भाजपच्या नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधानं केली जात आहेत. त्यामुळं वाद पेटलेला असताना त्यात आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेल ओतले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं विरोधकांना नव्याने आयते कोलीत मिळाले आहे.
पैठण इथं एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, “त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हतं. तरीसुद्धा महापुरुषांनी शाळा उघडल्या, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलेलं नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली. (हे विधान करताना चंद्रकांत पाटील यांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरून दाखवलं. ) पाटील पुढे म्हणाले, ते म्हणायचे. मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे.
वादग्रस्त वक्तव्यामुळे शिंदे सरकार अडचणीत आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी सुरुवात केली. नंतर वादग्रस्त वक्तव्यांची माळच लागली. चंद्रकांतदादांची ताजी एन्ट्री आहे. कोश्यारी यांनी माफी मागितली नाही, दादाही महापुरूषांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागीतली ह्या वक्तव्यावर ठाम आहेत. दादा म्हणाले, मी त्यांच्याबद्दल आदरच व्यक्त केला आहे. त्या शाळा सुरू करताना त्यांनी सरकारकडे अनुदान मागितलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. आता भीक म्हणजे काय, आत्ताच्या भाषेत सीएसआर, वर्गणी किंवा देणगी म्हणू.
भीकऐवजी देणगी शब्द वापरावा का? असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, अरे बाबा माधुकरी मागून शिकलो म्हणजे काय? भीक मागून शिकलो. लोकांकडे हात पसरून मी शाळा चालवल्या. धान्य गोळा करायचे भाऊराव पाटील. मी त्या भागातला आहे, माहिती नसेल तर कर्मवीर भाऊराव पाटील वाचा. हे घरोघर धान्य मागायचे त्याला देणगी मागत होते असं म्हणू. हा प्रचलित शब्द आहे, की भीक मागून मी माझी संस्था वाढवली. यात काय चुक आहे?
चूक नसेलही. पण हल्ली प्रत्येक वक्तव्याकडे राजकारणातून पाहिले जात आहे. आणि त्यात पाटील यांचे वक्तव्य भाजपला महागात पडते आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच आता आपल्या नेत्यांना सबुरीचा सल्ला देणे आवश्यक झाले आहे. अन्यथा हे सरकार ह्या निरर्थक बडबडीत केव्हा गेले तेही कळणार नाही.
472 Total Likes and Views