आमच्या गावची ग्राम पंचायत आणि पंच ,सरपंच एवढे होपलेस आहेत की असे नमुने कुठेच सापडणार नाहीत ,हे बोल प्रत्येकाला आपल्याच गावाबद्दल काढले आहेत असे वाटते कारण गेल्या पन्नास साठ वर्षात गावात काहीही बदल घडल्याचे दिसत नाही. विदर्भात कोणत्याही गावात जा ,गावाच्या कारभाराबद्दल असेच गौरवोद्गार ऐकायला मिळतात. प्रत्येकाला वाटते की आपलेच गाव अन कारभारी बोगस आहेत पण शेजारच्या गावातही नवे काही दिसत नाही. लहानपणी ज्या नालीत पाय घसरून आपण पडलो त्या नालीवर अजूनही कुणी रपटा बसवल्याचे आठवत नाही. *गावातली लाईन गेल्यावर ज्या नालीत आबाचा पाय फसला त्याच नालीत नातवालाही तोच अनुभव घ्यावा लागत असेल तर अशा गावाचा कायापालट प्रत्यक्ष ब्रह्मदेव आला तरी होऊ शकणार नाही* असे बोंबलण्याची दुर्दैवी वेळ ज्यांच्यावर आली आहे अशा गावांची संख्या कमी नाही.
एखादे गाव कसे आहे हे ओळखायचे असेल तर त्या गावचे नागरिक आपल्या हक्क आणि जबाबदारीविषयी किती जागरूक आहेत हे समजून घ्यावे लागते. ” चुलीत घाला ती ग्राम पंचायत अन निवडणूक ” असे उद्गार ज्या गावातून अधिक प्रमाणात ऐकायला मिळतात तिथे समजून जावे की या गावात लोकशाहीची एसटी अजून पोहोचली नाही. *गावाच्या दुर्दशेला ग्राम पंचायती कारभारी जबाबदार असतातच मात्र त्यांच्या कैक पटीने गावकरी आणि मतदार जबाबदार असतात*. पाच वर्ष ग्राम पंचायत मध्ये काय चाललंय याकडे ढुंकूनही बघायचे नाही आणि मतदानाच्या आठ दिवसात आपल्याच गट,भावकी,जातीचा माणूस कसा निवडून येईल यासाठी फिल्डिंग लावत फिरायचे असा ज्यांचा दिनक्रम सुरु असेल तर गावाची अन प्रगतीची मान हेच गावकरी बेईमानीच्या उखळात घालायला निघाले आहेत असा त्याचा अर्थ होतो.
गावाच्या प्रगतीच्या अंतिम मसुद्यावर शिक्कामोर्तब करायला आता केवळ तीन दिवस उरले आहेत. या तीन दिवसात आपल्या वार्डाचे पंच आणि थेट गावाचा सरपंच निवडायचा आहे. *जो कधीही कुणाच्या लेण्यादेण्यात नसतो,सकाळी उठला की वावरात ,जो कधीही कशावरही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही. ग्रामसेवक सांगेल त्यावर डोळे लावून सही किंवा अंगठा मारतो असे” बैल भारती ” चुकूनही निवडून देऊ नका*. काही गावात निवडून येण्याचे असेच भलते सलते निकष ठरवले जातात. लक्षात घ्या प्रत्येक गावात असे ” बैल भारती ” कुणाच्या तरी फायद्याचे असतात म्हणून त्यांचे अवगुणही पावडर लाली लावून विकले जातात परंतु कायम लक्षात असू द्या. ज्याला प्रत्येक विषयावर स्वतःचे काहीतरी मत असते ,ज्याला गावाचे भले,वाईट योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी कळते आणि बोलता येते असेच लोक मग भलेही ते कोणत्याही जाती,धर्म किंवा गटाचे,सधन ,निर्धन असू द्या त्यांनाच निवडून देण्याचा विचार करायला हवा.
कोण गावाची सेवा करतो,कोण प्रतिष्ठेसाठी मिरवतो
सांगावा प्रसंग येता स्पष्ट तो ,गावामाजी !
गावात कुणाला कुणाची कुंडली माहित नाही अशी व्यक्ती सापडणे कठीण असते. लोक बोलत नाहीत पण सारी माहिती ठेवून असतात. ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच किंवा गटनेता अनेकदा डोळे मिटून कमिशनरुपी मलईदार दूध पीत असतो आणि त्याचा गोड गैरसमज असा झालेला असतो की आपल्याकडे कुणाचेही लक्ष नाही. सगळ्यांचे लक्ष असते ,उगाच वाद नको म्हणून कुणी बोलून दाखवत नाही. आता मौका आहे ,गप्प बसू नका ,मशीनवर बटन दाबताना बोटाने बोला,जिभेचा वापर न करताही तुमच्या बोटांचा आवाज किती गगनभेदी असू शकतो , गावाचे भाग्य बदलण्याची ताकद तुमच्या बोटात कशी सामावलेली असते हे गावाचा अन पंचायतीचा कचरा करणाऱ्या टिनपाट पुढाऱ्यांना दाखवून द्या.
ज्याच्याकडे आपण घेत असलेल्या नव्या जबाबदारीचे ज्ञान आहे , आवश्यक साधने आणि भरपूर वेळ आहे अशा विकासाची आस असणाऱ्या आणि गावासाठी काहीतरी करून दाखवणाऱ्या लोकांना संधी द्या. उगाच कुण्यातरी टोपणजींच्या पॅनलमध्ये कोणतेही दगडधोंडे पुढे ढकलू नका. शनिवारच्या बाजारात एखादे पंधरा रुपयांचे मडके घेताना जसे चारही बाजूनी गोट्याने वाजवून घेता ,तोच न्याय गावाच्या नशिबाशी खेळणाऱ्या पंच,सरपंचाला लावायला का विसरता ? पंचायती राज व्यवस्थेने आता ग्राम पंचायतींना भरपूर अधिकार आणि निधीही दिला आहे. आपल्या गावात आपणच सरकार असतो हे विसरू नका. गावाने पर्यायाने नागरिकाने ठरवले तर काहीही अशक्य नसते फक्त तुम्ही योग्यवेळी जागे असायला हवे. *जात,धर्म,गट,भावकीची अफीम बटन दाबताना डोळ्यावर सुस्ती आणते आणि बोटे बधिर करीत असते*. काही यंत्रणा त्यासाठी भिडलेल्या असतात त्यांचे मनसुबे उलथून टाका अन करा गावाला स्वतंत्र .
-पुरुषोत्तम आवारे पाटील
दै.मातृभूमी,9892162248
776 Total Likes and Views