पाकिस्तानचा एकेकाळचा लष्करशहा परवेज मुशर्रफ यांचे दुबईमधील रुग्णालयात तब्बल सहा वर्षाच्या आजारानंतर निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. एका महत्वाकांक्षी पण क्रूर लष्करशहाचा अंत झाला. २००० साली संपादक परिषदेनिमित्ताने पाकिस्तानात जाण्याचा योग आला होता. त्या वेळी परवेज मुशर्रफ यांच्याशी बोलण्याचा योग आला. भारताची छेड काढणे पाकिस्तानी लोकांना आवडते. नव्हे तो त्यांचा प्राणवायू आहे. परवेज तर २४ तास त्या मूडमध्ये असायचे. मी त्यांना थेट विचारले, ‘आप को डर नही लगता? ते म्हणाले, ‘डर किस बात का? हमे तो फासी पेही जाना लिखा है. मुझे मालूम है, मुझे फासी पे लटकना है.’ तसेच झालेही. त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. पण ते पाकिस्तानातून पळून गेले म्हणून आयुष्य लांबले. पण एक दुर्मिळ आजाराने त्यांना गिळले.
भारतावर कारगिल युद्ध लादणाऱ्या परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ रोजी दिल्लीच्या दरियागंज याठिकाणी झाला होता. १९४७ रोजी भारताच्या फाळणीदरम्यान मुशर्रफ यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. ते कराची येथे स्थायिक झाले. त्यावेळी मुशर्रफ चार वर्षांचे होते. १९६१ साली मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले. १९९९ साली मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लोकशाही मार्गाने आलेले सरकारला उलथवून लावत सत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली. २० जून २००१ ते १८ ऑगस्ट २००८ पर्यंत ते पाकिस्तानचे राष्ट्रपती होते.
१९९९ मध्ये कारगिल येथे युद्ध झाले. या युद्धाच्या वेळी परवेज मुशर्रफ चर्चेत आले. त्यावेळी ते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते. सुरुवातीला कारगिल युद्धाची माहिती मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यापासूनही लपवून ठेवली होती. जिहादींच्या वेशात पाकिस्तानी सैन्यांने सीमा ओलांडल्यानंतरही मुशर्रफ यांनी हे रहस्य कुणालाच सांगितले नाही. जेव्हा पाकिस्तानी सैन्य कारगिलच्या टोकावर पोहोचले, तेव्हा कुठे मुशर्रफ यांनी याची माहिती पंतप्रधानांना दिली. तरिही महत्त्वाचे तथ्य लपवून ठेवण्यात आले होते. जिहादींच्या वेषात सैन्याला पाठविल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी एलओसीच्या नजदीक रेडिओवर खोटे संदेश पाठविण्यात येत होते. हे संदेश बाल्टी आणि पश्तो भाषेमध्ये असायचे. त्यावेळी एलओसीवरील सर्वच दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य याच दोन भाषांमध्ये संवाद साधायचे. या संदेशावरुन कारगिलमध्ये जिहादी आणि दहशतवादी सक्रीय असल्याचा गैरसमज निर्माण करायचा, असा मुशर्रफ यांचा हेतू होता. जेणेकरुन भारत आणि जगाला ही पाकिस्तानी सैनिकांची कारवाई नाही, असा संदेश जाईल. पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांच्या विरोधात असल्याचाही संदेशही रेडिओवर दिला जायचा, जेणेकरुन गैरसमज आणखी वाढेल. तसेच पाकिस्तानी माध्यमांनाही चुकीची माहिती देऊन मुशर्रफ यांनी पाकिस्तानी जनतेची दिशाभूल केली होती. त्यांचा हा डाव अनेक वर्षानंतर नवाज शरीफ यांनी लिहिलेल्या पुस्तकात उघड करण्यात आला. परवेज मुशर्रफ यांना सैन्याची जबाबदारी देऊन चूक केली, असेही नवाब शरीफ म्हणाले होते.
मुशर्रफ शरीफ यांनी तब्बल १० वर्षे पाकिस्तानवर हुकूमत गाजवली. मात्र २००९ साली त्यांच्यावर आणीबाणी लावल्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. त्याच वर्षी मुशर्रफ इंग्लडमध्ये पळाले. २०१३ साली सार्वत्रिक निवडणुकीकरिता ते पाकिस्तानात परतले असता त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रद्रोहाचा खटला सुरु झाला. २०१६ साली न्यायालयाची परवानगी घेऊन उपचारासाठी मुशर्रफ दुबई येथे रवाना झाले. तेव्हापासून ते दुबईतच होते. मात्र विशेष न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. २०१९ साली सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावली. पण ती ऐकण्याच्या परिस्थितीत त्यांचे शरीर नव्हते. त्यांना अमाइलॉइडोसिस हा आजार झाला होता. सारे अंग निकामी झाले होते. शरीराची हालचाल ठप्प पडली होती. ह्या आजारात शरीरात अमायलॉइड नावाचे असामान्य प्रथिन तयार होऊ लागते. हृदय, मूत्रपिंड, यकृत, मज्जासंस्था, मेंदू इत्यादी अवयवांमध्ये ते जमा होऊ लागते, ज्यामुळे या अवयवांचे कार्य सुरळीत होत नाही आणि शरीराची हालचाल थांबते. तरीही परवेज यांनी बरीच ह्या आजाराशी झुंज दिली. एक परवेज गेला. परवेज ही मानसिक प्रवृत्ती आहे. तो गेला तरी ही प्रवृत्ती पाकिस्तानातून गेलेली नाही असेच चित्र आजही दिसते.
305 Total Likes and Views