तुम्ही जगाला मूर्ख बनवू शकाल. मात्र नागपूरला मूर्ख बनवू शकत नाही. भले भले बाबा इथे उघडे पडले. बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण महाराज यांचा आता नंबर लागणार का? बागेश्वर सरकार यांच्या रामकथेचे नुकतेच नागपुरात आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने लोकांसमोर ते दिव्य दरबार भरवत होते व तेथे आपल्याकडे दिव्यशक्ती असल्याचा दावा करीत होते. तुमची ओळख नसताना तुमच्या मनातले ओळखतो, तुमचे नाव घेतो, बाजूच्या खोलीत काय ठेवले आहे ते सांगतो…. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी आक्षेप घेतला. पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. महाराज यांना त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पूर्वनियोजित वेळेच्या आधीच आटोपता घ्यावा लागला. परिणामी धीरेंद्र कृष्ण महाराज व अंनिस यांच्यातील वाद विकोपाला गेला व महाराज चर्चेत आले. महाराज म्हणतात, चमत्कार माझा नाही, माझ्या इष्टदेवाचा आहे. समितीने महाराजाला त्यांची दिव्यशक्ती नागपुरात सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. महाराज हा कार्यक्रम रायपुरला करू असे म्हणतात. तो होईल वा न होईल, पण सध्या महाराजाची धूम चर्चा आहे. महाराज फक्त २६ वर्षांचा आहे. एवढ्या वयात एवढी कीर्ती? भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी त्यांचे दर्शन घेऊन गेले. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए असे म्हणतात ते खरे आहे.
धीरेंद्र कृष्ण यांचा जन्म मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गडा या गावी झाला. त्यांच्या आजोबांनी त्यांना रामायण आणि भागवत गीता वाचायला शिकवले. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी हनुमानाची पूजा आणि १२व्या वर्षीपासून प्रवचन देण्यास सुरुवात केली. त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. ते मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पुजारी आहेत. आपण हनुमानाचा अवतार असल्याचा दावा ते करतात. त्यामुळे त्यांना ‘गदाधारी महाराज’ असेही म्हटले जाते. धीरेंद्र कृष्ण यांचा दरबार जेथे भरतो त्या स्थळाला बागेश्वर धाम म्हणून ओळखले जाते व ते मध्य प्रदेशमध्ये छतरपूर जिल्ह्यात आहे. तेथे २००३पासून ते दरबार भरवत आहेत. तेथे ते नियमित प्रवचन करतात. त्यांचे लाखो भक्त आहेत. ते ‘चमत्कार’ करीत असल्याचा दावा त्यांचे भक्त करतात. त्यामुळे त्यांच्या प्रवचनाला गर्दी होते. त्यांच्या रामकथेच्या व कथित चमत्काराच्या अनेक चित्रफिती समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत. महाराजांच्या कथित दिव्यशक्तीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला. समितीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायद्या लागू आहे व त्यानुसार भविष्य सांगणे, चमत्कार करणे, दिव्यशक्तीने वस्तू ओळखण्याचा दावा करणे यावर बंदी आहे. आजार बरे करण्याचा दावा करणे आणि त्यातून पैसा कमावणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. महाराजाचा दरबार युट्यूबवर लोक पाहत आहेत. त्यामुळे प्रभावित होऊन मोठ्या संख्येने लोक धीरेंद्र महाराज यांच्या नादी लागत आहेत. यातून जनतेची फसवणूक होत आहे, त्यामुळे महाराजावर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसने केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र महाराजाच्या विरोधात आक्षेप घेतल्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी अंनिसला लक्ष्य करणे सुरू केले. विश्व हिंदू परिषदेने महाराजाच्या समर्थनार्थ व अंनिसच्या विरोधात आंदोलन केले. अंनिस केवळ हिंदू बाबांच्या विरोधातच का बोलते, इतर धर्मीयांबाबत का बोलत नाही? असा त्यांचा सवाल
71 Total Likes and Views