राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल १ वर्ष, १ महिना आणि २७ दिवसांनी अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. ईडी आणि सीबीआय अशा दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी मिडीयाला पहिली प्रतिक्रिया दिली. देशमुख म्हणाले, “मला खोट्या आरोपात फसवण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी माझ्या १०० कोटी रुपयांचा खोटा आरोप लावला. मात्र, त्याच परमवीरने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचे जे आरोप केले ते फक्त ऐकीव माहितीवर आधारित आहेत. माझ्याकडे त्याबाबत काहीही पुरावा नाही.”
देशमुख यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अजित पवार, जयंत पाटील यासह अनेक नेते तुरुंगाबाहेर जमले होते.
अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. देशमुख यांची जामिनावर सुटका हा सीबीआयला आणि ईडीलाही मोठा धक्का आहे.
413 Total Likes and Views