पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा ; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा शिंदे गटाला सूचक इशारा

Analysis
Spread the love

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. महालगाव येथे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरू झाली. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्याने किरकोळ दगडफेक झाली असून काहीवेळ गोंधळ निर्माण झाला. काही जणांनी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेकही केली. दरम्यान, ठाकरे गटातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरू असताना अज्ञात व्यक्तीने स्टेजवर दगडही भिरकावला. या सर्व घटनेवरून राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला. चंद्रकांत खैरे यांनी या घटनेसाठी शिंदे गटाला जबाबदार ठरवले “पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा.” असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती अशी युती होऊ नये म्हणून शिंदे गटाकडून हा कट रचण्यात आला, असा आरोपदेखील चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे.

मी पोलिसांना शांतता ठेवण्याबाबत सांगितले असूनसुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले. पुढे काही झाले असते तर आम्ही शांत बसलो असतो का? आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनीच गोंधळ घडवून आणला आहे. बोरनारे यांनी लांब बसून हे सर्व कारनामे केले आहेत. ते समोर असते तर उत्तर दिले असते. सर्वकाही सुरळीत असताना मुद्दाम काही लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी जाणीवपूर्वक काही लोकांना दारू पाजून आमच्या कार्यक्रमात घुसवले. त्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे गडबड झाली होती. यात पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे मी स्वतः पोलीस महासंचालक यांच्याकडे जाऊन भेट घेणार आहे. आदित्य ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा असताना अशा घटना घडत आहे. त्यांच्या सुरक्षेतील पाच पोलीस तर गाडी खाली उतरलेच नाही, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

 144 Total Likes and Views

0 Comments

No Comment.