प्रत्येकासाठी त्याची आई स्पेशल असते. जीव की प्राण असते. आई गेली तर जग गेले. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे कवीने म्हटले ते उगाच नव्हे. आणि ही आई जर पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सारख्या माणसाची असेल तर? ती आई कशी असेल? मोदींची आई हिराबेन यांनी वयाच्या १०० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अंत्यसंस्काराला खुद्द मोदी धावले. आईचा निष्प्राण देह पाहून मोदी रडले असतील काय? कल्पना नाही. पण आईला खांदा देताना ते कमालीचे भावूक झालेले दिसत होते. ‘एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी लीन झाले’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र आईला मुखाग्नी दिल्यानंतर तासाभरातच ते आपल्या कामाला भिडले. बंगालमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसला त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिरवी झेंडी दाखवली. सारे जग त्यांची आई गेल्याबद्दल हळहळ व्यक्त करीत असताना हा गडी कामाला बसला होता. कर्तव्यपरायणता म्हणतात ती अशी. असा समाधिस्त मुलगा जन्माला घालणारी आई किती तेजपुंज असेल? कशी होती मोदींची आई?
हिराबेन अतिशय साध्या होत्या. गरिबीत वाढल्या. त्यांना पाच मुलं आणि एक मुलगी. नरेंद्र हे तिसऱ्या नंबरचे. बाकी मुलं चमकले नाहीत. पण हा हिरा चमकला. नरेंद्र मोदी आपल्या आईबद्दल बोलताना म्हणतात, “आम्ही सारे मातीच्या घरात राहत होतो. ह्या घराला खिडकीही नव्हती. तसल्या घरात आईने आम्हा सर्वांना आनंदाने वाढवले. संस्कार दिले. आईने खूप कष्ट उपसले. पण तिने कधी चिडचिड केली, आदळआपट केली असे आठवत नाही. रोज पहाटे चार वाजता ती उठायची. दळण, निवडण, साफसफाई …घरची सारी कामे करून मग ती बाहेर कामाला जायची. घरखर्च भागवण्यासाठी इतरांच्या घरी भांडी घासली. मिळेल ती कामे केली. त्यातून चार पैसे तिला मिळायचे. ती शिकली नव्हती. पण मुलांनी शिकावे यासाठी तिने बाहेर कामे केली. मी माझ्या आईच्या अंगावर कधी सोन्याचांदीचे दागिने पाहिले नाहीत. मुलगा पंतप्रधान झाला म्हणून तिने हौसमौज केली नाही. मी तिला एकदाच दिल्लीला आपल्या बंगल्यावर घेऊन गेलो होतो.”
हिराबेन १०० वर्षे जगल्या. शेवटपर्यंत त्यांना तब्येतीचा कुठला त्रास नव्हता. अखेरपर्यंत घरातले जमेल तेवढे स्वतःचे काम त्या स्वतः करायच्या. ह्याचे रहस्य काय? त्याचे रहस्य त्यांच्या साध्या राहणीत आहे. चांगल्या विचारात आहे. त्यांनी कधी बाहेरचे खाल्ले नाही. घरचेच जेवल्या. खिचडी, वरण, भात आणि गोडामध्ये लापसी त्यांना आवडायची. मोदींचा आईमध्ये खूप जीव होता. जेव्हा केव्हा वेळ मिळायचा, मोदी आईकडे जायचे. तिच्याशी खूप गप्पा मारायचे. हल्लीची मुलं आपल्या आईशी किती बोलतात हा संशोधनाचा विषय आहे. १०० व्या वाढदिवशी मोदी आईला भेटायला गेले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘बुद्धीने काम कर, शुद्धपणे जग.’ शंभराव्या वर्षी एक आई मुलाने कसे जगावे याची काळजी करते आहे. ह्यावरून हिराबेनची मानसिकता ओळखा. तुम्हालाही सुख हवे असेल तर शुद्ध जगा. म्हणजे सेंच्युरी पक्की.
113 Total Likes and Views