पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसांचे १८- १८ तास काम करत असल्याचा प्रचार भाजपाकडून केला जातो. एवढे काम करुनही पंतप्रधान मोदी या वयात आजारी पडले तर त्यांचा उपचाराचा खर्च कोण करतं? की मोदी ह्या आठ वर्षात कधी आजारीच पडले नाहीत? सामान्य माणसाला हा प्रश्न अनेकदा पडला आहे. पण विचारणार कोणाला? पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी थेट पंतप्रधान कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली. देशाचे पंतप्रधान हे देशात आणि परदेशात दौऱ्यावर असताना त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च कुणाकडून केला जातो? असा प्रश्न आरटीआयद्वारे विचारला गेला. यावर उत्तर देत असताना पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले की, २०१४ पासून आतापर्यंत मोदींच्या वैद्यकीय खर्चापोटी पंतप्रधान कार्यालयाने एकही रुपया खर्च केलेला नाही.
खरंतर आपल्याकडे खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना अनेक सोयी-सुविधा पुरविल्या जातात. पंतप्रधानांना देखील अनेक सुविधा योजलेल्या आहेत. तरिही मोदींनी आतापर्यंत स्वतःचा वैद्यकीय खर्च स्वतःच केला आहे. सरकारच्या तिजोरीतून आजवर एकही रुपया खर्च झालेला नाही.
पंतप्रधान कार्यालयातील सचिव विनोद बिहारी सिंह यांनी प्रफुल्ल सारडा यांच्या या आरटीआय अर्जाला उत्तर देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वैद्यकीय उपचारासाठी सरकारने तरतूद केलेली असते. मात्र याचा विनियोग आजवर करण्याची वेळ आलेली नाही. “पंतप्रधान कार्यालयातील माहितीनुसार मोदींवर उपचारासाठी आजवर खर्च झालेला नाही.”, असेही त्यांनी कळविले. हे विनोदद्जीही मोठे चलाख निघाले. मोदींची मेडिकल बिलं निघाली नाहीत हे त्यांनी सांगितले. पण मोदी आजारी कधी पडले का? पडले असतील तर त्यांची बिलं कोणी दिली? मोदींनी स्वतःच्या खिशातून बिलं दिली का? हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.
119 Total Likes and Views