दारातील रांगोळ्या आणि घरातील तुळशी या पारंपारिक पद्धती असून त्यांना वैज्ञानिक आधार आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपूर येथे आयोजित भारतीय महिला विज्ञान काँग्रेसमध्ये त्या बोलत होत्या.
कांचन गडकरी या भारतीय कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी काम करणार्या ‘संस्कार भारती’ या संस्थेच्या अध्यक्षा आहेत. नवीन पिढीला या प्राचीन प्रणालींचा स्वीकार करण्यासाठी पारंपारिक पद्धती वैज्ञानिक पार्श्वभूमीसह समजावून सांगणे आवश्यक आहे, असे सांगून त्या म्हणाल्या. “तुळस ऑक्सिजन देते आणि हवा शुद्ध ठेवते. म्हणूनच आपण ती आपल्या घरात ठेवतो. त्याचप्रमाणे, घराच्या दाराजवळ रांगोळी काढण्यामागेही एक शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण रांगोळ्यांमध्ये रंग, स्वस्तिक, ‘गोपद्म’ (गाईच्या रूपातील लक्ष्मी), गदा शंख पाहतो तेव्हा माणसाच्या मनातील वाईट विचार नाहीसे होतात आणि ती व्यक्ती सकारात्मकतेने आपल्या घरात प्रवेश करते. नवीन पिढीला वैज्ञानिक दृष्टीकोनातून भारतीय संस्कृतीची माहिती दिली पाहिजे. “प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. ते शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झाले आहे. नवीन पिढी प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान आणि कारणे शोधते. त्यामुळे आपल्या नवीन पिढीला भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी, असे वाटत असेल तर आपल्याला वैज्ञानिक पार्श्वभूमी देत समजावून सांगणे आवश्यक आहे” असेही त्या म्हणाल्या.
300 Total Likes and Views