बाप, भाऊ, मामा किती क्रूर होऊ शकतात याचा नमुना नुकताच दिसला. डॉक्टर व्हायला निघालेल्या पोटच्या मुलीला घरच्यांनीच संपवले. तिचा काय गुन्हा होता? तर तिने प्रेम केले होते. अंगावर शहरे आणणारी ही घटना नांदेडच्या महापाल पिंपरी गावातली आहे.
शुभांगी जोगदंड ही तरुणी नांदेडच्या आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, या नात्याला शुभांगीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. कुटुंबीयांनी शुभांगीचे लग्न दुसरीकडे ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या प्रेमसंबंधांविषयी कळाल्यानंतर हे लग्न तुटले होते. त्यामुळे संतापलेल्या जोगदंड कुटुंबीयांनी शुभांगीची हत्या केली. शुभांगीचे वडील, भाऊ, दोन चुलत भाऊ आणि मामा या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सगळ्यांनी २२ जानेवारीला रुमालाने गळा दाबून शुभांगीची हत्या करुन तिचा मृतदेह जाळून टाकला. एवढेच नव्हे तर मृतदेह जाळल्यानंतर उरलेली राख आणि अस्थी गोदावरी नदीत जाऊन सोडल्या होत्या. यानंतर या सर्वांनी शुभांगीचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला, असा बनाव रचला. काही अघटित घडलेच नाही, अशा पद्धतीने सर्व आरोपी आपापली दैनंदिन कामं करत होते. परंतु, एका निनावी फोनमुळे त्यांचे बिंग फुटले.
एका खबऱ्याने पोलिसांना फोन करुन शुभांगीचा खून झाल्याची माहिती दिली तेव्हा पोलिसांनी चक्रं फिरवली. लग्न मोडल्यामुळे गावात बदनामी झाल्याची भावना जोगदंड कुटुंबीयांमध्ये होती. त्यामुळे जोगदंड कुटुंबीयांनी पोटच्या मुलीचा काटा काढायचे ठरवले असे उजेडात आले तेव्हा पोलीसही हादरले.
99 Total Likes and Views