२६ जानेवारीला पद्म पुरस्कार जाहीर झाले. पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अिभनंदन… या सर्व पुरस्कारात मराठी मनाला आनंद होईल असा सुमनताईंना दिला गेलेला ‘पद्मभूषण’ पुरस्कार महाराष्ट्राला सुखावून गेला.
महाराष्ट्रात दिग्गज कामगिरी करणाऱ्यांमध्ये तीन काहीशी उपेक्षित महान व्यक्तीमत्त्वे होती आणि आहेत. त्यात सुमनताई आहेत. पद्मविभूषण पुरस्कारानमुळे त्या बऱ्याचशा सन्मानित झाल्या. त्याचा महाराष्ट्राला आनंद आहे. संगीत क्षेत्राला आनंद आहे. २००१ साली लतादीदी भारतरत्न झाल्या. २०१४ ला सचिन तेंडूलकर भारतरत्न झाला. त्या आगोदर महर्षी कर्वे, पा. वा. काणे, आचार्य विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे. आर. डी. टाटा, भीमसेन जोशी, नानाजी देशमुख हे भारतरत्न झाले होते. त्यामध्ये लतादीदी आणि सचिन यांच्यामुळे मराठी मान अधिक उंच झाली. लतादीदींच्या इतक्याच ताकतीच्या सुमनताई या सन्मानापासून दूर होत्या. कोणी म्हणतात सुमनताई लतादीदींची झेरॅाक्स कॉपी आहेत. झेरॉक्स म्हणणे चुकीचे आहे. कोणत्याही अर्जाला झेरॅाक्स जोडली तरी मूळ अस्सल कॅापी दाखवावीच लागते. सुमनताई लतादीदींच्या कॉपी नाहीत. तेवढ्याच अस्सल गळ्याच्या आहेत. त्या सन्मानित झाल्या त्याचा सगळ्यांना आनंद आहे.
त्या मूळच्या कर्नाटकातील कल्याणपूर गावातील. त्या गावावरूनच आडनाव आले… महाराष्ट्रात कर्नाटकाच्या बॅार्डवर जसे चाकुरकर, निलंगेकर तसेच हे आडनाव… सुमनताईंची कर्मभूमी महाराष्ट्रच आहे. त्यामुळे त्यांचे सासर कर्नाटकात असेल… एकप्रकारे त्या महाराष्ट्राच्या माहेरवाशीण आहेत. प्रसिद्धीपासून त्या दूर राहिल्या. वाहिन्यांवर त्यांच्या मुलाखती कधी दिसल्या नाहीत. त्यांच्याजवळ गोड गळ्याचा अभाव नव्हता. पण संकोची स्वभाव होता त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या प्रकाशापासून थोड्या दूर राहिल्या. तसे भारताला जागतिक कीर्ती मिळवून देणारे नंदू नाटेकर आणि रणजी स्पर्धेत क्रिकेटमध्ये अवघ्या १२४ सामन्यात ५८९ विकेट घेणारा पद्माकर शिवलकर हाही उपेक्षित… काहीजणांच्या बरोबर नशिब डाव्या-उजव्या हाताला चालत असते. काहीजणांबरोबर ते चालत नाही… ते बाजूच्या फुटपाथवर असते.
आज विषय सुमनताईंचा आहे. त्या आज ८५ वर्षांच्या आहेत. समृद्ध आयुष्य त्या जगल्या. ८५७ हिंदी गाण्यांनी त्यांचे सप्तसूर जागतिक कीर्तीचे झाले. असंख्य मराठी गाणी त्यांनी अमर केली. नितळ, मुलायम आवाज जसा पुरुषांमध्ये तलत महंमदचा… तसा मराठी संगितात सुमनताईंचा. त्यांची असंख्य मराठी गाणी आज कानात गुणगुणतात. ‘उठा-उठा चिऊताई’, ‘केशवा-माधवा तुझ्या नामात रे गोडवा…’, (खरं म्हणजे हा गोडवा सुमनताईंच्या आवाजाचाच आहे..) ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती…’, ‘नकळत सारे घडले, ’ अशी असंख्य मराठी गाणी आहेत. पण, सगळ्यात मनाला भिडणारे गाणे म्हणजे… ‘जेथे सागरा धरणी मिळते…’ ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटातील हे गीत. नायक विवेक अभ्यंकर, नायिका जीवनकला, प्रसंग आहे… दोघांच्या भेटीचा… दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी कवी पी. सावळाराम यांना सुचविले की, ‘इथे एक गीत हवे.’ महान कवी पी. सावळाराम यांनी ठाकूर यांच्या तोंडातून शब्द निघताच…. टेबलावरील कागद ओढला आिण हे गीत कागदावर दहा मिनीटांत उतरवले… वसंत प्रभूंनी लगेचच संगीत दिले आणि सुमनताईंनी लगेच गायलेही… मराठीतील एक अमर गीत आहे… पी. सावळाराम फार मोठे कवी. त्यांना अशोक हांडे यांनी पी. सावळाराम यांच्या गीतांवर ‘गंगा-जमुना’ स्वतंत्र कार्यक्रम करून त्यांना अमर केले आहे. आपल्या एका गीतावर (जा मुली जा… दिल्या घरी तु सुखी रहा…. ) ठाण्याचे नगराध्य म्हणून निवडून आलेले पी. सावळारामच. ठाण्यातील आजचे ज्ञाानसाधना महाविद्यालयाची जागा बाळासाहेब देसाई महसूल मंत्री असताना पी. सावळाराम यांच्या एका शब्दावर ती जागा बाळासाहेबांनी संस्थेला दिली. असा हा महान कवी. त्याचा कार्यक्रम अशोक हांडे बहारदरणे सादर करतात. पण रसिक एवढी दाद देत नाहीत. माणिक वर्मा यांच्या गीतांवरील ‘माणिक-मोती’हा अशोक हांडे यांचा कार्यक्रमही मनाला भिडणारा. अशोक हांडे यांनी विनंती आहे की, त्यांनी ‘सुमन-सागर’ असा एक कार्यक्रम मराठी रसिकांना द्यावा. हे झाले थोडे विषयांतर…
असं बोलले जाते की, सुमनताईंना काहीसं बाजूला टाकले गेले होते. कारण लतादीदींचा प्रभाव होता. पण रफी आणि लतादीदींचा ‘रॅायल्टी’वरून काहीसा वाद झाला आणि महमंद रफी यांनी लतादीदींना वगळून त्यांची जागा सुमनताईंनी दिली. मग १९५४ पासून रफी यांच्याबरोबर १४० गीते त्यांनी एकत्रित गायली. शिवाय शंकर जयकिसन…. रोशन, एस.डी. बर्मन, हेमंतकुमार, नौशाद, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मिकांत प्यारेलाल अशा अनेक संगीत दिग्दर्शकांच्या सोबत सुमनताई गायल्या. सगळेच मोठे संगीत दिग्दर्शक. त्या गाण्यांचे कवी सगळेच महान. ‘पाकिझा’सारख्या चित्रपटातही सुमनताईंनी ‘गिर गई मेरी माथे की बिंदियाँ’ हे गाणे गायलेय… पण चित्रपटात ते वगळले गेले. गुलाम महम्मद यांचे छान संगीत… चित्रपटही छान… पण, पाकिझा झळकला आणि कोसळला. मात्र मिनाकुमारीच्या निधनानंतर तो उसळून चालला. प्रेक्षकांची मानसिकता समजून घेणे फार अवघड आहे!
सुमनताईंची, रफी, मुकेश, मन्ना डे, यांच्यासोबतही त्यांची खूप गाणी गाजली. ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे…’ ‘ना.. ना… करते प्यार…’ ‘रहे ना रहे हम…’ ‘तुमने पुकारा और हम चले आये…’ अशी अनेक गाणी त्यांनी गायली आहेत. त्या गुणवत्तेत कुठेही कमी नव्हत्या. ते त्यांनी सिद्धही केले. लतादीदी आणि रफी यांचा वाद मिटल्यानंतर सुमनताईंनी पुढचे येणारे दिवस समजून घेतले आणि झटकन सांधा बदलला. मरठी गितांकडे त्या वळल्या. एका अर्थी ते बरेच झाले. नाहीतर इतकी चांगली मराठी गीते कोणी गायली असती? जी गीते आजही कान तृप्त करतात. संगितात फार मोठी जादू आहे. कवी केशवसूत सांगूनच गेले आहेत….
‘गाण्याने श्रम वाटतात हलके….
हे ही नसे थोडके….’
ज्यांना गळा आहे असे…. आणि ज्यांना फक्त घसा आहे असे…. अशा सर्वांनाच गाणं प्रियच असते. हिंदी असो िकंवा मराठी असो… एका हिंदी चित्रपटात एका गाण्यात सांिगतलेच आहे… ‘गाना आये…. न आये…. गाना चाहिए..’
अनेक महान कवींनी फार मोठी शब्दसंपदा केली आहे. साहिर असेल, मजरू असतील… शकील असेल… राजेंद्रकृष्ण असतील… इंदिवर असेल, असे अनेक हिंदी कवी मराठीतीलही अनेक कवी आण्णा माडगुळकर आहेत… जगदिश खेबुडकर आहेत… योगेश अभ्यंकर… पी. सावळाराम… सुधीर मोघे… शांताराम नांदगावकर… गंगाधर महांबरे… शांता शेळके…. अशी अनेक नावं आहेत. संगीतकारांमध्ये वसंत प्रभू, वसंत पवार, सुधीर फडके, वसंत देसाई, सी. रामचंद, राम कदम, आनंद घन (लतादीदी), हृदयनाथ मंगेशकर… असे अनेक संगितकार… गाण्याचा अविष्कार सामुदायिक असतो. केवळ गळ्याने गाणं गाजत नाही. गोड वाटते… पण उत्तम गीत हवं, उत्तम संगीत हवे… आणि उत्तम गळा हवा… असा ‘दत्तात्रया’चा संगम जमला तर गीत अमर होते…
प्रख्यात संगीतकार नौशाद यांचा आणि माझा चांगला दोस्ताना होता. त्यांच्याकडे वांद्रे येथे त्यांच्या २५ डिसेंबरच्या वाढदिवसाला अनेक वेळा जात असे. (अटलिबहारी वाजपेयी आणि नौशाद यांचा वाढदिवस एकाच दिवशी.) त्यांना मी एकदा विचारले… ‘गीतकार श्रेष्ठ, संगीतकार श्रेष्ठ की, गायक श्रेष्ठ?’ त्यांनी छान उत्तर दिले…. ‘किसीको अलग नही कर सकते… तिन्होही श्रेष्ठ है… तिनों के वजहसेही गाना बनता हैं…’
सुमनताईंना काहीसे बाजूला टाकल्याची अनेकवेळा चर्चा झाली. त्यांनी या विषयात कधीही… कसलीही तक्रार केली नाही. किंवा मुलाखती देत त्या बसल्या नाहीत. त्यांचे काम त्या करत राहिल्या आणि कामातूनच त्यांनी त्यांचे श्रेष्ठत्त्व सिद्ध केले. तसे म्हटले तर अनेक गुणी लोकांना संधीच मिळत नाही. पद्माकर शिवलकर यांचा मगाशीच उल्लेख केला… चंद्रा, बेदी, प्रसन्ना, व्यंकट राघवन या चार फिरकी गोलंदाजांमुळे पद्माकरला सतत वगळले. राजेंद्र गोयलला वगळले… रणजीमध्ये त्यांनी जागतिक विक्रम केले. एकेकाचे नशिब…. पद्माकरला लंकेच्या दौऱ्यात १५ जणांच्या यादीत घेतले. पण, ११ जणांच्या टीममध्ये स्थान दिले नाही. नशिबाने एका सामन्यात त्याला खेळवले… कारण बेदी जखमी झाला होता. त्यांने त्या सामन्यात (१९७३) चार गडी बाद केले. ५० वर्षे होईपर्यंत प्रथम श्रेणी सामन्यात खेळणारा एकटा पद्माकर… आज तो ८३ वर्षांचा आहे. १२४ सामने… ५७९ विकेट… पाच विकेट ४२ वेळा… १० विकेट १३ वेळा… कोणाचे आहे का असे रेकॅार्ड? पण… संधी नाही. नंदू नाटेकर हा तसाच कमनशिबी. ५० वर्षांपूर्वी वाहिन्या नव्हत्या. पण भारताला बॅडमिंटनमधील पहिले सुवर्णपदक मलेशियातील सामन्यात मिळवून नंदूने १९६३ साली अजिंक्यपद मिळवले. अनेक होतकरू खेळाडूंना त्यांनी तयार केले. पण शेवटचे दिवस अतिशय वाईट होते. त्यांची स्पोर्टस अकॅडमी आज अनेक खेळाडूंना तयार करत आहे. सुदैवाने अर्जुन अॅवार्ड सुरू झाले तेव्हा देशातील पहिले अर्जुन अॅवार्ड नंदू नाटेकर यांना मिळाले. हा त्यांचा देशपातळीवर झालेला पहिला आणि शेवटचा सन्मान. ते जाईपर्यंत एवढा मोठा खेळाडू… मराठी आहे, याची आठवणही कोणाला नव्हती. काळ अनेकांना बेदखल करतो. क्रिकेट असो… संगीत असो… अफाट स्पर्धेमध्ये आज गुणवत्ता दाखवावी लागते. गुणवत्ता असूनही संधी मिळत नाही.
ग्रामीण भागात अनेक उत्तम गायिका आहेत… मी एकदा बुलढाण्याला गेलो होतो. एका कार्यक्रमात एका स्थानिक मुलीने ‘अेय मेरे वतन के लाेगो…’ हे गीत म्हटले…. सगळ्यांना िखळवून ठेवले.. त्या मुलीचे नाव विसरलो.. त्यावेळी लिहूनही घेतले होते. ग्रामीण भागात तर असे असंख्य गुणवत्ता असलेले गायक- गायिका आहेत… खेळाडू आहेत… विज्ञाान- तंत्रज्ञानातील जाणकार आहेत… स्त्रियाही आता पुरुषांना मागे टाकून पुढे गेलेल्या आहेत. पण, प्रश्न संधीचा असतो. ‘प्रस्थापित’ व्हायला संधी मिळायला हवी. सगळ्याच घरांना ‘परंपरा’ नसते. नशिब माना किंवा न माना… त्याची साथ लागतेच… प्रख्यात संगीत दिग्दर्शक नौशादजींचेच बघा ना… लखनौच्या एका हार्मोनियमच्या दुकानाची साफ-सफाई करण्याचे काम ते करत होते. वय वर्षे होते १२. दुकान उघडण्यापूर्वी हार्मोनियम वाजवत बसायचे… दुकानाचा मालक खूश झाला… त्याने हार्मोनियम पेटी भेट दिली… वडील संतापले…. त्यांना गाणे बजावणे आवडत नव्हते. त्यांनी लखनौच्या राहत्या घरातून पहिल्या मजल्यावरून पेटी रस्त्यावर फेकून दिली. ते तुकडे उचलून एका कपड्यात गुंडाळून नौशाद घरातून पळून थेट मुंबईला आले. स्टुडिओच्या दाराशी उभे राहून थकले… दारवानाने धक्के मारून हकलूनही दिले.. पण, एका क्षणाला नशीब बदलले… ‘दाराशी रोज उभा राहणारा मुलगा पाहून’ स्टुडिओच्या मालकाने त्याला आत घेतले. त्यांनी पेटी वाजवून दाखवली आणि मग नशिब बदलले… त्या बाजा वाजवण्यातून महान संगीतकार नौशाद देशाला मिळाले.
लतादीदींना ‘भारतरत्न’ मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिलेला आहे. सुमनताईंचाही महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च सन्मान देवून गौरव करायला काहीच हरकत नाही. सध्याच्या सरकारला ‘इव्हेंट’ करण्याची हौस आहेच… त्यात शोभून दिसेल असा एक कार्यक्रम या निमित्ताने झाला तर सध्याच्या सरकारातील जमेकडे कमी असलेल्या बाजूला, एका चांगल्या सत्काराची भर पडेल. उशीर झाला असला तरी भारत सरकारने सुमनताईंचा गौरव केल्यावर सध्याच्या महाराष्ट्रातील सरकारला असा सत्कार करणे काहीच अवघड नाही.. विचार करा आणि छान कार्यकम करा. तुमच्या रोजच्या घाणेरड्या राजकारणापेक्षा असा एखादा सत्कार महाराष्ट्राला सुखावून जाईल. मात्र तुमच्या या सत्काराचे स्वरूप मराठी विश्व संमेलनासारखे असू नये.
सुमनताईंचे अिभनंदन…. सध्या एवढेच…
– मधुकर भावे
121 Total Likes and Views