मृत्यू सांगून येत नाही. म्हणूनच मृत्यूची भीती आणि तेवढेच मृत्यूचे कुतूहल कायम आहे. आपण केव्हा मरणार हे माणसाला कळले तर जगण्यातली मजाच निघून जाईल. मृत्यूबद्दलची ही उत्सुकता पाहता जगभर संशोधन सुरु आहे. अनेक वैज्ञानिकांनी याबाबत अभ्यास सुरु केला आहे. कळले तर किती छान होईल बघा. कोणत्याही माणसाला त्याच्या मृत्यूच्या आधीच नेमकी तारीख कळली तर ही व्यक्ती आपले वेळापत्रक आखू शकते. राहिलेली कामे झटपट आटोपून मृत्युच्या स्वागताला सज्ज राहू शकते. कारण तो घ्यायला आला तर जायचेच आहे.
वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून माणसाच्या मृत्यूच्या तारखेबाबत भविष्यवाणी केली जाऊ शकते. ही मृत्यूची चाचणी ही एखाद्या रक्ताच्या चाचणीप्रमाणेच केली जाते. या टेस्ट अंतर्गत माणसाच्या रक्ताचे नमुने घेऊन बायोमार्करच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते. यानुसार संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा किती वर्षांनंतर होणार याची भविष्यवाणी केली जाऊ शकते. ही चाचणी एका प्रकारे अंदाजावर आधारित असल्याने यावर तज्ज्ञांकडून आणखी संशोधन सुरु आहे. युनाइटेड किंग्डमच्या नॉटिंघम यूनिवर्सिटी अंतर्गत डेथ टेस्टबाबत संशोधन सुरु आहे. थोडक्यात सांगायचं तर या संशोधनाच्या दरम्यान संशोधकांना काही ठराविक पॅटर्न दिसून आले होते, ज्यांनुसार मृत्यूची भविष्यवाणी करणे शक्य होणार असल्याचे समजत आहे. या संशोधनासाठी ४० ते ६९ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे परीक्षण करण्यात आले होते.
मृत्यूच्या भविष्यवाणीच्याबाबत यापूर्वीसुद्धा अनेक अभ्यास झाले आहेत. याआधी पेंसिल्वेनियाच्या एका हेल्थकेयर सिस्टमनेसुद्धा एक संशोधन केले होते. यामध्ये इकोकार्डियोग्राम व्हिडीओ पाहून मृत्यूच्या तारखेचा अंदाज वर्तवण्यात येत होता. यामध्ये निधनाच्या एक वर्षाआधीच मृत्यूची चाहूल लागत असल्याचे समोर आले होते. तुम्ही धीर धरा. वैज्ञानिक कामाला भिडले आहेत. पुढेमागे आपल्याला आपल्या जाण्याची नक्की तारीख मिळेल. अगदी मिनिट आणि सेकंदासह. शेवटी विद्ज्ञान कशासाठी आहे?
607 Total Likes and Views