महाआघाडीने शनिवारी मुंबईत महामोर्चा काढून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असे महाआघाडीचे म्हणणे आहे. ‘शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत’ असे कोश्यारी बोलले होते. त्यावरून वाद झाला तेव्हा लगेच देवेंद्र फडणवीस त्यांच्या मदतीला धावले होते. पण अलीकडे भाजपनेही सावध भूमिका घेतली आहे. कोश्यारी बोलले त्याला एक महिना होत आला आहे. कोश्यारी यांना हटाव अशी विरोधकांची मागणी आहे. मोदी-शहा म्हणजेच केन्द्र सरकारने मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधान मोदी नुकतेच नागपुरात येऊन गेले. पण ह्या वादावर अजिबात बोलले नाहीत. लोकांनाही हे कळते, की जे सुरु आहे ते एकूणच राजकारण आहे. मग आता कोश्यारी यांचा निकाल कसा लागेल?
विरोधकांनी मोर्चा काढला. दोन दिवसांनी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यात ह्याच मुद्यावरून विरोधी पक्ष गोंधळ घालतील. कोश्यारी यांची टर्म २०२४ सालापर्यंत आहे. केंद्र सरकारने त्यांना हात लावला नाही तर ते निरोप घेतील तेव्हा लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात असेल. विरोधकांना तो पर्यंत हा मुद्दा ताणून धरायचा आहे. कारण त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही. शेवटी शिवाजी महाराज यांच्या नावावरच सर्वांना मतं मागायची आहेत. त्यामुळे सारेच जपून खेळत आहेत.
मग महामोर्चा यशस्वी झाला का? शिंदे सरकारवर तुटून पडता आले म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी जाम खुश आहेत. ८२ वर्षाचे वय असतानाही राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार मोर्चाच्या सभेला आले होते. ‘महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही. कोश्यारी यांना हाकला’ अशा शब्दात पवार गरजले. पण ज्या कार्यक्रमात कोश्यारी वादग्रस्त बोलले त्या कार्यक्रमाला पवार उपस्थित होते. चुकीच विधान होते तर पवारांनी तिथेच कोश्यारी यांना का हटकले नाही? हा प्रश्न आजही लोकांच्या मनात येतोच. सावरकरांचा यांचा अपमान करणारे वक्तव्य राहुल गांधी करीत होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी मोर्चा का काढला नाही? असे फडणवीस विचारतात. पण असे अडचणीचे प्रश्न विरोधकांना विचारायचे नसतात. महापुरुषांचा अवमान हा विरोधकांनी राजकीय मुद्दा बनवला आहे. प्रत्येक निवडणुकीत ते हा मुद्दा रेटून धरतील. शेवटी लोकशाहीच्या कोर्टात लोकच निकाल देतात. दोन तीन महिन्यांनी महापलिकेच्या निवडणुका आहेत. राजकारणात टिकण्यासाठी उद्धव यांना मुंबई महापालिकेची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यासाठी त्यांचा सारा आटापिटा सुरु आहे. महापुरुषांचा अवमान झाला का? महापालिकांच्या निवडणुकीत याचे उत्तर मिळेल.
खा. संजय राऊत यावेळेलाही आपल्या जिभेला जागले. ‘फेब्रुवारी महिना हे सरकार पाहणार नाही.’ असे संजय म्हणाले. त्यावर फडणवीस यांनी त्यांना टोला लगावला. फडणवीस म्हणाले, ‘ज्यांना स्वतःचं सरकार टिकवता आलं नाही, त्यांच्या नाकाखालून आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो. आणि आम्ही सरकार तयार केलं. हे सरकार टीकणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवणार, पुन्हा आमचंच सरकार महाराष्ट्रात येणार.’
शेवटी मुद्दा महामोर्चाचा. मोर्चा कसा झाला? फडणवीस म्हणतात, ‘तीन पक्ष एकत्रित येऊनही एवढा लहानसा मोर्चा निघाला. यामुळे मीडियाला ड्रोन शॉटही दाखवता आला नाही. क्लोजअप दाखवावे लागले. आम्हाला हे आधीच माहिती होतं. आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या. पण आझाद मैदानावर आवश्यक एवढी संख्या राहणार नसल्याचं त्यांना माहिती होतं. जिथे रस्ता निमूळता होतो, अशी जागा त्यांनी निवडली. त्यामुळे या मोर्चाचं कुठलं विराट स्वरूप हे उद्धवजींना दिसलं? जसा त्यांचा पक्ष नॅनो होतोय, तसा मोर्चाही नॅनोच आहे.’ देवेंद्र आपल्या हिशोबाने बोलतील. ते समजू शकते. थोडक्यात सांगायचे झाले तर, महामोर्चाच्या निमित्ताने राज्यात महायुद्ध पेटले आहे एवढाच ह्या खडाखडीचा अर्थ घ्यायचा.
94 Total Likes and Views