बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झळकले. महाराष्ट्राला आनंद वाटेल, असा हा कार्यक्रम होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम केला. याची नोंद झाली. त्यासाठी सध्याच्या सरकारने आग्रह धरला… त्याबद्दल ‘खरं प्रेम की उमाळा’याबद्दलची टीका- टिपण्णी काही दिवस झाली. अशी टीका चार दिवसांसाठी असते नंतर लोक सगळे विसरून जातात आणि शिल्लक राहते ते काम. राजकीय कुरघोडी करण्याकरिता हे तैलचित्र लावण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी हुशारीने घेतली हे मान्य केल्यावरसुद्धा बाळासाहेबांचे तैलचित्र लागले त्यातच महाराष्ट्राला समाधान आहे. ते कोणी लावले… कोणत्या हेतूने लावले… हे प्रश्न दुय्यम आहेत… आणि तात्पुरते आहेत. या कार्यक्रमात एक-दोन अपवाद सोडले तर भाषणेही चांगली झाली. सगळ्यात उत्तम भाषण एकनाथ शिंदे यांचेच झाले. सामान्यपणे त्यांना प्रभावी बोलता येत नाही, असे अनेकवेळा दिसले. मुद्यांच्या टिपणाचा कागद हातात घ्यावा लागतो. पण या समारंभातील त्यांचे भाषण नितळ वाटले. बाळासाहेबांचे व्यक्तीमत्त्व त्यांनी बऱ्याच चांगल्या प्रमाणात उभे केले. शिवाय या कार्यक्रमाचे वर्णन ‘एक आनंदाचा दिवस’ असे नेमक्या शब्दात केले. बाळासाहेबांनी जात-पात मानली नाही. हे बाळासाहेबांच्या यशाचे खरे सूत्र. ते त्यांनी नेमके सांगितले. ‘दिलेला शब्द न मोडणारे’ बाळासाहेबही त्यांनी नेमक्या शब्दांत मांडले. अथक परिश्रमातून मराठी माणसांची ही संघटना बाळासाहेबांनी उभी केली. त्या काळात त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा शिवसेनेला भक्कम पाठींबा होता. तरी बाळासाहेबांनी मराठी माणसाला जागे केले, हे नाकारता येणार नाही. आज शिवसेना तुटली-फुटली याचा मराठी माणसांना आनंद अजिबात नाही… ‘जे शिवसेनेचे नाहीत त्यांनाही मुंबईत शिवसेना हवी’, असे आजही ठामपणे वाटते. ती कोणाची शिवसेना हवी याचा निर्णय शेवटी मुंबईतील मराठी माणूसच करेल.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात स. का. पाटील जाहीरपणे सांगत होते की, ‘ही मुंबई कॉस्मोपॉलिटियन आहे’ या त्यांच्या शेऱ्यावर अत्रेसाहेब जबरदस्त तुटून पडत होते. त्यांचे शब्द आज लिहिणेही अवघड आहे, इतके तिखट होते. पण. स. का. पाटील बोलले होते तेच आज खरे होत आहे. मराठी माणूस मुंबईत नुसताच मागे पडला नाही तर, मुंबई महानगरपालिकेत मराठी नगरसेवक अल्पसंख्य आहे… आणि अन्य भाषिकांचे बहुमत झाले आहे. व्यापार-उदीम आणि उद्योग या सगळ्या विषयांत मराठी माणूस मागे पडला आहे. त्यामुळेच बाळासाहेब आज हवे होते… असे सातत्याने वाटते. अत्रेसाहेब हवे होते… लढणारी माणसंच राहिली नाहीत. तोड-फोड करणारी, आरोप- प्रत्यारोप करणारी माणसं आहेत… त्यात काही व्यक्तींचे भले होईल… महाराष्ट्राचे अजिबात भले होणार नाही. जी तोड-फोड झाली ती केंद्र सरकारच्या पाठिंब्याने झाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही त्यांच्या भाषणात फडणवीसांच्या पुढे जावून मोदींची स्तूती करावी लागली. काही दिवसांतच एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपमध्ये विलिनसुद्धा होऊन जाईल. हे काल्पनिक शब्द नाहीत. हा पुढचा रस्ता आहे. बाकी त्यांचे मार्ग बंद झालेले आहेत.
पंतप्रधानांच्या मुंबई भेटीमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली की, त्यांनी एकनाथ शिंदे यांना निश्चित मनानेही जवळ केलेले आहे. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना त्यांची देहबोली सर्वकाही सांगून जात होती. देवेंद्र फडणवीस यांना हे सरकार बनवताना बाजूला करून दुय्यम भूमिका घ्यायला लावली. हे तात्पुरती व्यवस्था नाही. असे संकेत आता मिळत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाच्या भूमिकेतून कधी विलीन होवून जातील, हे कळणारही नाही. पूर्वी फडणवीस मोदीसाहेबांची स्तूती करायचे… आता ते काम एकनाथ शिंदे करत आहेत. राजकारणात अशी सरमिसळ सगळ्यांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे याहीपेक्षा अधिक काही घडले तर फार धक्का बसणार नाही… हे झाले थोडे विषयांतर…
विषय बाळासाहेबांच्या संबंधाचा आहे. बाळासाहेबांनी राजकारणात ज्या ज्या माणसांना उभे केले… ताकद दिली… पदे दिली… ती-ती सामान्य माणसं होती. त्यांच्या घरात राजकीय परंपरा नव्हती. सामान्यांतून असामान्य माणसं त्यांनी विश्वास देवून घडवली. सर्व जाती-धर्मांतील कार्यकर्त्यांना हा विश्वास त्यांनी दिला. त्यामुळे मातंग समाजाचा भोला बढेल नागपूरातून आमदार होऊ शकला. आगरी समाजाचे लिलाधर डाके, गणेश नाईक, याशिवाय बुरूड समाजाचे चंद्रकांत खैरे (हे पुढे औरंगाबादचे खासदारही झाले…) प्रमोद नवलकर, शशिकांत सुतार, साबीर शेख, सुरेश जैन असे विविध समाजाचे प्रतिनिधी मंत्री झाले. बाळासाहेबांनी जात कधीच मानली नाही. त्यांचा खास सेवक थापा हा नेपाळी होता. बाळासाहेबांनी ढोंग कधी केले नाही. त्यांचे हिंदुत्वाचे विचार कोणाला पटो न पटो… सत्ता मिळवण्यासाठी त्यांचे हिंदुत्त्व नव्हते. भाजपाला युती सरकारात घेवून बाळासाहेब त्यांच्या कुंचल्यातून भाजपच्या त्यावेळच्या नेत्यांचे बुरखे टरटरा फाडत होते. भाजपाला ‘कमळाबाई’ हे विशेषण जाहीरपणे बाळासाहेबांनीच दिले. युती असताना भाजपाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार भैरोवसिंह शेखावत यांना शिवसेनेच्या आमदारांनी मते द्यायची नाहीत… तर काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या भगिनी आहेत म्हणून त्यांना मते द्यायची, असे बाळासाहेबांनी ठामपणे सांगितले. त्यांचा दरारा आणि धाक… प्रेम आणि आदर सगळेच काही विलक्षण होते. मनोहर जोशी सेना-भाजपा युतीचे चार वर्षे मुख्यमंत्री होते… एक छोटे पत्र पाठवून बाळासाहेबांनी त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. निरोप मिळताच राजीनामा दिला गेला. नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव बाळासाहेबांनी जाहीर करून टाकले. ते नाव होते नारायण राणे यांचे…. कोणतीही खळखळ न करता किंवा आजच्या भाषेत तोड-फोड फाटा-फूट न होता… शिवसेनेच्या-भाजपाच्या आमदारांनी मुकाटपणे नाव स्वीकारले. हा दरारा बाळासाहेबांचा होता. आजची शिवसेना का फुटली… याचे चिंतन झाले नाही, त्यामुळे चुकले काय, हेच समजले नाही. त्या आगोदरच फाटाफूट झाली. आता तो विषय संपला. मुद्दा बाळासाहेबांचा आहे… पंतप्रधान कोणीही असो… बाळासाहेबांना त्या-त्या पंतप्रधानांनी सन्मानाने वागवले. बाळासाहेब यांना सत्तेची हाव नव्हती. १९९५ ला ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले असते… पण तसे त्यांनी केले असते तर विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांचे तैलचित्र लागले नसते. पदाने माणसे मोठी होत नाहीत… स्वच्छ धोरण… नितळ भूमिका आणि नि:स्वार्थ काम… यातून नेतृत्त्व घडते. बाळासाहेबांचे नेतृत्त्व तसेच होते. सामान्य माणसांच्या मनात बाळासाहेब होते… आजही आहेत… त्यामुळे त्यांचे तैलचित्र कोणत्याही कारणाने लागो… महाराष्ट्राला त्याचा आनंद आहे…. राजकारण पुढे कसेही वाहात गेले तरी बाळासाहेबांचे तैलचित्र आता कायम जागेवरच आहे.
या सभागृहात महाराष्ट्राला आणि देशाला अिभमान वाटेल, अशी जी मुख्य छायाचित्रे आहेत त्यामध्ये पहिले छायाचित्र छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे महात्मा जोतिबा फुले, तिसरे लोकमान्य टिळक, चौथे महात्मा गांधी, पाचवे पंडित नेहरू आणि सहावे बाबासाहेब आंबेडकर… ही सहा तैलचित्रे मुख्य व्यासपीठाच्या मागे झळकलेली आहेत. व्यासपीठावर बसल्यावर सभागृहात गोलाकार नजर फिरते तेव्हा ११ तैलचित्रे लावलेली दिसतात. या तैलचित्रांत सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, राजमाता जिजाबाई, दादासाहेब मावळंकर, एस. एम. जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, झाशीची राणी, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस… अशा या ११ छायाचित्रांत आता मराठी मनाच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून बाळासाहेब ठाकरे या सभागृहात विराजमान झालेले आहेत.
सभागृहातील तैलचित्रांपैकी दोन नेत्यांचे पूर्णाकृती पुतळे विधान भवनाच्या आवारात दिमाखात उभे आहेत… त्यात प्रवेश द्वारावरच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा शरद पवारसाहेब मुख्यमंत्री असताना उभा राहिला. महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा त्यामुळे विधानभवनात प्रवेश करताना रोज प्रत्येकाच्या समोर येतो. आणि दुसरा पुतळा आहे… हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा. तो सभागृहाच्या आवाराच्या बाहेर आहे… त्याच्याच बाजूला स्वातंत्र्याच्या लढ्यात छातीवर गोळी झेललेल्या आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री असलेल्या वसंतदादा पाटील यांचाही पुतळा जिवंत असल्यासारखा उभा आहे….
आणखी प्रशासकीय निर्णय कसा आहे पहा… विधानमंडळातील या पुतळ्यांच्या जयंतीदिनी अिधकृतपणे अभिवादन कार्यक्रम होतो… पण, ‘पुण्यतिथीला असा कार्यक्रम करण्याची गरज नाही,’ असा निर्णय विधानमंडळाने घेतलेला आहे.
खंत एवढीच आहे की, विधानमंडळातील यशवंतरावांची जयंती… दादांची जयंती… स्वामीजींची जयंती यांच्या जन्मदिनी या पुतळ्याला अभिवादन करायला हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक असतात…. महाराष्ट्रात एवढी मोठी माणसं होती… याचे महाराष्ट्राला जणू काही पडलेलेच नाही.
– मधुकर भावे 9892033458
45 Total Likes and Views