तुम्ही मास्क कपाटात ठेवले असतील तर ते काढा. कारण लवकरच मास्क घालायची वेळ येऊ शकते. मास्क घाला, अंतर ठेवा आदी करोनाचे नियम पाळायला सांगितले जाऊ शकते. मोदी सरकारने राहुल गांधींना तसा इशाराच दिला आहे. करोनाचे नियम पाळा. नाहीतर भारत जोडो यात्रा थांबवा. सरकारची चिंता समजू शकते. कारण जिथे गर्दी तिथे करोना हटकून गर्दी करणार. पण कॉन्ग्रेसला यातही राजकारण दिसते. ‘मोदींनी गुजरात निवडणुकीत मास्क घातला होता काय?’ अशा शब्दात कॉन्ग्रेसने हल्लाबोल केला. विरोध होणारच. निर्बंध कोणाला हवे असतात? मात्र दोन वर्षे आपण निर्बंध पाळलेच. म्हणूनच आपण आज सुरक्षित आहोत. मात्र आपल्या शेजारी चीनमध्ये धोका वाढल्याने चिंता आहे.
चीनमध्ये करोनाचा कहर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. आता तिथे रुग्ण एवढे वाढले आहेत, की अंत्य संस्कारासाठी दोन-दोन हजार पार्थिव देहांची वेटिंग लिस्ट आहे. जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. भारतात दररोज १०० च्या आसपास कोरोना रुग्ण येत आहेत. चीनमध्ये वाढत्या करोनोच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारही सावध झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दररोज जीनोम सीक्वेंसिंगसाठी कोविडचा प्रत्येक पॉझिटिव्ह सॅम्पल पाठवण्यास सांगितलं आहे. त्यामुळे करोनाचा नवा वेरिएंट आला आहे की नाही हे तपासता येईल.
भारताला तसा लगेच धोका नाही. मात्र दक्षता जरुरी आहे. हायब्रिड इम्युनिटी आहे. त्याशिवाय शहरी आणि ग्रामीण भागात व्हॅक्सिनेशन बऱ्याच प्रमाणात झालं आहे. चीनच्या धोरणामुळे तिथे नैसर्गिक संसर्ग खूप कमी झाला. यामुळे तिथल्या लोकांना जितकी नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळायला हवी होती तितकी मिळू शकली नाही. भारतात तसं नाही. भारतातील बहुतेक लोकांना नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे. विशेषत: ओमिक्रॉन व्हेरियंट जोरात असताना त्याचा परिणाम देशभरात दिसून आला. तरीही भारत सरकार ताकही फुंकून पिऊ पाहते आहे.
507 Total Likes and Views