दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरून वादळ

Entertainment News
Spread the love

भगवा रंग हा राष्ट्रवादाचा, प्रखर हिंदुत्वाचा.  बिकीनीचा रंग भगवा असू शकतो काय?  तसा तो झाला आणि  वादळ उठले. दीपिका पदुकोण व शाहरुख खान यांचा ‘पठाण’ चित्रपट येत्या जानेवारीत लागतो आहे. पण प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.  मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात तर ही बिकिनी पेटली आहे. ह्या सिनेमातल्या ‘बेशरम रंग’ गाण्याविरोधात तिथे  आंदोलन करण्यात आलं.

         मध्य  प्रदेशचे गृहमंत्री आणि राज्य सरकारचे प्रवक्ते नरोत्तम मिश्रा म्हणाले, शाहरुख व  दीपिकाने हिरव्या आणि भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत. या कपड्यांचा रंग, गाण्याचे बोल आणि चित्रपटाचं नाव (पठाण) यात सुधारणेची गरज आहे. गाण्याचे शीर्षक ‘बेशरम रंग…’ आहे. हे मुळातच आक्षेपार्ह आहे,   गाण्यातील काही सीन सुधारले नाही, तर राज्यात सिनेमाच्या प्रदर्शनाला परवानगी द्यायची की नाही, याचा विचार केला जाईल.

          ‘बेशरम रंग’ गाण्यासाठी दीपिकाने परिधान केलेली बिकिनी टॉपची स्टायलिस्ट शालीन नथानीने डिझाइन केली आहे.  शालीन म्हणते, “या गाण्यानुसार दीपिकाला एकदम बिनधास्त दाखवायचं होतं. चित्रपटाच्या कथेशी निगडीत गाणं असल्यामुळे ते हटके झालं पाहिजे असं सिद्धार्थ आनंदने मला सांगितलं.” “प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेला लूक दीपिका व शाहरुखला दिला पाहिजे अशी निर्मात्यांची मागणी होती. म्हणूनच या गाण्यामध्ये त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांचा रंगही हटके असावा असं मला वाटलं. मला खात्री आहे की हे गाणं शाहरुख व दीपिकालाही आवडलं आहे.”

            शालीन काहीही म्हणो, हिंदूंच्या भावना तीव्र आहेत. एक कडवा हिंदू म्हणाले,  तुम्ही नटीला अर्धनग्न भगवी बिकिन घालता आणि नटाच्या अंगावर पूर्ण काळे कपडे घालता. याचा अर्थ आम्हाला समजत नाही का?

 149 Total Likes and Views

0 Comments

No Comment.