‘हमारे पास फडणवीस है’

Analysis
Spread the love

२० वर्षापूर्वी नितीन गडकरी यांनी  मुंबई-पुणे  द्रुतगती मार्ग जिद्दीने  बांधला आणि पाहता पाहता ह्या भागाचे भाग्य पालटले. आज मुंबई  आणि पुणे ही जुळी शहरे झाली. मोठा भाग मालामाल झाला. मुंबई-पुणे मार्ग तर  फक्त १५० किलोमिटरचा आहे. त्याच्या पाच पट  म्हणजे ७०० किलो मीटर  लांबीचा  नागपूर- मुंबई ‘समृद्धी महामार्ग’ आता  देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून  तयार झाला आहे.  जगातला सर्वात लांब रस्ता  कोरियामध्ये   आहे आणि तो  ५५० किलो मीटरचा आहे. हे लक्षात घेतले तर  समृद्धी महामार्गाचे महत्व आणि व्याप्ती  लक्षात येते. हे दोन्ही रस्ते बांधणारे दोन्ही ‘व्हिजनरी’ नेते नागपूरचे आहेत. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा  ५५० किलो मीटरचा रस्ता धावायला तयार आहे. ह्या रस्त्याचे लोकार्पण करायला खुद्द  पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ११ डिसेंबरला येत आहेत. त्यावरून  ह्या महामार्गाचे महत्व लक्षात यावे.

                   हा केवळ रस्ता नाही. गेमचेन्जर आहे.  विदर्भाला आतापर्यंत सहज अशी कनेक्टीव्हिटी नव्हती. ‘जंगल मे मोर नाचा, किसने देखा’ अशी विदर्भाची स्थिती होती.  विदर्भाचे खऱ्या  अर्थाने  ‘मार्केटिंग’च झाले नाही. ‘पिकते तिथे विकत नाही’ असे म्हणतात. विदर्भाला बाजारपेठच नव्हती.  मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक  म्हणजेच  महाराष्ट्र असे गणित राहिले. त्यामुळे मुंबईच्या आसपास विकासाची बेटे तयार झाली आणि विदर्भच  नव्हे तर मराठवाडाही   कोरडा राहिला.  विकासाचा हा असमतोल गेली ६० वर्षे वाढतच गेला.  अनुशेषाच्या नावावर पुढाऱ्यांनी निव्वळ राजकारण केले. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र  नेमके दुखणे हेरले होते. २०१४ मध्ये मुख्यमंत्री होताच त्यांनी हा ‘हुकमी एक्का’ बाहेर काढला.  फडणवीस यांना प्रश्नं समजतात, कायदा कळतो, सरकारी फाईल फिरवता येते. त्यामुळे  वयाच्या अवघ्या पन्नाशीत देवेंद्र यांनी राज्यातच नव्हे तर देशाच्या राजकारणात   स्वतःचे  विशिष्ट स्थान कमावले आहे. समृद्धी महामार्गाच्या आड येणाऱ्या साऱ्या  अडचणी त्यांनी वेगवान हालचाली करून   सोडवल्या.  चार वर्षात ६५ हजार कोटी खर्चाचा सहा पदरी कॉन्क्रीटचा  महामार्ग बांधून घेणे सोपे नव्हते. जमिनी मिळवण्यापासून अडचणी होत्या. त्यातही करोनाकाळातली दोन वर्षे  सोडली तर  फक्त दोन वर्षात झालेले हे अवाढव्य बांधकाम खरे तर गिनीज बुकने  नोंद घेण्यासारखे आहे.  ह्या महामार्गाचे सारे श्रेय फडणवीस यांनाच आणि त्यांच्या दूरदृष्टीला  जाते.  विदर्भाच्या मागासलेपणाची  मी जेव्हा जेव्हा चर्चा करायचो तेव्हा पश्चिम महाराष्ट्राचे पुढारी चेष्टा करायचे. एक फिल्मी डायलॉग आहे. अमिताभ बच्चन  शशी कपूरला म्हणतो, ‘मेरे पास बंगले,पैसा सबकुछ  है. तेरे पास क्या है?’ त्यावर शशी कपूर म्हणतो, ‘मेरे पास मां है. त्याच स्टाईलने पश्चिम महाराष्ट्राचे पुढारी म्हणायचे,  “हमारे पास वसंतदादा था, शरद पवार है. आपके पास कौन है?” त्यावेळी आमची बोलती बंद व्हायची. पण आता आम्ही छाती ठोकून सांगू शकतो…. “हमारे पास  नितीन गडकरी है, देवेंद्र फडणवीस है.” पवारांनी सहकाराच्या राजकारणातून ताकद वाढवली. पण  पवार एखादा महामार्ग बांधू शकले नाहीत. कारण त्यांच्या डोक्यात फक्त बारामती होती. फडणवीस हे महामार्गाच्या मार्गाने शेतकऱ्यांची समृद्धी वाढवायला निघाले आहेत. यातून व्यापार, उद्योगही वाढणार आहे.  त्यातून फडणवीस आणि पुढाऱ्यांची  ‘राजकीय समृद्धी’ तर वाढणार आहेच. पण विदर्भही ‘व्हायब्रंट’ होणार आहे.   हिवाळी अधिवेशन आले की विदर्भ जागा होतो आणि अधिवेशन संपले की विदर्भ झोपी जातो असे चेष्टेने म्हटले जायचे. त्यात थोडा दमही होता. पण आता परिस्थिती बदलते आहे. वर्षभर धावपळ  दिसेल अशा  केंद्र सरकारच्या संस्था आणि प्रसिद्ध शिक्षण संस्था  नागपुरात आल्या आहेत, येऊ पाहत आहेत. त्यामुळे नागपूरचे पोस्टिंग म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा ही नोकरशाहीची मानसिकताही बदलते आहे. नागपुरात यावं, रहावं असं वाटण्यासारखे खूप काही घडले आहे, घडते आहे. त्याचाच एक भाग म्हणे समृद्धी महाम्रार्गाचे  काम. कल्पना करा, गडकरी, फडणवीस नसते तर विदर्भात हे वैभव आले असते. फुटाळा तलावात  संगीत कारंजा आला असता?

               विदर्भाच्या अनेक पिढ्या नाव घेतील  असे हिमालयाच्या  उंचीचे काम  देवेंद्र यांच्या हातून झाले आहे. समृद्धी महामार्गाने   देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई हाकेच्या अंतरावर आली आहे.  आतापर्यंत हे  किमान १६ तास लागायचे. आता  आठ तासात मुंबई म्हणजे धमाल करता येईल. रात्री माल ट्रकमध्ये  ठेवला तर सकाळी मुंबईत. रात्री निघालेला  विदर्भाचा शेतमाल, विदर्भाची ताजी  भाजी  मुंबईकरांच्या पानात सकाळी वाढली जाईल. चांगला भाव मिळेल.  ८ तासात मुंबईची बाजारपेठ.  प्रत्येक  ३० किलो मीटरवर  कृषी प्रक्रिया केंद्र असेल.  वाटेत  १८ नवी शहरं उभी राहणार आहेत.  ताशी १२० किलो मीटर वेगाने  गाड्या धावणार  म्हणजे कल्पना करा. मोठी संधी आहे.  आपण त्या संधीचे  कसे  सोने करतो ते पहायचे. थेट १० जिल्हे, २६ तालुके आणि ४०० गावे म्हणजे एका अर्थाने  पूर्ण  महाराष्ट्राला  जोडणारा हा महामार्ग होणार आहे.  विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हे  चारही भाग वेगवान महामार्गाने   जोडले जाणार म्हणजे काय होणार हे समजून घ्यायचे असेल तर मुंबई-पुणे  द्रुतगतीमार्गाकडे पहा. ह्या मार्गाने त्या भागातली श्रीमंती वाढवली.  समृद्धी महामार्गही योग्य प्रकारे हाताळला  तर     विदर्भाला सोन्याचे दिवस येऊ शकतात, विदर्भाचे वेगळे राज्य मागायची गरज पडणार नाही एवढी ताकद ह्या महामार्गात आहे. मात्र  ती  व्हिजन आता सत्ताधाऱ्यांना  दाखवावी लागणार आहे. रस्ता बांधून  मोकळे होता येणार नाही. खरी कसोटी तर आता आहे. हा महामार्ग   सक्षम   आणि परवडणारा करून दाखवावा लागणार आहे.  शेतमालासाठी आजही बाजार समित्या आहेत. पण तिथे शेतकऱ्यांचे किती भले होते हा वादाचा विषय आहे. तसे होऊ नये. शेतकऱ्यांचा माल मुंबईच्या बाजारात नेणारी सेवाभावी साखळी  सरकारला उभी करावी लागेल. हे काम सेवाभावी राजकीय कार्यकर्त्यांना अंगावर घ्यावे लागेल.  तरच वेगवान  रस्त्याचे फायदे  सामान्य माणसापर्यंत पोचतील. अन्यथा दलालांची वेगळीच टोळी  उभी झालेली दिसेल. स्वतःच्या महागड्या गाड्या  घेऊन जाण्यासाठी किंवा ‘लॉंग द्राइव्ह’साठी  हा रस्ता बांधलेला नाही.  वेगाने धावतील अशा एसटी गाड्या, तसली वाहने, तसले  मजबूर टायर्स  आता उपलब्ध करून  द्यावे  लागतील. वेगवान रस्त्यांवर  वाहन चालवायचा  सेन्स  विकसित करावा लागेल. अन्यथा वेगाने गाडी चालवायच्या धुंदीत  अपघात वाढून नवीच  डोकेदुखी नको.  त्यामुळे  विकासाची संधी आहे तशी आव्हानेही आहेत.  कित्येक वर्षांनी विदर्भाला  रस्त्याच्या रूपाने  समृद्धीचा एक रस्ता मिळाला आहे. विकासाचा तो  राजमार्ग ठरावा, समृद्धीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे अशी अपेक्षा करायला हरकत नाही. कारण प्रथमच महाराष्ट्र  सक्षम नेत्याच्या हातात आहे.

 मोरेश्वर बडगे

( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

 537 Total Likes and Views

0 Comments

No Comment.