राज्यातील सत्तांतर होत असताना ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या एका लाईनमुळे रातोरात प्रकाशझोतात आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिवाळी अधिवशेनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांनंतर शहाजीबापू पाटील अचानक गायब झाले होते. शहाजीबापू पाटील कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचा अखेर उलगडा झाला. शहाजीबापू हे इतके दिवस वजन कमी करण्यासाठी बंगळुरूतील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेल्याची माहिती मिळाली. शहाजीबापू पाटील यांनी आठ दिवसांमध्ये तब्बल नऊ किलो वजन घटवले आहे.
शहाजीबापू पाटील २४ डिसेंबरपासून श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात वजन कमी करण्यासाठी थेरपी घेत होते. आश्रमात शहाजीबापू पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने करायचे, यानंतर उकडलेल्या पालेभाज्या , कडधान्ये याचा नाश्ता करून दुपारी बौद्धिक ऐकायचे आणि ध्यान धारण करायचे. वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम करायचा, संध्याकाळी ध्यानधारणा असा शहाजीबापूंचा दिनक्रम होता. अवघ्या आठ दिवसांत शहाजीबापू यांचे वजन ९ किलोंनी कमी झाले. बापू मैदानात येतील तेव्हा काय डायलॉग मारतील याचीच सोशल मिडीयावर चर्चा रंगते आहे. बापू असं म्हणतील काय, की ‘काय डायट, काय आश्रम, काय तो बाबा. सारं एकदम ओक्के.’
425 Total Likes and Views