संपवतात. आत्महत्यांचे दुष्टचक्र रोखायचे असेल तर कर्जमुक्त शेतकरी घडवला पाहिजे हे गडकरींनी हेरले. त्या दिशेने नियोजन केले. शेतीत खूप काही करण्यासारखे आहेत, अनेक शेतकरी ते करीत आहेत. शेतीतले नवनवे प्रयोग समोर आणले. गडकरींच्या ह्या कामातून एका फटक्यात शेतकरी आत्महत्या थांबतील असे नाही. पण शेती कसायची एक योजनाबद्ध दिशा तर मिळेल. शेत पैसा तर पिकवू लागेल. गेली १३ वर्षे नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून कृषी प्रदर्शन भरते आहे. शेतीच्या क्षेत्रात देशभर आलेल्या नवनवीन संशोधनांची ओळख करून देत आहेत. यंदा अडीच लाख शेतकऱ्यांनी ह्या प्रदर्शनाला भेट दिली. तब्बल ३५ कार्यशाळा झाल्या. याचा अर्थ शेतकऱ्यांना हे पहायचे आहे. ऊसापासून बांबूपर्यंत शेतकऱ्यांना नवे जग दाखवण्यात आले. शेती हा परवडणारा व्यवसाय नाही असा एक भ्रम पसरवण्यात आला आहे. त्या मानसिकतेला बळी पडून असंख्य शेतकरी जगाचा निरोप घेत आहेत. शेतकरी म्हणजे आत्महत्या करणारा माणूस अशीच एक प्रतिमा तयार होत आहे. नव्या नजरेने शेतीकडे पाहिले तर शेतीला सोन्याचे दिवस येतील हे कोणी योग्य पद्धतीने सांगत नव्हता. गडकरी नेमके ते सांगत आहेत. गडकरी हे हाडाचे शेतकरी आहेत. धापेवाडा ह्या त्यांच्या गावी त्यांची शेती आहे. राजकारणापेक्षा जास्त ते शेतीत लक्ष घालतात हे लोकांना माहित नसेल. शेतीच्या दुखण्यावर त्यांनी औषध शोधले आहे. भविष्यात ‘शेतकरी उत्पादक कंपन्या’ परिवर्तनाचे साधन ठरेल असे गडकरी म्हणतात. बहुसंख्य शेतकऱ्यांकडे दोन एकरपेक्षा कमी शेती आहे. त्यांचा कोणी वाली नाही. अतिवृष्टी असो वा दुष्काळ, मारला जातो तो शेतकरीच. पीक विमाही त्याच्या मदतीला येत नाही. शेतकऱ्यांच्या समस्या ह्या मारुतीच्या शेपटासारख्या आहेत. शेतकऱ्याने एकट्याने न लढता समूह शक्तीने मुकाबला केला तर शेतीला चांगले दिवस येऊ शकतात असे गडकरींचे साधेसोपे सायन्स आहे. लहान शेतकऱ्याने कितीही हातपाय मारले तरी त्याला मर्यादा पडतात. पण समूह शक्तीत तो आला तर चमत्कार होऊ शकतो. म्हणून गडकरी उत्पादक कंपन्या स्थापन करा असा आग्रह धरतात. त्यामुळे शेतकऱ्याला एक जागी साऱ्या सुविधा मिळतील. कोणताही व्यापारी तोट्याचा धंदा करीत नाही. मग शेतकरी कर्जाची शेती का करतो? गडकरी करतात तसा हा विचार प्रत्येक खासदार, आमदार करील तेव्हा आपला देश महाशक्ती असेल. म्हणूनच म्हणतो, नितीन गडकरी होणे सोपे नाही. आमदार, खासदार होणे सोपे आहे. पण ‘नितीन गडकरी’ होणे अवघड आहे. कारण मुळातच गडकरी ही व्यक्ती नाही, प्रवृत्ती आहे.
पण आपले नेते काय विचार करतात? त्यांच्या डोक्यात २४ तास राजकारण असते. एकमेकांना संपवण्यातच हे नेते संपतात. आज तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे गढूळ झाले आहे. नासत चालले आहे. राजकारणासाठी लोक कोणत्याही थराला जात आहेत. राजकीय कटुता समजू शकते. पण प्रतिस्पर्ध्यावर टीका करण्यासाठी कंबरेखालची भाषा सर्रास वापरली जात आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षातच मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. शिवसेना बंडखोरांनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले. कॉन्ग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते ह्या धक्क्यातून सावरले. पण हा घाव उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागलेला दिसतो. त्यामुळे की काय शिंदे-फडणवीस सरकारला पाच महिने होऊनही उद्धव अस्वस्थ आहेत. शरद पवारांच्या नादी लागून त्यांनी हे दिवस ओढवून घेतले. आता सुटका नाही. सुरुवातीला बंडखोरांना ‘गद्दार’, गद्दार’ म्हणून त्यांनी सहानुभूती मिळवू पहिली. ते जमले नाही तेव्हा उद्योग गुजरातला गेल्याचे ते राजकीय भांडवल करू पाहत आहेत. पण तुम्ही लिहून ठेवा. एकनाथ शिंदे हा ‘पोचलेला’ नेता आहे. उद्धव त्यांना ओळखू शकले नाहीत. भाजपने त्यांना ओळखले. उद्धव यांची आदळआपट त्यातून आहे. शिंदे आणि त्यांचे आमदार आसामातील कामाख्या देवीच नवस फेडण्यासाठी गेले तेव्हा ‘महाराष्ट्रातले देव संपले का?’ असा टोला ठाकरे गटाने लगावला. पुरोगामी राज्यात नवस फेडणे बसते काय? हा प्रश्न अनाठायी आहे. पूर्वीही हे चालायचे. त्या काळात राजकारणी एकमेकांना सांभाळून घ्यायचे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना सत्य साईबाबा त्यांच्या सरकारी निवासस्थानी आले होते. भय्यू महाराजांचे आशीर्वाद घ्यायला तर राजकारण्यांच्या उड्या पडायच्या. हल्ली श्रद्धेच्या व्याख्या बदलल्या आहेत. ‘जय श्रीराम’ घोषणा कानावर येताच आरडाओरडा करणाऱ्या ममतादीदी हल्ली मंदिरे पालथी घालत आहेत. कॉन्ग्रेसचे युवराज राहुल गांधी तर मंदिरात साष्टांग दंडवत घालताना दिसत आहेत. पूर्वी हीच मंडळी मंदिर म्हटले की अंगावर पाल पडल्यासारखे करायची. हा काळाचा महिमा आहे. मताचा जोगवा हवा असेल तर मंदिरं पालथी घालावीच लागतील. अयोध्येच्या एका राम मंदिराने घडवलेला हा चमत्कार आहे. नवससायास केल्याने प्रश्न सुटत असतील तर हेही सही.
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत. )
124 Total Likes and Views