कोश्यारी यांच्यापेक्षा कमी नाहीत नवे राज्यपाल रमेश बैस

Editorial News
Spread the love

       वादग्रस्त विधानांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल  ८० वर्षे वयाचे भगतसिंह कोश्यारी यांचा अखेर राजीनामा स्विकारण्यात आला. त्यांच्या जागी ७६ वर्षे वयाचे रमेश बैस यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या मुंबई भेटीत   पदमुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तेव्हापासून त्यांच्या घरी जाण्याच्या बातमीची  विरोधी नेते वाट पाहत होते.  रविवारी सकाळी  बातमी येताच विरोधकांनी आनद व्यक्त केला.    राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद  पवार यांनी ‘महाराष्ट्राची सुटका झाली’ ह्या शब्दात  स्वागत केले.  पवार म्हणाले, ‘हे  या पूर्वीच व्हायला हवे होते.  महाराष्ट्राने आजवर  अशी व्यक्ती राज्यपाल झालेली कधी पाहिली नव्हती.’  ‘महाराष्ट्रातील घाण  गेली’ अशाच  विरोधी नेत्यांच्या  प्रतिक्रिया आहेत. ठाकरे गटाचे खासदार  संजय राऊत म्हणाले की, “नव्या राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं. राजभवनाचं भाजपा मुख्यालय बनवू नये. विरोधी पक्षाचा घटना आणि लोकशाहीनुसार असलेला आवाज रमेश बैस यांनी ऐकायला हवा. मुख्य म्हणजे महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे, याचं भान राज्यपालांनी ठेवलं पाहिजे.”

            कोश्यारी यांना विरोधी नेते कंटाळले होते. महापुरुषांचा अपमान करणारी वक्तव्ये कोश्यारी यांच्या तोंडून झाल्याने राजकारण तापले होते. मात्र, त्यांच्या जागी येणारे  बैस हेही त्यांचेच भाऊ दिसत आहेत. बैस यांचीही राजकीय कारकिर्द वादाच्या भूमिकेने गाजलेली आहे.  ७६ वर्षे वयाचे बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून  सुरुवात करणारे बैस तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.  बैस हे  अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर त्रिपुरा आणि झारखंड असा प्रवास करीत बैस महाराष्ट्रात येत आहेत.

            राज्यपालाची टर्म पाच वर्षाची असते.  कोश्यारी यांना  तीन वर्षातच घरी पाठवण्यात आले. लवकरच  महापालिकांच्या निवडणुका आहेत.  कोश्यारी यांना ठेवले असते तर विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले असते. कारण  कोश्यारी यांनी  केलेल्या वक्तव्यांवर  राज्यात मोठा असंतोष पाहायला मिळाला होता.  राष्ट्रपतींनी देशातील एकूण १२ राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. त्या जोडीला कोश्यारी यांनाही उचलून   मोदी सरकारने  टायमिंग साधलेले दिसते.  

        कोश्यारी आल्यापासून त्यांचे  नाव  वादात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ते मराठी माणसाची अस्मिता दुखावण्यापर्यंत अनेक वादग्रस्त विधाने कोश्यारी यांच्या नावे  आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले होते की, छत्रपती शिवाजी महाराज हे ‘जुन्या काळाचे आदर्श’ होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी यांसारखे व्यक्तिमत्त्व आधुनिक राज्याचे प्रतीक आहेत. जुलैमध्ये कोश्यारी म्हणाले की, जर गुजराती आणि मारवाड्यांना शहरातून काढून टाकले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही. त्यांच्या वक्तव्यावर अनेक विरोधी पक्षांकडून टीका झाली,  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर ‘राज्यपालांना  कोल्हापुरी चप्पल दाखवण्याची वेळ आली आहे’ असे म्हंटले होते. औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात  कोश्यारी यांनी समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘गुरू’ असल्याचे सांगितले, या वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली होती. या भूमीवर अनेक महाराज आणि चक्रवर्ती (सम्राट) जन्माला आले. पण चाणक्य नसता तर चंद्रगुप्ताबद्दल कोणी विचारलं असतं? समर्थ (रामदास) नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी विचारले असते,” असे कोश्यारी म्हणाले होते. मार्चमध्ये कोश्यारी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. वयाच्या १०  व्या वर्षी सावित्रीबाईंचे लग्न १३ वर्षांचे असलेल्या ज्योतिरावांशी झाले. “आता विचार करा, लग्नानंतर मुलगा आणि मुलगी काय करत असतील? त्यांनी काय विचार केला असेल?”असे  राज्यपाल म्हणाले. हे सारे बोलायची गरज नव्हती. पण  कोश्यारी यांनी ‘आ बैल, मुझे मार’ केले.

          नवे राज्यपाल रमेश बैस हेही कमी नाहीत. बैस यांचा झारखंड सरकारशी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होता.  झारखंड विधानसभेने संमत केलेले ‘झारखंड वित्त विधेयक-2022’ त्यांनी  दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष तिथे दिसून आला. मागील वर्षी राज्यपाल बैस यांना न सांगताच त्यांचा प्रधान सचिव बदलण्यात आला होता. त्यामुळे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि बैस यांच्यात  बाचाबाची झाली होती. झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाचा परिणाम राज्याच्या २२ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यावरही दिसून आला. राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र ते आलेच नाहीत. झारखंडच्या स्थापना दिना दिवशी राज्यपाल गैरहजर राहणे २२ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ. त्यांच्या जागी झामुमोचे सुप्रीमो आणि राज्यसभा खासदार शिबू सोरेन यांना प्रमुख पाहुणे बनवण्यात आले. पण झारखंड म्हणजे महाराष्ट्र नव्हे.  नवे राज्यपाल  इथे  सर्वांना विश्वासात घेऊ काम करतील आशा करायला काय हरकत आहे?

 171 Total Likes and Views

0 Comments

No Comment.