पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं निधन झालं. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केलं. दुर्धर आजाराने ग्रस्त असतानाही त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत रुग्णवाहिकेतून मुंबईत जाऊन मदत केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्या या पक्षनिष्ठेचे कौतुक केले होते.
मुक्ता टिळक यांचा राजकीय प्रवास नगरसेविका म्हणून सुरू झाला होता. त्या चारवेळा नगरसेविका होत्या. मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य निवडणुकीत कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या. मुक्ता टिळक ह्या पुण्याच्या मुलीच्या भावे स्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांचे पदवीपर्यंतचे कॉलेजचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले होते. मानसशास्त्र विषयातून एम.ए झालेल्या मुक्ताताईंनी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातून जर्मन भाषेचे शिक्षण घेतले होते. त्या मार्केटिंग विषयाच्या एमबीए होत्या शिवाय त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. एक सच्ची कार्यकर्ता गेल्याची हळहळ व्यक्त होत आहे.
99 Total Likes and Views