विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा आदेश झुगारून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. याच कारणामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
नाना पटोले म्हणाले, “तांबे परिवाराचे काय झाले? याबाबतचे प्रश्न आम्हाला विचारू नये. कारण आम्ही त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. राहिला प्रश्न बाळासाहेब थोरात यांचा तर ते आमचे नेते आहेत. सध्या ते रुग्णालयात आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.
सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आलेला आहे. या जागेवर विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना पक्षाने एबी फॉर्मही दिला होता. मात्र अर्ज करण्याची मुदत संपेपर्यंत सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाच नाही. त्याऐवजी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या नंतर घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींनी राजकारण तापलं आहे.
एक गोष्ट आज चांगली झाली. नाशिक आणि नागपूरच्या जागेवरून महाआघाडीतला गोंधळही संपला. पटोले यांनी आघाडीच्या पाचही उमेदवारांची यादी जाहीर केली. नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले, अमरावती विभागात धिरज लिंगाडे, औरंगाबदमध्ये विक्रम काळे, नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि कोकणात बाळाराम पाटील असे पाच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.
येत्या ३० जानेवारी रोजी विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान होई. दोन फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. ह्या वेळच्या निवडणुका विचित्र आहेत. भाजपने केवळ अमरावतीत आपला उमेदवार म्हणजे रणजीत पाटील यांना उभे केले आहे. इतर चारही जागी भाजप अपक्षांना पाठिंबा देत आहे. काय होणार नाशिकमध्ये? सत्यजित तांबे अजूनही गोंधळात आहे का? सुरुवातीला त्यांनी मी भाजपला विनंती करेन असे म्हटले होते. चार दिवसाने त्याचा सूर बदलला. पण आता कॉन्ग्रेसने त्यांना काढले आहे. त्यामुळे भाजपला पाठिंबा मागण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पण तसे तो करील? त्यात धोका आहे. कारण हा मतदारसंघ काँग्रेसी विचारांचा आहे. भाजपचा पाठिंबा उघड घेतला तर ते अंगावरही येऊ शकते. सत्यजित हा थेट देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार आहे. त्यामुळे देवेंद्र आता काय खेळी खेळतात त्याकडे राज्याचे लक्ष राहील.
241 Total Likes and Views