मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील चितोडीया हेमा गावात कुबेरेश्वर धाम नामक धार्मिक संस्थानात प्रदीप मिश्रा या शिवकथा वाचकांनी मोठे मंदिर उभे केले असून भाविकांना रुद्राक्ष मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. लाखो भाविकांनी या खेड्यात गर्दी केली मात्र आवश्यक त्या कोणत्याही सुविधा मिळाल्या नसल्याने लोकांची आबाळ झाली ,रुद्राक्ष मिळण्यासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली,त्यातच मंडप कोसळला आणि त्यात हजारो भाविक जखमी होऊन एका स्त्रीचा मृत्यू झाला. रस्त्यात अपघात होऊन आणखी चार भाविक प्राणाला मुकले. गर्दी हाताबाहेर जातेय हे लक्षात आल्यावर पंडित मिश्रा याना इथे येऊ नका असे आवाहन करावे लागले. अनेक भाविक आणि वृद्ध,बालक अजूनही बेपत्ता आहेत. लोकांना प्राथमिक सुविधा नसल्याने अतोनात हाल सहन करावे लागत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. एवढा सगळा आटापिटा केवळ एक रुद्राक्ष आपल्याला मिळावा यासाठी लोकांनी केल्याचे दिसून आले.
या महाशिवरात्रीला कुबेरेश्वर संस्थान मधून भाविकांना ११ लाख ५१ हजार रुद्राक्ष विनामूल्य वाटप करण्यात येणार असल्याचे कथावाचक प्रदीप मिश्रा यांनी आजवर विविध ठिकाणच्या कार्यक्रमातून जाहीर केले आहे. हे करताना त्यांनी रुद्राक्ष आणि शिवमहिमा एवढी रसभरीत वर्णन केली आहे की आता रुद्राक्ष मिळाला की स्वर्ग दोन बोटे शिल्लक राहील असे लाखो भाविकांना वाटते आणि मिळेल त्या वाहनाने देशभरातून भाविकांनी सिहोरच्या दिशेने कूच केली. भाविकांना मिळणारा रुद्राक्ष पंडित मिश्राजी स्वतः अभिमंत्रित करून देणार असल्याने त्याचे विशेष महत्व सगळ्यांना वाटत आहे त्यामुळे काहीही करून हा मोफतचा रुद्राक्ष आपल्याजवळ असायलाच हवा म्हणून पहिल्याच दिवशी लाखो लोकांनी गर्दी केली. गर्दीच्या आकड्याची मिश्रा आणि विठ्ठलेश सेवा समितीला कल्पना होती तरीही तिचे व्यवस्थापन करण्यात सेवा समिती कमी पडल्याचे लक्षात येते.
रुद्र हे भगवान शंकराचे एक नाव आहे. रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे अश्रू .भगवान शंकराचे अश्रू जिथे पडले त्यातून जे झाड उगवले ते म्हणजे रुद्राक्ष असे पुराणात सांगितले आहे त्यामुळे रुद्राक्षाला प्रचंड धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. एक पासून तर चौदा मुखी असे रुद्राक्षाचे प्रकार पुराणात सांगितले जातात. त्याचे प्रत्येकाचे महत्व आणि फायदे सुद्धा कथावाचक मिश्रा विविध प्रवचनातून सांगत असतात. ७ मुखी श्रीमंत करतो तर ११ आणि ८ मुखी रुद्राक्ष मंत्रोपचार करून पाण्यात ठेवला आणि ते पाणी २१ दिवस प्राशन केल्यास डायबिटीज समूळ नष्ट होतो असेही मिश्राजी सांगत असतात. त्यामुळे सगळ्या समस्यांवरील रामबाण उपाय असणाऱ्या रुद्राक्षाकडे लाखो भाविकांचा अलीकडे ओढा वाढला आहे. रुद्राक्ष महती मिश्राजीनी एवढी उत्तुंग शिखरावर नेवून ठेवली आहे की आता काहीही करून रुद्राक्ष मिळालाच पाहिजे या जिद्दीने लोकांनी सिहोरच्या दिशेने धाव घेणे सुरु केले आहे.
मुळात रुद्राक्ष ही एका फळाची बी आहे. वैज्ञानिक दृष्ट्या रुद्राक्षाच्या कोणत्याही बीजात अथवा झाडापानात कोणतीही दैवी शक्ती किंवा अलौकिक सामर्थ्य अजिबात नाही. देशाच्या सगळ्या राज्यात हे झाड सहजपणे मिळत नसल्याने आणि धार्मिक ग्रंथात त्याला महिमामंडित करण्यात आल्यामुळे त्याचे महत्व वाढले आहे. भारतात हिमालय,आसाम ,मध्यप्रदेश,अरुणाचल,उत्तरांचल,बंगाल,हरिद्वार आणि गढवाल भागात रुद्राक्षाची शेती आणि व्यवहार मोठ्या प्रमाणावर केला जातो. या शिवाय जगभर नेपाळ,इंडोनेशिया,मलेशिया या देशातही रुद्राक्षाची शेती आणि व्यापार केला जातो. रुद्राक्षाचा मोठा खरीददार मात्र भारत देश नेहमीच राहिला असल्याचे लक्षात येते. आपल्याकडे जसे बोर असते आणि वाळलेल्या बोराच्या बीजावर म्हणजे गुठळीवर जश्या विविध रेषा असतात तसेच रुद्राक्ष असतात. रुद्राक्षाच्या आजच्या घडीला जगभर ३० विविध जाती सांगितल्या जातात. त्यातील रेषांवरून धार्मिक क्षेत्रात त्याचे महत्व सांगितले जाते मात्र त्याला काहीही आधार नसतो.
आपल्या देशात मोठ्या प्रमाणात भद्राक्ष नावाचे फळ वाटप होते ८० टक्के भाविक त्याच फळाचा रुद्राक्ष म्हणून वापर करतात आणि नवल म्हणजे त्या सर्वाना त्याचे फायदे मिळतात कारण हे सगळे फायदे मानसिक असतात. अंगारा म्हणून वापरलेली राख जशी कोणत्याही भाविकाला फायदा देते तश्याच प्रकारचे फायदे रुद्राक्ष किंवा भद्राक्ष देत असतात. शिवकथेत तल्लीन झालेल्या लाखो भाविकांचा तर्काचा कप्पा बंद असतो अशावेळी त्यांच्या डोक्यात जो विचार टाकला जाईल तो स्वीकारला जातो ,रुद्राक्ष मेनिया हा त्याचाच एक भाग असल्याचे लक्षात येते. रुद्राक्ष किंवा काहीही धरण करायचे असल्यास त्याला आक्षेप घेण्याचा कुणालाही अधिकार नाही ,ज्याला जे करायचे आहे ते करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने सगळ्यांना दिले आहे मात्र त्यातून दिव्यकिरणे किंवा शक्ती निघते असा दावा करणे गुन्हा आहे. लाखो भाविकांना बोलावून त्यांना दिवसा असा अपघाती मोक्ष देणाऱ्या आयोजकांचा आता सरकारनेच बंदोबस्त करायला हवा.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248
422 Total Likes and Views