स्वयंघोषित गुरु आसाराम बापूला बलात्काराच्या आणखी एक गुन्ह्यात जन्मठेप झाली आहे. अशाच एक प्रकरणात ८१ वर्षे वयाचा हा बापू जोधपुर तुरुंगात जन्ठेपेची शिक्षा भोगतो आहे. दोन दोन जन्ठेप. म्हणजे आयुष्यभर तुरुंगात सडणार. मग त्याने कमावलेल्या अफाट साम्राज्याचे आणि देशभर पसरलेल्या त्यांच्या आश्रमांचे काय? त्याचे शिष्य सांगतात की, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचे धार्मिक साम्राज्य दहा हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. ट्रस्ट या मालमत्तेची देखरेख करतो आणि त्यांच्या सगळ्या व्यवहारांचं व्यवस्थापन करतो.
आसाराम किंवा तुरुंगात असलेला त्यांचा मुलगा नारायण साई हे काम करत नाहीत. ही जबाबदारी आता आसाराम यांची कन्या भारतश्री पाहत आहे. बापू आता असले तरी त्यांचे आश्रम सुरु आहेत. भक्तगण येतात. त्यात कोठेही खंड नाही. श्रद्धा आंधळी असते असे म्हणतात ते अशी. संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्था असून तिचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. भारती आता या ट्रस्टच्या मुख्यालयातून दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करतात. भारतश्रीसोबत राहणार्यांचं म्हणणं आहे की, आश्रमांचे दैनंदिन कामकाज आणि आर्थिक व्यवहारही नियंत्रित करते. पण, आसारामप्रमाणे ती वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रवचनांसारखा कोणताही कार्यक्रम करत नाही. मीडियासमोरही ती फारशी येत नाही.
भारतश्रीचा जन्म १९७५ मध्ये झाला. २०१३ मध्ये आसारामला अटक झाली तेव्हा भारतश्री आणि आसारामची पत्नी लक्ष्मी देवी यांनाही अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. गेल्या ८ वर्षांत भारतश्रीची पकड खूप मजबूत झाली आहे.आसाराम बापूच्या साम्राज्यामध्ये ४०० हून अधिक आश्रम, १५०० हून अधिक सेवा समित्या, १७००० हून अधिक बालसंस्कार केंद्रे, ४० पेक्षा जास्त गुरुकुल आहेत. एवढा पसारा सांभाळणे सोपे नाही. बापूने व्याप तर वाढवला. पण आता तो त्याच्या मुलीला सांभाळावा लागतो आहे. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे म्हणतात, तशातला प्रकार आहे.
443 Total Likes and Views