सारा देश मध्यरात्री नववर्षाचे स्वागत करण्याच्या जल्लोषात असताना २० वर्षाची एका तरुणी धावत्या कारला अडकून सुमारे तासभर दिल्लीच्या रस्त्यावर फरफटत जात होती. ही तरुणी मदतीसाठी हाक देत होती, पण तिच्या मदतीसाठी कोणीही धाऊन आलं नाही. आत बसलेल्या मद्यधुंद तरुणांच्या कानीही तिच्या किंकाळ्या आल्या नाहीत. ज्या कारनं तिला तब्बल १३ किमीपर्यंत फरफटत नेलं ती कार चार पोलीस स्टेशनसमोरुन गेली. पण पोलिसांनाही ती दिसली नाही. मात्र एका व्यक्तीच्या ते लक्षात आले. कारच्या खालच्या बाजूला महिलेचा मृतदेह लटकल्याचे त्याला दिसले. त्याने लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलीस पोचले तो पर्यंत उशीर झाला होता. दरम्यानच्या काळात वाटेत कारच्या चाकात काहीतरी अडकले असे लक्षात आलेल्या तरुणांनी तिला बाजूला काढले तेव्हा ती मेली होती. तिला तसेच टाकून ती मुलं पळाली. नंतर पोचलेल्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पाच जणांना अटक केली. हा प्रकार उजेडात आला तेव्हा दिल्लीच नव्हे तर सारा देश हादरला. दिल्लीत लोक संतापून रस्त्यावर आले. तरुणीला १३ किलो मीटर फरफटत नेणाऱ्याना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
पोलीस तपासात नेमका प्रकार लक्षात आला आहे. फरफटत गेलेली तरुणी कामावरून घरी परतताना एका कारने तिच्या स्कुटीला धडक दिली होती. आत बसलेले तरुण दारू प्यालेले होते. त्या धुंदीत त्यांच्या ते लक्षात आले नाही. मात्र इकडे कारच्या बंपर आणि चाकांमध्ये ती तरुणी फसली होती. तिचा मृतदेह मिळाला तेव्हा ते दृश्य भयावह होते. सारे शरीर घासले गेले होते. अंगातले सारे रक्त वाहून गेले होते. एक पाय गायब होता. अंगावर कपडे नव्हते. त्यामुळे बलात्काराची शंका पोलिसांना आली. पण पोस्ट मार्टेम अहवालात तसे काही दिसले नाही. मग आता ह्या मुलांना काय शिक्षा द्यायची?
एका तरुणीला त्यांनी जगातून उठवले. तिचे कुटुंबही रस्त्यावर आले आहे. घरात ती एकटी कमावणारी होती. तिच्या कमाईवर घर चालायचे. सारे उध्वस्त झाले. माझ्या मुलाला परत द्या…असे म्हणत ती माउली आक्रोश करीत आहे. तिला काय सांगायचे? काहींचा जल्लोष तर एकीचा आक्रोश. नववर्षाला ज्या पद्धतीने लोक बेभान होऊन रस्त्यावर उतरतात त्याने धडकी भरते. त्या रात्री कोणी अडचणीत असू शकते याचे भान पाळले जात नाही. ह्या बेशिस्त समाजात राहायला आपण दिवसेंदिवस अपात्र ठरत चाललो आहोत का? काही मुठभर पैसेवाले भन्नाट गाड्या हाकणार. जीव प्यारा असेल तर तुम्ही तुमची काळजी घ्या. रस्त्यावरचे अपघात अलीकडे रोजचे कार्यक्रम झाले आहेत. युद्धात मरत नाहीत तेवढे रस्त्यावर अपघातात लोक मरत आहेत. कोणत्या राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर हा विषय आहे?
काय शिक्षा होऊ शकते त्या तरुणांना ? बलात्काराची ही केस नाही. कायद्याच्या भाषेत बोलायचे तर दारू पिऊन गाडी चालवून केलेल्या अपघातात एकीचा बळी गेला असा आता मामला आहे. अशा गुन्ह्यात फार फार तर जन्मठेप होऊ शकते असे अनेकांना वाटते. गुन्हे स्वस्त झाले असे म्हणावे का?
159 Total Likes and Views