उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे एक स्वयंभू आणि तेवढेच वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्या कधी गाण्यात दिसतात तर कधी सामाजिक कार्यक्रमात. आदित्य ठाकरे यांना त्या ‘रेशमाचा किडा’ म्हणाल्या ते खूप व्हायरल झाले. ‘भोगी नव्हे, योगी बनो’ असा सल्ला त्यांनी उद्धव यांना दिला होता. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे नागपुरात अभिरूप न्यायालयात फडणवीस यांच्यावर नुकताच ‘खटला’ चालवण्यात आला. अमृता यांनी विविध आरोपांना आपल्या शैलीने कधी समर्पक तर कधी हजरजबाबी उत्तरं दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीस यांनी मोदी हे देशाचे राष्ट्रपिता असल्याचे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्याचा आरोप अभिरूप न्यायालयात करण्यात आला. मोदीजी राष्ट्रपिता, तर महात्मा गांधी कोण? असा प्रश्न त्यांना करण्यात आला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे आणि नरेंद्र मोदी हे आधुनिक भारताचे राष्ट्रपिता आहेत.’
अमृता फडणवीस यांनी आपली बाजू स्वत: मांडत दिलखुलासपणे आरोप उधळून लावले तर काही आरोप प्रामाणिकपणे मान्यही केले. शेवटी ह्या न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले तो भाग वेगळा. पण या निमित्ताने झालेले सवाल-जबाब नव्या चर्चेला जन्म देऊन गेले. अमृता म्हणाल्या, मी देवेंद्र यांच्यामुळे नाही. स्वकर्तृत्वावर मी प्रगती केली आहे. लग्नाच्या आधीपासून मी गाणी गात होते. टेनिस खेळत होते. नोकरी करीत होते. आम्ही जे सामाजिक काम करतो, ते बघून मला कान्स किंवा इतर कार्यक्रमांमध्ये बोलावले जाते. ह्याचा लाभ आम्ही पुन्हा सामाजिक कार्याला बळ मिळवून देण्यासाठी करतो. देवेंद्र यांच्या पदाचा कधीही गैरफायदा घेतला नाही. अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाण्याचा व्हिडीओ केल्याने नन्तर इतर दारे उघडण्याला मदत झाली.
सोशल मीडियावर सतत ट्रोल होण्याबाबत अमृता म्हणाल्या, माझे स्वत:चे स्वतंत्र विचार आहेत. ते व्यक्त करणे मला आवडते. त्याचा कधी मला तर कधी देवेंद्र फडणवीस यांना तोटा सहन करावा लागतो. मात्र, घाबरत मुळीच नाही. मला ट्रोल करणारे ट्रोलर्स प्रचंड क्रिएटिव्ह आहेत. त्यांच्याकडे बराच वेळ असतो. मात्र, ते सारेच महाविकास आघाडीने ५ पैसे देऊन सोशल मीडियावर सक्रिय केलेले सैन्य आहे.
एक आरोप खोडून काढताना अमृता म्हणाल्या, माझ्या वागण्या-बोलण्याबद्दल रा. स्वयंसेवक संघाकडे तक्रार गेली होती. मात्र, मी जशी आहे, तशीच आहे. मी स्वतःची इमेज बनवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. देवेंद्र यांनी कायम मला साथ दिली. स्त्री स्वातंत्र्य कसे जपायचे ते त्यांनी कृतीतून दाखवून दिले. मी देवेंद्र यांना साथ देते. मात्र राजकारणात येण्याचा माझा विचार नाही. त्यासाठी २४ तास वेळ हवा. ते जमत नाही तोपर्यंत मी राजकारणात येणार नाही.
140 Total Likes and Views