राजकारणातील ह्या नव्या युतीची तशी चर्चा होतीच. अखेर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून दोघांनी बार उडवला. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमधील आंबेडकर भवनात पत्र परिषद घेऊन दोन्ही पक्षांची युती जाहीर केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्यावेळी विचार करून पुढे जाऊ. मात्र, एक गोष्ट नक्की आहे की, महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेपर्यंत देशात जे चाललं आहे ते पोहचवण्याची गरज आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांची युती केवळ ठाकरे गटाशी, माविआशी नाही असे स्पष्ट केले. आंबेडकर म्हणाले, शरद पवारांची मी प्रतिक्रिया वाचली. आमचं दोघांच भांडण जुनं आहे. शेतातलं भांडण नाही. नेतृत्वाचं भांडण नाही. दिशेचं भांडण नाही. ते आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आमच्या युतीला स्विकारेल अशी अपेक्षा.
दोन्ही नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर स्पष्ट दिसते, की आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ठाकरेंनी ही युती केली आहे. जमले तर जमले. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली असा हा मामला दिसतो. ठाकरे यांचा जीव मुंबई महापालिकेत आहे. गेली २५ वर्षे मुंबई महापालिका त्यांच्या ताब्यात आहे. पुढेही ती हवी आहे. पण हे कसे जमायचे? कारण राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांना उद्धव यांची ही चाल आवडलेली दिसत नाही. “मला माहिती नाही. मला त्या भानगडीत पडायचे नाही” ह्या शब्दात पवारांनी मिडीयाला प्रतिक्रिया दिली. कॉन्ग्रेसही वंचित आघाडीसोबत जायला विशेष उत्सुक नाही असे दिसते. मग महाआघाडीचे काय? युतीचे ठीक आहे. पण जागावाटपात मारामाऱ्या होणार. मुंबई महापालिकेतले जागावाटप तीन पक्षात होणार आहे की चार पक्षात? दोन्ही कॉंग्रेसचे मन वळवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली आहे असे आंबेडकर म्हणाले. मात्र राजकारण एवढे सोपे नसते. शरद पवार ज्याला ‘भानगड’ म्हणतात त्या आंबेडकर-ठाकरे युतीचा नवा प्रयोग जमेल? महाआघाडी सरकारचा प्रयोग अडीच वर्षात फसला. आता हा नवा प्रयोग सुरु होतोय त्याचे स्वागतच. पण एका म्यानीत किती तलवारी राहू शकतील? आणि शेवटी ‘हिटलर, हिटलर’ अशी भीती दाखवून तुम्ही मतदारांना किती घाबरवणार आहात.
182 Total Likes and Views