क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला पहाटेच्या सुमारास अपघात झाला. पंत दिल्लीहून उत्तराखंडला जात असताना त्याच्या कारला भीषण अपघात झाला. रुरकीमध्ये ऋषभची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात ऋषभच्या डोक्याला, कंबरेला, पाठीला आणि पायांना जखमा झाल्या. अपघात इतका भीषण अपघात होता की, त्याच्या मर्सिडीज कारनं काही सेकंदांत पेट घेतला. सुदैवानं ऋषभ कारच्या बाहेर आला होता. त्यामुळे त्याचा जीव वाचला. रस्ते म्हणजे क्रिकेटची पीच नाही हे एव्हाना त्याच्या लक्षात आले असेल. ६१ लाख रुपये किंमतीची गाडीही त्याला जखमा करून गेली. महागड्या गाड्यांचे अपघात हल्ली वाढताहेत. त्यामुळे नेटकरींना टोले मारायला मोका मिळाला आहे. ‘मर्सिडीजपेक्षा मारुती बरी’ अशा पोस्ट व्हायरल होत आहेत.
डुलकी लागल्यामुळे पंतचा गाडीवरील ताबा गेल्याचे आता सांगितले जात आहे. पण डुलकी लागेपर्यंत गाडी का चालवतात लोक? का धोका पत्करतात? मला काय होणार? अशी मस्ती असते. तीच जीवावर बेतते. ह्या अपघातामुळे पुन्हा एकदा सीट बेल्टचा विषय चर्चेत आला आहे. वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर आवश्यक असतो. त्यानं सीट बेल्ट लावला असता तर त्याला झालेल्या जखमांची तीव्रता कमी झाली असती. मर्सिडीज बेन्झ जीएलसी ही प्रीमियम एसयूव्ही कार आहे. कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स आहेत. मात्र पंतनं सीट बेल्ट वापरला नसल्यानं कारला अपघात झाल्यानंतर एअरबॅग उघडल्या नाहीत अशी माहिती आहे.
गेल्या वर्षभरात तब्बल १६ हजारांहून अधिक जणांचा अपघाती मृत्यू सीटबेल्ट न लावल्यामुळे झाला. यातील निम्मे प्रवासी मागच्या सीटवर बसलेले होते. २०२१ मघ्ये १६ हजार ३९७ जणांचा मृत्यू वाहनातून प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यामुळे झाला. यातील ७ हजार ९५९ जण मागच्या सीटवर बसून प्रवास करत होते. सीटबेल्ट न लावल्यानं मृत्यूमुखी पडलेल्या चालकांची संख्या ८ हजार ४३८ इतकी आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारला चार महिन्यांपूर्वी मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघात झाला. मिस्त्री यांची मर्सिडीज कार भरधाव वेगानं दुभाजकाला आदळली. पालघरमधील नदीच्या पुलावर हा अपघात झाला. त्यावेळी मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे एअरबॅग उघडली गेली नाही. ही चूक मिस्त्री यांच्यासाठी जीवघेणी ठरली.
अपघात टळू शकतो. पण तशी कोणाची इच्छा आहे? १००-१५० च्या स्पीडने गाडी चालत असेल तर देवच मालक आहे. ह्या पंतला पोलिसांनी वेगात गाडी चालवल्याबद्दल दोनदा चालान केले आहे. पंतने दंड भरणे तर दूर, दखलही घेतली नाही. माणूस एवढा बेपर्वा कसा वागू शकतो? वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात रोखले जाऊ शकतात. हल्ली रात्री गाडीने जाण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री रस्ते मोकळे असतात. त्यामुळे गाडी वेगात हाकणे सोपे जाते. गाडीवर ताबा ठेवता येत असेल तर ठीक आहे. पण बहुतेक अपघात ताबा सुटल्यामुळे झाले आहेत. चार दिवसापूर्वी आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला अपघात झाला. गोरे बचावले. पण त्यातून रात्रीच्या प्रवासाचे धोके उघड झाले आहेत. ‘रात्री प्रवास शक्यतो टाळा’ असा सल्ला खुद्द राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांना द्यावासा वाटला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तर अपघातासाठी कुख्यात आहे. त्यात आता समृद्धी महामार्ग सुरु झाला आहे. विमानाच्या वेगाने कार चालवण्याचे वेड स्वार होऊ पाहते आहे. हे कसे थांबवायचे?
95 Total Likes and Views