जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीये. विशेषत: दक्षिण अमेरिकन देश आणि चीनमध्ये संक्रमित लोकांची संख्या सातत्यानं वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाची प्रकरणं स्थिर आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांचा कल पाहिल्यास भारतातही कोरोनाच्या प्रकरणांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर आलंय.
गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या देशात ११ टक्के वाढली आहे. १२ ते १८ डिसेंबर दरम्यान एका आठवड्यात देशात ११०३ रुग्णांची नोंद झाली, तर १९ ते २५ डिसेंबर दरम्यान देशातील कोरोना रुग्णांची संख्या १२१९ वर पोहोचली. भारतात कोरोना रुग्णांची वाढ फार मोठी नाही. परंतु, काही राज्यांमुळं संपूर्ण देशात कोरोनाची सरासरी वाढत आहे. या मध्ये मध्य भारतातील महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, दक्षिण भारतातील तेलंगणा आणि पूर्व भारतातील ओडिशा या राज्यांचा समावेश आहे.इतर देशांमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नवीन सबवेरियंट BF.7 मुळं किंवा चीनमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या वाढत्या चाचण्यांमुळं कोरोनाची ही प्रकरणं वाढली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कोरोना संसर्गामुळं मृत्यूची संख्या अजूनही खूपच कमी आहे. १९-२५ डिसेंबर दरम्यान देशात फक्त १२ मृत्यू झाले आहेत, तर १२-१८ डिसेंबर दरम्यान 20 मृत्यूची नोंद झाली. मागील आठवड्यातील आकडेवारीशी तुलना केली तर १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्याच वेळी, इतर नऊ राज्यांमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या गेल्या आठवड्याइतकीच राहिली आहे. ज्या राज्यांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, त्यापैकी फक्त राजस्थान आणि पंजाब ही अशी आहेत, जिथं गेल्या आठवड्याच्या तुलनेत बाधितांची संख्या ३० ने वाढली तर, केरळमध्ये बाधितांची संख्या ३१ नं कमी झाली.
105 Total Likes and Views