जगाची आणि आपल्या भारताची काय परिस्थिती आहे? जागतिक मंदी येत आहे काय? असे काय आभाळ कोसळले की, कर्मचाऱ्यांना घरी पाठवणे सुरु झाले आहे. अलीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू आहे. तुम्हाला साधा ई मेल येतो आणि सारे संपते. युनियन तर केव्हाच संपल्या आहेत. फक्त सरकारी उद्योगात युनियन आहेत. त्यामुळे भविष्यात आपल्या मुलांपुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना येते. ‘नोकऱ्या करू नका. नोकऱ्या देणारे बना’ म्हणणे सोपे आहे. पण कशी द्यायची नोकरी? कोणत्या सरकारकडे भक्कम योजना आहे?
ट्विटरने जवळपास ५० टक्के कर्मचारी कामावरून काढून टाकले आहेत, तर फेसबुकनेही जवळपास ११ हजार लोकांना बेरोजगार केले आहे. आता गुगलही कर्मचारी कपात करतो आहे. सरकारी नोकरीत एकदा माणूस चिपकला की रिटायर होईपर्यंत बिनधास्त राहतो. खासगी कंपन्यामध्ये रिझल्ट द्यावा लागतो. सरकारी नोकऱ्या नसल्यासारख्या झाल्या आहेत. त्यामुळे खासगीशिवाय पर्याय नाही. पण आता तिथेही कपात सुरु झाल्याने आपले काय होणार? ह्या तणावात नवी पिढी खंगु लागली आहे. असंख्य तरुण टेन्शनचे बळी पडत आहेत.
गुगलची कंपनी अल्फाबेट जगातील आपल्या ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. संघ व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांचे मुल्यांकन करण्याचे सांगितले गेले आहे. जे खराब कामगिरी करत आहेत त्यांना कामावरून काढले जाणार आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीतील काही कर्मचार्यांसाठीही हे नववर्ष फार चांगलं सुरू झालं नाही. या कंपनीने येत्या मार्चअखेर १० हजार लोकांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पाच टक्के कर्मचारी कमी करण्याची मायक्रोसॉफ्ट कंपनीची योजना आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला नोकर कपात करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीत २१ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या एका भारतीय व्यक्तीने नोकरी गमावली आहे.
अॅमेझॉन कंपनीने भारतासह जागतिक स्तरावर नोकर कपात करण्यास सुरुवात केली आहे. अॅमेझॉन कंपनीत सुमारे एक लाख भारतीय लोक काम करतात. यातील एक टक्के म्हणजेच एक हजार जणांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.
नोकरीचे विश्व कमालीचे अकल्पनीय झाले आहे. नवनवी टेक्नोलॉजी येत आहे. त्या हिशोबाने कंपन्या रंग बदलत आहेत. तरुणांनाही त्या हिशोबाने स्वतःची उत्पादकता आणि उपयोगिता वाढवावी लागेल. केवळ डिग्री दाखवून नोकरी मिळवण्याचे दिवस संपले असाच संदेश ह्या कर्मचारी कपातीने दिला आहे.
513 Total Likes and Views