चौकशी दिशाच्या मृत्यूची, मात्र टार्गेट आदित्य ठाकरे

News
Spread the love

राज्य विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनाचा आजचा चवथा दिवस वाढळी घडामोडींनी  गाजला. दिशा सालियन प्रकरणावरून  विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळालं. दिशा प्रकरणावरुन शिंदे गट आणि भाजपने  आदित्य ठाकरेंना घेरण्याचा  प्रयत्न केला. भाजप आमदारांनी प्रचंड गोंधळ केल्याने  पाच वेळा कामकाज थांबवावे लागले.  अखेर ह्या  प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल अशी घोषणा  उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  सत्ता पक्षाचे आमदारच गोंधळ घालताहेत असे  जरा ‘हट  के’  दृश्य सभागृहाने पाहिले.   विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुनावणे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार जयंतराव पाटील यांना महागात पडलं.  अधिवेशन काळासाठी त्यांना निलंबित  करण्यात आले.

       राज्याच्या राजकारणात फाईलयुद्ध  पेणार असे दिसते.  दिशा  प्रकरणामध्ये सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आल्याचा उल्लेख विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी  केला. जुन्या बंद  चौकशा तुम्ही उघडणार असाल तर आम्हालाही पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण उघडावे लागेल  असे दादा म्हणाले. मात्र  फडणवीसांनी पवारांचा मुद्दा खोडून काढला. सीबीआयने  दिशा प्रकरणाची कधीही चौकशी केली नव्हती असे फडणवीस म्हणाले. सीबीआयकडे अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूची चौकशी होती असे त्यांनी स्पष्ट केले.

            दिशा  सालियन हिचा  अडीच वर्षापूर्वी घरच्या इमारतीच्या  १४ व्या मजल्यावरून पडून  मृत्यू  झाला. त्यावेळी   उद्धव ठाकरे सरकार होते. अपघाती मृत्यू म्हणून  याची फार  चर्चा झाली नाही. मात्र कुजबुज   होती. दिशा ही एकेकाळची  सुशांतसिंह  राजपूत यांची व्यवस्थापक होती.  तिच्या मृत्यूनन्तर काही महिन्यांनी  सुशांतचा  मृत्यू झाला.  त्यानी आत्महत्या केली असे सांगितले गेले. दोन्ही मृत्यू  तसे गूढच.  नारायण राणे यावर   खूप बोलले आहेत.  राणे यांनी वेळोवेळी दिशाचाच खून झाला, त्या पार्टीत तिच्यावर अत्याचार झाला, नंतर तिला फेकून देण्यात आले  असे सांगून खळबळ उडवली होती. तिथे त्यावेळी एक मंत्री होता, त्या घरचे सीसीटीव्ही फुटेज  गायब आहे, सचिन वाझेला पोलिसात भरती करून  मामला दाबण्यात आला   असाही आरोप झाला. पण चर्चेपलीकडे  त्याची  कोणी दखल घेतली नाही. मात्र  राज्यात  सरकार बदलताच  दिशाचे  भूत बोलू लागले आहे.

            शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल   लोकसभेत  दिशाचा विषय काढला. त्यातून  नागपूर अधिवेशनातल्या चर्चेला वेगळेच वळण मिळाले.  गेली दोन दिवस विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कथित भूखंड घोटाळा लावून धरला होता.   सुशांत प्रकरणात  रिया चक्रवर्तीला  ‘एयु’ नावाने ४० कॉल आले होते. ‘एयु’ म्हणजे कोण? असा प्रश्न शेवाळे यांनी केला आणि इकडे नागपुरात राजकारण तापले.  भाजपच्या आमदारांनी गोंधळ  घातला.  ‘एयु’ म्हणजे कोण? ते सांगा म्हणाले. पुढे ह्या प्रकरणाची   चौकशी झाली  पाहिजे अशी मागणी  भाजपने लावून धरली. नितेश राणे यांनी तर  आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली आहे.    एकूणच  आदित्य यांना कोंडीत गाठण्याची खेळी भाजपने खेळली आहे. मात्र आदित्य  हाती लागतील?  खा. संजय राऊत म्हणाले,  आम्हालाही तुमच्या अनेक फाईल उघडाव्या लागतील. २०२४ मध्ये आम्ही सर्वांचा हिशोब  करू.  एकूणच  हा वाद चिघळू पाहतो आहे.  दिशाचे भूत कोणाला खाते? की परत बाटलीत जाते, ते  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत  स्पष्ट होईल.

 155 Total Likes and Views

0 Comments

No Comment.