ऋशीचे कुळ आणि नदीचे मुळ विचारू नये असे म्हणतात. त्यामुळे संत गजानन महाराज कोण? कुठले? अस प्रश्न प्रपंच करायची गरज नाही. तरीही कुतूहल उरतेच. महाराज १४५ वर्षापूर्वी शेगावमध्ये सर्वप्रथम दिसले असे म्हणतात तेव्हा ते वयाच्या तिशीत असतील. तर मग त्या आधी ते कुठे असतील? त्यांचे आईवडील कोण असतील? कोणत्या गावचे असतील? महाराजांना कोणी विचारले नाही आणि महाराजांनी कोणाला सांगितले नाही. त्यामुळे ते गूढच राहिले.
माघ वद्य सप्तमी म्हणजे १३ फेब्रुवारी १८७८ रोजी गजानन महाराज पहिल्यांदा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावमध्ये लोकांना दिगंबर अवस्थेत दिसले तेव्हा ते उष्ट्या पत्रावळीतली शितं खात होते असे म्हणतात. महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याची दंतकथा आहे. महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गुढ होते. त्यांनी केलेले चमत्कार त्यांच्या पोथीत वाचायला मिळतात. महाराज भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरुन भक्तांच्या हृदयात घर करत असा अनेक भक्तांचा अनुभव होता आणि आजही आहे. त्यामुळेच मंदिरात गेल्याशिवाय रोजचा दिवस सुरु न करणारी हजारो माणसे आजच्या डिजिटल युगातही आहेत. ‘गणगण गणात बोते’ हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असायचे. त्यामुळेच गिणगिणे बाबा असंही त्यांना नाव पडलं होतं. तर वऱ्हाडातले भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणत असत.
आपल्या अवतार कार्यातील ३२ वर्षांच्या काळात गजानन महाराजांनी संपूर्ण वेळ शेगावात घालवला. पण काही प्रसंगांनी अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या ठिकाणी भ्रमंती केली. नागपुरात श्रीमंत गोपाळराव बुटी यांच्या वाड्यात महाराजांचे तब्बल तीन महिने वास्तव्य होते. विदर्भ एका अर्थाने मोठा भाग्यवान आहे. इथे मोठ मोठाले संत साधू होऊन गेले. ताजुद्दीन बाबा, तुकडोजी महाराज, विनोबा भावे …..खूप नावं सांगता येतील.
गजानन महाराज अतिशय साधे राहायचे. झुणका भाकर त्यांची आवडती. चिलीम ओढायचे. कायम ‘गणगण गणात बोते’ या मंत्राचा जप करत असत. अतिशय स्वस्तात, कुठलाही तणाव न देता सुखी आयुष्य जगायचा हायवे तेव्हाच्या संतांनी दाखवला. त्या काळी हायफाय नव्हते. जे काही होतं ते साधेसुधे. त्यांचे भक्त ‘गण गण गणात गोते’ मंत्राचा जप करतात. पण किती जणांना या मंत्राचा अर्थ माहिती आहे? या मंत्राचा अर्थ होतो की, ‘जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत. त्यांना निराळे समजू नये.’ एका वाक्यात महाराजांनी आयुष्याचे तत्वज्ञान सांगितले, गीता सांगितली. गजानन महाराज यांना पंढरीला समाधी घेण्याची इच्छा होती. मात्र विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचं ठरवलं. ऋषीपंचमीला सुर्योदयालाच महाराजांनी प्राण अनंतात विलीन केले. किती छान दिवस होते त्या कालचे. किती जगायचे? ते लोक स्वतः ठरवत. त्या हिशोबाने समाधी घेत. दवाखान्याची भानगड नसे. आता ह्या महाराजांचेच घ्या. वयाच्या तिशीत ते प्रगटले आणि १९१० मध्ये गेले. त्यामुळे त्यांना किती वर्ष आयुष्य लाभले असा प्रश्न भक्तांना आजही पडतो. प्रगट दिन हा जन्म धरला तर महाराज ३२ वर्षे जगले आणि अखंड हिशोब लावला तर महाराज ६२ वर्षाचे तृप्त आयुष्य जगले असे म्हणता येईल. जन्म-मृत्यू ह्या सामान्य माणसाच्या गोष्टी झाल्या. संतांना एका दिवसाचेही आयुष्य पुरते. अवतार कार्य पूर्ण झाले तर मग ह्या ऐहिक जगाशी काय घेणेदेणे? महाराज गेले. पण आपली पुण्याई ठेवून गेले. आजही अनेकांना दृष्टांत होतो. महाराज माझ्याशी बोलले असे सांगणारे अनेक लोक भेटतात. ते जगच वेगळे आहे. आजही शेगावच्या तोडीचे मंदिर कुठे नसावे. इथे आल्यानंतर मिळणारी मनाची शांती अवर्णीय आहे. त्यामुळेच दरवर्षी इथे येणाऱ्या भक्तांची संख्या काही हजारांमध्ये आहे. इथली शिस्त, स्वच्छता पाहण्यासारखी. मंदिराचा एवढा मोठा पसारा, पण कुठेही गडबड नाही. मंदिरात आल्यावर भक्त गजाननमय बनून जातात. तुम्ही कोणीही असा, शेगावला गेले नसाल तर एकदा जाऊन या. शिन्गापूर, दुबई शेगावपुढे फिकं आहे.
127 Total Likes and Views