तुमच्या मुलांना कोचिंगची खरंच गरज आहे काय ?

Analysis
Spread the love

गेल्या काही दशकांपासून जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्यामुळे प्रत्येकाचे जीवन व्यस्त आणि तणावयुक्त बनले आहे. नोकरी,रोजगाराचा अभाव आणि कुटुंबात वाढलेले सदस्य बघता संसाराचा गाडा ओढताना होणारी दमछाक लहान मोठ्या अशा सगळ्याच कुटुंब प्रमुखांना सतत कुठल्यातरी तणावात ठेवत असते. अशाकाळात शिक्षण क्षेत्राचे झालेले व्यापारीकरण त्याच्या जीवावर उठले आहे. पालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळा यावरचा विश्वास कधीच उडून गेल्यावर खासगी किंवा मिशनरी शाळा हाच एकमेव पर्याय त्याच्यापुढे उरल्याने मुलांचे शिक्षण सुद्धा कुणाचे कंबरडे मोडू शकते याचा अनुभव असा प्रत्येक कुटुंबप्रमुख सध्याच्या काळात घेत आहे. पालकांच्या नंतर किंवा त्यांच्याही पेक्षा अधिक शिक्षकांवर मुलांचा विश्वास वाढत असल्याने शाळेतील अभ्यासाच्या तुलनेत कोचिंगच्या अभ्यासाकडे मुलांना वळविण्यात शिक्षक यशस्वी झाले आहेत.
इयत्ता सात ते दहा या काळात मुलांचा कल शिक्षणापेक्षा खेळ,मस्ती किंवा इतर बाबींवर अधिक असतो त्यामुळे अभ्यासात एकाग्रता करावी लागते आणि पालकांना अपेक्षित असे ९० टक्के गुण मिळवावे लागतात याची कल्पना मुलांना नसते अशावेळी त्यांचे काही विषय कच्चे,कमजोर असण्याची अधिक शक्यता असते. हे विषय वर्गात त्या त्या विषयाच्या शिक्षकांनी मजबूत करवून घ्यायचे असतात ,त्यासाठी कमजोर विद्यार्थ्यांवर विशेष मेहनत घेत त्यांनाही सगळ्यांच्या बरोबर आणण्याचे कौशल्य विषय शिक्षकाला साधायचे असते. अलीकडे तसे होताना दिसत नाही कारण गणित,इंग्रजी किंवा विज्ञानाचे शिक्षक काही तास शाळेत आणि भरपूर तास स्वतःचे कोचिंग क्लास उघडून बसलेले आहेत. वर्गातील कच्चे दुवे त्यांचे हमखास ग्राहक झालेले असतात. त्यांच्या पालकांना बोलावून त्याला कशी कोचिंगची गरज आहे हे पटवून देण्यात शिक्षक तरबेज झाले आहेत.
बाप नोकरदार किंवा व्यावसायिक आणि जेमतेम शिकलेली गृहिणी आई गुरुजींच्या या समुपदेशनाने प्रभावित होऊन काटकसर करून मुलांना कोचिंग लावण्याची मानसिकता तयार करतात. तोवर इतर शाळकरी मित्रही कुठल्यातरी कोचिंग क्लासचे गोडवे मित्रांपुढे गात असतात ,या सगळ्यांचा प्रभाव पडून अखेर लाखांचे कोर्स पोटाला चिमटा घेत करण्याची तयारी करीत मुलांना कोचिंगची वाट धारावी लागते. कोचिंग क्लास संचालक मोठे हुशार असतात ,मुलांसोबत त्याच्या पालकांची परीक्षा घेण्यात त्यांनाही मोठा आनंद होतो . पालक आणि पाल्य दोघेही हुशार आहेत याची खात्री पटल्यावरच क्लासला प्रवेश मिळत असेल तर सामान्य वकूब असणारे पालक आणि पाल्य यांनी कुठे जावे ? याचे उत्तर अलीकडे नामवंत शाळा आणि कोचिंग क्लास मालकांच्या जवळ नाही. उत्तम प्रतिभेला थोडीफार कल्हई लावत तिला अधिक उजळून टाकण्याचे काम सध्या शिक्षण क्षेत्रात सुरु आहे.
कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये असणाऱ्या हजार विद्यार्थ्यांपैकी बोटांवर मोजण्याएवढे विद्यार्थी भरारी मारतात कारण ते आधीच त्या योग्यतेचे असतात. त्या उंचीवर जाण्याच्या लालसेने ज्या पालकांनी पोटाला चिमटा घेऊन लाखांनी पैसे भरले त्यांच्या मुलांचे कोचिंग क्लासमध्ये पुढे काय होते,ते कधी कोणत्यातरी होर्डिंग्जवर तरी चमकतात काय याचा विचार केल्यास मोठा अपेक्षाभंग होतो. मुलांच्या हट्टापायी पालक पुढे त्या विषयावर बोलायला तयार होत नाहीत. लाखभर रुपये पाण्यात जातात आणि हातात अपेक्षित यशही मिळत नाही. एका विशिष्ट काळात गुणवंतांचे सर्वत्र कौतुक होते, सामान्य विद्यार्थी त्याच पायरीवर बसून भरारी मारणाऱ्या मित्रांचे कोतुक करतात अन पालक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत असतात. त्यामुळे तुमच्या मुलांना खरंच कोचिंग लावण्याची गरज आहे काय ? हे गंभीरतेने तपासून बघण्याची गरज आहे.
डोळे दिपवून टाकणारे क्लासचे बाह्य स्वरूप आणि चक्रावून टाकणाऱ्या पानभर जाहिराती बघून मुले आकर्षित होतात, क्लासमध्ये मुले कोंबल्यावर सब घोडे बारा टक्के असतात. अल्प वेतनात कुणीतरी गरजू त्यांना शिकवतो आणि वर्षातून ठराविक वेळा क्लासचे सेलिब्रिटी संचालक कानात लेपल माईक अडकवून सुटाबुटात त्यांना मार्गदर्शन करून झलक दाखवून निघून जातात. अपवाद वगळता सगळ्याच क्लासमध्ये असेच चालत असेल तर आपल्या घामाचा पैसा नेमका कशावर उधळला जातोय याची पालकांनी पडताळणी नक्कीच करायला हवी. मोबाईल,फॅशन किंवा राहणीमानाचे जसे फॅड निर्माण झाले आहे आणि आपली मुले रोबो बनत त्याचा पाठलाग करीत आहेत ,कोचिंग क्लास त्याचेच पुढचे पाऊल ठरत असेल तर या मेंढीपळणाचा सगळ्याच पालकांनी विचार करण्याची गरज आहे. ज्याला खरोखर गरज आहे त्यानेच हा मार्ग स्वीकारावा इतरांनी का फरफटत जावे ?

-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद-9892162248

 709 Total Likes and Views

0 Comments

No Comment.