चीन, जपान या देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण पुन्हा वाढत आहेत. BF7 हा करोनाचा नवा व्हायरंट धोकादायक असल्याची चर्चा आहे. भारतात कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. आता आली तर ही चवथी लाट असेल. आपल्याकडे सध्यातरी भीती नाही. पण कोरोना हा छुपा शत्रू आहे. तो कधीही पलटी मारू शकतो. भविष्यात दक्षिण आशियामध्येही करोनाचा प्रादुर्भाव वाढेल. त्यानंतर पुढच्या २०-३५ दिवसामध्ये करोना भारतातही पसरू लागेल. त्यामुळे आम्ही सर्व ती आवश्यक खबरदारी घेत आहोत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. सध्या जगातल्या १० देशांमध्ये एकूण करोना केसेसमधल्या ८२ टक्के केसेस आहेत. त्यात जपान आणि चीन आघाडीवर आहेत. चीनमध्ये करोना झालेला एक रूग्ण १६ जणांना संक्रमित करणारा ठरतो आहे. त्यावरून संकट किती मोठे आहे याची कल्पना येते.
आपल्याकडे बहुतेकांच्या दोन लशी घेणे झाले आहे. अशांना तिसरी म्हणजे बुस्टर डोस आता नाकावाटे लस घेता येणार आहे. भारत बायोटेकने ही लस आणली आहे. या लसीच्या वापराला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संमती दिली आहे. १८ वर्षे आणि त्यावरील ज्या नागरिकांनी करोनाला प्रतिबंध करणारी कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड ही लस घेतली आहे त्यांना ही लस बूस्टर म्हणून घेता येणार आहे. सुई नसलेली ही लस सध्या खासगी केंद्रांवर उपलब्ध आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही कोविन या पोर्टलवरही उपलब्ध होईल.
भारतात सब व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. BF 7 या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण भारतातही आढळले आहेत. सध्या चार रूग्ण या व्हेरिएंटची लागण झालेले आहेत. यातला पहिला रूग्ण हा जुलै महिन्यात भारतात आढळला होता आणि तो या व्हेरिएंटने संक्रमित झाला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही दोन रूग्ण याच व्हेरिएंटने संक्रमित झाल्याचं आढळून आलं आहे. कोरोनाचा हा नवा वंशज आपल्याकडे धोकादायक अजून ठरला नसला तरी तो केव्हा बिथरेल सांगता येत नाही. ज्या ठिकाणी लसीकरण कमी किंवा अत्यल्प प्रमाणात झालं आहे, ज्या ठिकाणी रूग्णांची प्रतिकार शक्ती कमी झाली आहे अशा भागांमध्ये करोना वाढतो आहे. लोकांच्या हे लक्षात आल्याने की काय, ह्या चार दिवसात लस घेणाऱ्यांची गर्दी वाढत आहे.
228 Total Likes and Views