विधान परिषद निवडणुकांचा एरवी फारसा गाजावाजा होत नसतो. अनेकदा तर त्या झाल्या हे निकालानंतरच कळते. ह्या निवडणुकीतले मतदार निवडक क्षेत्रातले असतात. पदवीधर मतदारसंघात पदवीधर मतदार असतात. शिक्षक मतदारसंघात शिक्षक मतदार असतात. मतदार होण्यासाठी नाव नोंदवावे लागते. ज्याला लढायची इच्छा असते ती व्यक्ती किंवा संघटना मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेते. राजकीय पक्ष असल्या निवडणुकांमध्ये क्वचितच रस घेत आला. इथले आमदारही फारसे प्रकाशझोतात नसतात. मात्र ह्या वेळच्या निवडणुका काही वेगळ्या आहेत. नाट्यमय घडामोडी होत आहेत, नवनवे ट्वीस्ट येत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने तर संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघते आहे. इथे कॉन्ग्रेसचा उमेदवार नाही, भाजपचाही नाही. अपक्ष लढताहेत. पित्याला म्हणजे डॉ. सुधीर तांबे यांना निलंबित करून कॉन्ग्रेसने त्यांच्या मुलाची निवडणूक सोपी केली अशी चर्चा आहे.
नाशिकची जागा महाआघाडीतल्या कॉन्ग्रेसच्या वाट्याला गेली होती. गेल्या तीन निवडणुका जिंकत आलेल्या डॉ. सुधीर तांबे यांना ह्या वेळीही उमेदवारी दिली, एबी फॉर्मही पाठवला. उमेदवारी अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे सत्यजित तांबे यांना अपक्ष म्हणून अर्ज भरायला लावला आणि एकच खळबळ उडाली. प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘आम्हाला फसवले.’ मात्र ‘काहीतरी शिजतंय’ असे मी कॉन्ग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना फोन करून सांगितले होते’ असे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांचे म्हणणे आहे. मग थोरात गप्प का राहिले? इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. १९८५ ची गोष्ट आहे. तेव्हाचे मोठे प्रस्थ भाऊसाहेब थोरात यांना संगमनेरचे विधानसभेचे तिकीट हवे होते. पण मिळाले नाही तेव्हा त्यांच्या मुलाने बंड केले, अपक्ष म्हणून निवडूनही आला. तेव्हाच नव्हे तर पुढे सलग ९ निवडणुकीत निवडून येतो आहे. तो मुलगा म्हणजे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात. सत्यजित तांबे हा त्यांचा भाचा. भाच्याने बंड केले असताना मामा मात्र थंड आहे. मौन आहे. काय राजकारण आहे? महाआघाडी भक्कम आहे अशा गप्पा आघाडीचे नेते नेहमी मारतात. मात्र त्यांच्यातला प्रचंड विसंवाद, असमन्वय ह्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. अजिबात ताळमेळ नाही. उमेदवारी अर्ज मागे घ्यायची मुदत केव्हाच संपली. महाआघाडीचा घोळ सुरूच आहे. नाशिकमध्ये शुभांगी पाटील नावाची एक लढाऊ महिला कार्यकर्ती आयती उद्धव ठाकरे यांच्या हाताशी लागली. नागपूर शिक्षक मतदारसंघात तर पटोले यांच्या घोषणेची वाट न पाहता माजी मंत्री सुनील केदार यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराची घोषणाही करून टाकली. ही निवडणूक अचानक आली नाही. नियोजन करता आले असते. सत्यजित तांबे हे गेली २२ वर्षे कॉन्ग्रेसचे काम करताहेत, युवक कॉन्ग्रेसचे प्रदेशचे अध्यक्षही होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला देवेंद्र फडणवीस पाहुणे होते. ‘चांगल्या तरुणांना किती दिवस बाहेर ठेवणार? आमचं लक्ष जाते’ ह्या एका वाक्यात फडणवीस यांनी आजच्या वादळाची कल्पना दिली होती. दरबारी राजकारण करणाऱ्या कॉन्ग्रेसवाल्यांना देवेंद्र यांचा इशारा कसा कळणार? त्यांनी केवळ डॉ. सुधीर तांबे यांना सस्पेंड केले नाही तर त्यांना मानणाऱ्या तमाम मतदारांना गमावले आहे. ‘भाजप घर फोडण्याचे काम करतो’ अशा शब्दात पटोले आरडाओरडा करीत आहेत. पण कॉन्ग्रेसला त्यांची चांगली माणसे सांभाळता येत नसतील तर हेच होणार. आज तांबे गेले, उद्या सोने, पितळ….सारे जाणार. देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या नेतृत्वगुणाला सलाम केला पाहिजे. फडणवीस अशी काही खेळी खेळतात की विरोधकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ होतो. त्यांना ‘मंत्रालयातली फाईल’ कळते, ‘सचिन वाझे’ कळतो आणि कार्यकर्त्यातलं ‘सोनं’ही कळते. त्यांनी मेहनती, अभ्यासू, जिगरबाज तगडी टीम बांधली आहे.
कॉन्ग्रेसमध्ये चांगल्या कार्यकर्त्याला पुढेच येऊ देत नाहीत. पाय ओढणे सुरु होते. त्यामुळे कॉन्ग्रेसला वाईट दिवस आले आहेत. ‘यात्रे’त जोडो आणि यात्रा गावातून गेली की ‘तोडो’ असा हा फंडा आहे. गांधी-नेहरूंची कॉन्ग्रेस केव्हाच संपली. आता दिसते ती पटोले कॉन्ग्रेस, केदार कॉन्ग्रेस….. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची कॉन्ग्रेस आहे. पुढाऱ्यांनी आपापल्या नावाने दुकानदारी चालवली आहे. तिकडे साखर कारखानदार आहेत, इकडे मेडिकल कॉलेजवाले. लोकांशी काही घेणेदेणे नाही.
नाशिकच्या निमित्ताने कॉन्ग्रेसची पार नाचक्की झाली. तुम्ही साधा नवरदेव बोहल्यावर उभा करू शकत नाही आणि गप्पा भाजपशी पंगा घेण्याच्या करता? काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी लेटरबॉम्ब टाकला. हे आशिष म्हणजे कॉन्ग्रेसमधले ‘सुब्रमण्यम स्वामी’ आहेत. त्यांचे पिताश्री रणजीतबाबू दोन वेळा प्रदेश कॉन्ग्रेसचे अध्यक्ष होते. तेही विदर्भावरच्या अन्यायाबद्दल खूप बोलायचे. ते आक्रमक झाले की इंदिराजी त्यांना थेट प्रदेश अध्यक्ष करून टाकायच्या. ना बास बजेगा, ना बासरी. आता तर त्यांच्या सुपुत्राने थेट पटोले यांना हटवा अशीच मागणी केली. पटोले यांच्या कारकिर्दीत कॉन्ग्रेस पाचव्या क्रमांकावर गेली असे सांगताना त्यांनी पाच नमुनेही सांगितले. पटोले यांनी संघाच्या एका कार्यकर्त्याला फोडून विधान परिषदेला उभे केले. संघाचा माणूस फोडला म्हणजे राहुलबॉस खुश होईल असे पटोले यांना वाटले असावे. मात्र ह्या कार्यकर्त्याकडे त्याच्या स्वतःच्या मताशिवाय काहीही नव्हते. त्यामुळे अखेरच्या क्षणी उमेदवार बदलला. पण मार खाल्लाच. भाई जगताप आले मात्र चंद्रकांत हंडोरे पडले. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीत कॉन्ग्रेसच्या १० आमदारांनी दांडी मारली आणि आता तांबे यांच्या बंडखोरीला पटोले हेच जबाबदार आहेत असा देशमुख यांचा आरोप आहे. त्यात दम असेलही. पण पटोले राहुल गांधींचे खास आहेत. पटोले हटणार नाहीत. मागणीच करायची तर ‘देवेंद्र फडणवीस यांना भाजपमधून हटवा’ असे त्यांनी मागायला पाहिजे होते. देवेंद्र ‘लय भारी’ निघाल्याने कॉन्ग्रेसची पदोपदी नामुष्की सुरु आहे. समजा पटोले यांना बाजूला केले तर दुसरा आहे कोण? कॉन्ग्रेसमध्ये नेतेच संपले. आहेत ते पेपर टायगर्स. पोस्ट गेली की पुढारी संपला. पटोले यांचेच उदाहरण घ्या. आक्रमक आहेत, फिरतात. पण पक्षातच त्यांना कोणी मोजत नाही. त्यांनी स्वबळाचा नारा दिला तेव्हा ‘मी लहान माणसाशी बोलत नाही’ असे शरद पवार म्हणाले होते. आता पवार मोजत नाहीत म्हटल्यावर विषयच संपला. पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण महाआघाडीच्या अडीच वर्षाच्या राज्यात कॉन्ग्रेसवाल्यांनी त्यांना साधे मंत्रीही होऊ दिले नाही. खरी फजिती २०२४ मध्ये आहे. नागपूर लोकसभा लढायला कॉन्ग्रेसकडे कोण उमेदवार आहे? की वॉकओव्हर देणार? विधान परिषद निवडणुकीत एवढी भांडणे आहेत. २०२४ मध्ये तर हे तिघे एकमेकांचे कपडे फाडतील.
( लेखक ज्येष्ठ पत्रकार आहे)
179 Total Likes and Views